UP Warriorz buys England’s Danielle Wyatt : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी मुंबई येथे खेळाडूंचा लिलाव संपन्न झाला. या लिलावात इंग्लंडची वरिष्ठ खेळाडू डॅनियल व्याटला कोणताही मोठा खरेदीदार मिळाला नाही. यूपी वॉरीयर्सने डॅनियलची बेस प्राईज ३० लाख रुपये खर्च करून तिला संघात घेतले आहे. नुकतेच भारताविरोधात झालेल्या टी-२० सामन्यात डॅनियलने ७४ धावांची खेळी केली होती. तरीही तिला लिलावात फारशी किंमत मिळू शकली नाही. डॅनियल व्याट मैदानातील तिच्या फलदांजीशिवाय मैदानाबाहेरील घटनांमुळेही सतत चर्चेच असते. २०१४ साली तिने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला लग्नाची मागणी घातली होती. तसेच सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरसह तिचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतरही ती चर्चेत होती.
विराट कोहलीला मस्करीत प्रपोज
२०१४ साली डॅनियल व्याटने आपल्या ट्विटर हँडलवरून विराट कोहलीला लग्नाची मागणी घातली होती. डॅनियलच्या ट्विटमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. २०१४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान व्याटने “कोहली मेरी मेरी” असे ट्विट केले होते मात्र त्यानंतर सदर ट्विट चेष्टेचा भाग असल्याचे समोर आले. डॅनियल व्याटने यावर्षी मार्च महिन्यात तिची मैत्रीण जॉर्जी हॉजशी एंगेजमेंट केली. इन्स्टाग्रामवर दोघींचा फोटो शेअर करून व्याटने ही बातमी सर्वांना दिली.
अर्जून तेंडुलकरसोबतचा फोटो व्हायरल
जून २०२२ मध्ये अर्जुन तेंडुलकरसोबतचा डॅनियल व्याटचा फोटो व्हायरल झाला होता. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि लंच डेटवर गेले होते, असे सांगण्यात आले.
डॅनियल व्याट कोण आहे?
डॅनियल व्याट ही इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू आहे. ती इंग्लंडमध्ये ससेक्स, सदर्न वायपर्स आणि सदर्न ब्रेव्ह्ससाठी व्यावसायिक क्रिकेट खेळते. तिने मार्च २०१० मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले. तिने २००५ मध्ये व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून ९९ एकदिवसीय आणि ३०३ टी-२० सामने खेळले आहेत. व्याट सुपरनोव्हा आणि मेलबर्न रेनेगेड्ससाठीही खेळली आहे.
महिला प्रीमियर लीग 2023 (WPL 2023) पूर्वी झालेल्या लिलावात डॅनियल व्याटला खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर ती निराश झाली होती.
डॅनियलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
३२ वर्षीय डॅनियलने आतापर्यंत १०५ एकदिवसीय सामने आणि १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात २३.६० च्या सरासरीने तिने १,८४१ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात आजवर तिने दोन शतके झळकावली आहेत. तर टी-२० मध्ये २२.२३ धावांच्या सरासरीने २,६०२ धावा काढल्या आहेत. टी-२० तही दोन शतके झळकावली आहेत.