ICC WTC Points Table After IND vs WI Test Series: भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध २-० च्या फरकाने निर्भेळ कसोटी मालिका विजय नोंदवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करत टीम इंडियाने या संघाविरूद्धची विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारताने प्रथम अहमदाबाद कसोटी एक डाव आणि १४० धावांनी जिंकली आणि आता त्यांनी दिल्ली कसोटीत ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताच्या या कसोटी मालिका विजयानंतरही गुणतालिकेत संघ टॉप-२ मध्ये पोहोचू शकलेला नाही.

भारताच्या दोन विजयांमुळे त्यांच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फारसा बदल झालेला नाही. टीम इंडिया टॉप-२ मध्येही पोहोचलेली नाही. पण यामागचं नेमकं कारण काय आहे. जाणून घेऊया.

भारताच्या वेस्ट इंडिजविरूद्ध मालिका विजयानंतर कसं आहे गुणतालिकेचं चित्र?

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता आणि मालिका संपल्यानंतरही संघ त्याच स्थानावर आहे. भारताची मालिका विजयानंतर टक्केवारी मात्र वाढली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाची टक्केवारी ४६.६७ होती.

वेस्ट इंडिजविरूद्ध मालिका विजयानंतर ही टक्केवारी आता ६१.९० पर्यंत वाढली आहे. भारताने सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रात सात सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

२०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. दोन्ही संघांची टक्केवारी भारतापेक्षा चांगली आहे. ऑस्ट्रेलिया संघाची टक्केवारी १०० टक्के आहे, तर श्रीलंका ६६.६७ च्या टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. दरम्यान, श्रीलंकेने त्यांच्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे आणि एक अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडिया टॉप-२ मधून बाहेर आहे.