World Test Points Table, PAK vs SA: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केलं. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी अवघ्या ७३ धावांची गरज होती. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून पूर्ण केलं. गेल्या १८ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानात एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. पण १८ वर्षांची प्रतिक्षा आता संपली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानच्या पराभवाचा भारतीय संघाला फायदा झाला आहे.

या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. पण सामना गमावताच पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त केली आहे.

पाकिस्तानच्या पराभवाचा भारतीय संघाला फायदा

रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाला फायदा झाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत ७ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी ४ सामने जिंकले आहेत. १ सामना ड्रॉ राहिला आहे तर एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५२ गुणांची कमाई केली आहे. तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ६१.९० इतकी आहे. भारताची विजयाची सरासरी ही पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त आहे.

या सामन्याआधी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानी होता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर आता पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानी सरकला आहे. पाकिस्तानने या स्पर्धेत २ सामने खेळले आहेत. यापैकी १ सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानची विजयाची सरासरी ५० टक्के आहे. तर दक्षिण आफ्रिकेने देखील २ कसोटी सामने खेळले आहे. यापैकी १ सामना जिंकला आहे, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५० टक्के विजयाच्या सरासरीसह दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.