वृत्तसंस्था, बर्लिन

पाच वेळच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनची १.४ लाख लोकांविरुद्धची बुद्धिबळ लढत अखेर बरोबरीत सुटली. ‘कार्लसन विरुद्ध विश्व’ असे नाव देण्यात आलेली ही लढत तब्बल ४६ दिवस चालली.

विश्वातील सर्वांत मोठे बुद्धिबळ संकेतस्थळ अशी ख्याती असलेल्या ‘चेस.कॉम’वर या ‘ऑनलाइन’ लढतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्लसनने १ लाख ४३ हजार ४९६ जणांच्या ‘टीम वर्ल्ड’विरुद्ध ही लढत खेळली. कार्लसन या लढतीत बाजी मारेल असे भाकित ‘चेस.कॉम’ने केले होते. मात्र, अखेरीस कार्लसनला बरोबरीवर समाधान मानावे लागले.

लढतीचे स्वरूप

‘कार्लसन विरुद्ध विश्व’ ही लढत ४६ दिवस चालली. ‘फ्री-स्टाइल’ पद्धतीने खेळल्या गेलेल्या या लढतीत कार्लसनला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळाली. कार्लसन आणि ‘टीम वर्ल्ड’ला प्रत्येक चाल रचण्यासाठी २४ तासांचा अवधी होता. ‘टीम वर्ल्ड’मधील सदस्य प्रत्येक चालीसाठी मतदान करायचे आणि सर्वाधिक मते मिळालेली चाल खेळली जायची. ‘टीम वर्ल्ड’ने तीन वेळा कार्लसनच्या राजाला अडचणीत टाकले. कार्लसनला यातून मार्ग काढणे शक्य झाले नाही. तीन वेळा त्याच-त्याच चाली रचल्या गेल्याने अखेरीस लढत बरोबरीत सुटली.

अशा प्रकारची तिसरी लढत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जगज्जेता बुद्धिबळपटू विरुद्ध विश्व’ अशी ही तिसरी लढत होती. याआधी १९९९ मध्ये रशियाचा दिग्गज ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोवने ५० हजार लोकांविरुद्ध खेळताना विजय मिळवला होता. ही लढत ‘मायक्रोसॉफ्ट नेटवर्क’वर चार महिने चालली. गतवर्षी भारताचा पाच वेळचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ७० हजार लोकांविरुद्ध खेळताना विजय मिळवला होता. यंदा कार्लसनला मात्र १.४ लाख लोकांविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.