विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वन-डे मालिकेत व्हाईटवॉश स्विकारल्यानंतर कसोटी मालिकाही भारताने २-० ने गमावली. भारताच्या प्रमुख गोलंदाजांचं अपयश हे कसोटी मालिकेतल्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे बिनीचे शिलेदार सपशेल अपयशी ठरले. या पराभवानंतर भारतीय फलंदाजांना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळावरही यादरम्यान चांगलीच टीका झाली. पण मी ट्रोलर्सची कधीच पर्वा करत नसल्याचं पुजाराने स्पष्ट केलंय. तो इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सोशल मीडियावर कौतुक करावं म्हणून मी फलंदाजी करत नाही. अनेकांना माझी शैली समजत नाही, कारण ते मर्यादीत षटकांचं क्रिकेट जास्त पाहतात. अरे हा खूर कंटाळवाणं खेळतोय, किती चेंडू खेळणार आहे ! अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लोकांचं मनोरंजन करणं हे माझं ध्येय नाही…माझ्यासाठी माझा संघ विजयी झाला पाहिजे हे महत्वाचं आहे. मग मी सौराष्ट्राकडून खेळत असेल किंवा भारताकडून. मी परिस्थितीनुरुप खेळतो. मी शक्य तितकं सोशल मीडियावर येणं टाळतो. विशेषकरुन फलंदाजी करत असताना मी सोशल मीडियावर येतच नाही.” पुजाराने आपली बाजू स्पष्ट केली.

न्यूझीलंडमधील अपयशाबद्दल विचारलं असता पुजारा म्हणाला, “दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मी ज्या पद्धतीने फटका खेळलो तो चुकीचा होता. मी शक्यतो पुलचे फटके खेळणं टाळतो, मात्र त्याक्षणी तो फटका मी कसा काय खेळलो हेच मला समजलं नाही. मला आजही त्याची सल कायम आहे. मी मैदानात एकदा स्थिरावलो की माझी विकेट सहजासहजी देत नाही.” न्यूझीलंड दौरा आटोपल्यानंतर पुजाराने तात्काळ रणजी करंडक स्पर्धेत सहभागी होणं पसंत केलं. सौराष्ट्र विरुद्ध बंगाल अंतिम सामन्यात सौराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बाजी मारली, पुजारानेही या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can not bat for social media my aim is to win says cheteshwar pujara psd
First published on: 16-03-2020 at 15:01 IST