रणजी करंडक २०२२ च्या अंतिम सामन्यामध्ये मुंबईचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर, मध्य प्रदेशने प्रथमच रणजी विजेतेपद पटकावले. १९९८-९९मध्ये ज्या मैदानावर संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती, त्याच मैदानावर कर्णधार आदित्य श्रीवास्तवच्या संघाने इतिहास रचला. मध्य प्रदेशच्या या संघात कोणताही मोठा खेळाडू नव्हता. मात्र, तरीदेखील त्यांनी मुंबई आणि बंगालसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून रणजी करंडक जिंकला आहे. मध्य प्रदेशच्या या विजयात रजत पाटीदार, यश दुबे, शुभम शर्मा आणि कुमार कार्तिकेय या खेळाडूंनी सर्वाधिक योगदान दिले.
बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघातील शुभम शर्मा, यश दुबे आणि रजत पाटीदार या त्रिकूटाने चमकदार कामगिरी केली. तिघांच्या शतकी खेळीच्या बळावर मध्य प्रदेशला पहिल्याच डावात आघाडी घेता आली. शुभम शर्मा या रणजी हंगामात धावांच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर राहिला. तो मध्य प्रदेशचा तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने सहा सामन्यांच्या नऊ डावात ६०८ धावा केल्या. यामध्ये चार शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. अंतिम सामन्यात त्याने ११६ धावांची उत्कृष्ट खेळी करत यश दुबेसोबत चांगली भागीदारी केली.
यश दुबे या रणजी हंगामात मध्य प्रदेशसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाच फलंदाज ठरला आहे. त्याने सहा सामन्यांतील १० डावांत ६१४ धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. अंतिम सामन्यात यशने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १३३ धावांची जबरदस्त खेळी खेळून मुंबईच्या गोलंदाजांचे मनोधैर्य तोडले. यश दुबेने अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या विजयाचा पाया रचला होता, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
शुभम आणि यशला रजत पाटीदारने खंबीर साथ दिली. आयपीएल २०२२ मध्ये बंगळुरूसाठी त्याने बाद फेरीत शतक झळकावून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले होते. रणजी स्पर्धेतही त्याने अप्रतिम फलंदाजी केली आणि धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने सहा सामन्यांतील नऊ डावांत ६५८ धावा केल्या. १४२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या रणजी हंगामात दोन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकावली. मध्य प्रदेशच्यावतीने त्याने या हंगामात सर्वाधित धावा केल्या आहेत.
मध्य प्रदेशच्या फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनीदेखील अविश्वसनीय कामगिरी करत संघाच्या विजयात योगदान दिले आहे. या रणजी हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्याबाबतीत मध्य प्रदेशचा कुमार कार्तिकेय दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने सहा सामन्यांतील ११ डावात ३२ बळी घेतले. यादरम्यान त्याने एका डावात सहा बळी घेण्याचा पराक्रमही केला. कार्तिकेयने अंतिम सामन्यात मुंबईच्या पाच महत्त्वाच्या खेळाडूंना बाद केले.
या खेळाडूंव्यतिरिक्त, कर्णधार आदित्य श्रीवास्तव आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर संघातील सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.