चाहत्यांनी घेतला अव्वल खेळाचा आनंद; पहिल्या दिवशी भारताकडे २-० अशी आघाडी

भारतीय खेळाडू एकेरीत भलेही ग्रँड स्लॅम स्पर्धेत फारसे यश मिळवत नसतील पण रॉजर फेडरर, रॅफेल नदाल यांच्यासारख्या खेळाची झलक येथील टेनिस चाहत्यांना भारताच्या युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी डेव्हिस चषक लढतीद्वारे दाखविली. त्यांनी एकेरीत मिळविलेल्या विजयामुळे पहिल्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे भारताचे पारडे जड झाले आहे.

युकी भांब्री याने वेगवान सव्‍‌र्हिस व अचूक सव्‍‌र्हिस असा चतुरस्त्र खेळ करीत फिन टिअर्नी याच्यावर ६-४, ६-४, ६-३ अशी मात केली आणि न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारतास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात रामकुमार याने जोस स्टॅथम याचा ६-३, ६-४, ६-३ असा धुव्वा उडविला.

युकीने ताकदवान खेळाच उपयोग करीत प्रतिस्पर्धी खेळाडूला उत्तर देण्याचे ध्येय ठेवले होते. त्याने सामन्याचा श्रीगणेशाच सव्‍‌र्हिसब्रेकद्वारा केला. त्याने फोरहँड व बॅकहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला. टिअर्नी यानेही पुढच्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक करीत त्याला प्रत्युतर दिले. त्यामध्ये युकीने दिलेल्या नकारात्मक गुणांचाच जास्त फायदा टिअर्नीला झाला. पुन्हा तिसऱ्या गेममध्ये युकीला ब्रेकची संधी मिळाली होती मात्र त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. टिअर्नी याने चौथ्या गेममध्ये युकीने केलेल्या चुकांचा फायदा घेतला तसेच त्याने परतीच्या खणखणीत फटक्यांचाही सुरेख खेळ केला. त्याच्याकडे ३-१ अशी आघाडीही आली होती. तथापि जिगरबाज युकीने १-३ अशा पिछाडीवरुन सलग तीन गेम्स घेतल्या. त्यामध्ये त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. त्याने टिअर्नी याच्या बेसलाईनवर परतीचे फटके मारण्यावर भर दिला होता. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. नवव्या गेममध्ये टिअर्नी याने सव्‍‌र्हिस राखली. दहाव्या गेममध्ये युकी याने वेगवान सव्‍‌र्हिसचा उपयोग करीत टिअर्नी याला फारशी संधी दिली नाही. त्याने ही गेम घेत पहिला सेट ६-४ असा मिळविला.

दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला युकी याला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत टिअर्नी याने सलग तीन गेम्स घेत २-० अशी आघाडी घेतली. त्यामध्ये दुसऱ्या गेमच्या वेळी त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तिसऱ्या गेमच्या वेळी युकी याने पासिंग शॉट्सचा उपयोग करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. तेथूनच त्याला पुन्हा सूर सापडला. पुन्हा त्याने पाचव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. टिअर्नी याने केलेल्या सव्‍‌र्हिसच्या दुहेरी चुकांचा युकी याला फायदा झाला. सातव्या गेमच्या वेळी पु्न्हा त्याला सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली होती. ही गेम दोन्ही खेळाडूंनी केलेल्या रॅलींमुळे रंगतदार झाली. या गेममध्ये सव्‍‌र्हिस राखण्यात टिअर्नी यशस्वी ठरला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या सव्‍‌र्हिस राखल्या. दहाव्या गेममध्ये युकीने सव्‍‌र्हिस राखली व हा सेट घेतला.

लागोपाठ दोन सेट गमावल्यानंतर टिअर्नी याच्यावर खूप दडपण आले होते. याउलट युकीचा आत्मविश्वास आणखी उंचावला. तिसरा सेट घेत सामन्यात विजय मिळविण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवीत त्याने खेळ केला. या सेटमध्ये त्याने बेसलाईन व्हॉलीज, टॉपस्पीन फटके, परतीचे क्रॉसकोर्ट फटके असा बहारदार खेळ केला. या सेटमध्ये त्याने पाचव्या गेमच्या वेळी महत्त्वपूर्ण ब्रेक मिळविला. टिअर्नी यानेही काही सुरेख फटके मारले मात्र तोपर्यंत त्याच्या हातातून सामना गेला होता. त्या दडपणाखाली पुन्हा त्याने नवव्या गेमच्या वेळी कमकुवत सव्‍‌र्हिस केल्या. त्याचा पुरेपूर फायदा घेत युकी याने सव्‍‌र्हिस तोडली व सामना ३-० अशा सरळ तीन सेट्समध्ये घेतला.

युकीने विजयी सलामी केल्यानंतर विजयी मालिका पुढे ठेवण्याची जबाबदारी रामकुमार याने समर्थपणे पार पाडली. त्याने स्टॅथम याच्याविरुद्धच्या पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेमच्या वेळी महत्त्वपूर्ण ब्रेक मिळविला. हा ब्रेकच त्याला पहिला सेट घेण्यासाठी उपयोगी पडला. स्टॅथम याने त्याची सव्‍‌र्हिस तोडण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. रामकुमार याने ताशी दीडशेपेक्षा जास्त किलोमीटर वेगाने केलेल्या सव्‍‌र्हिस त्याला रोखता आल्या नाहीत. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपापल्या सव्‍‌र्हिस राखल्या. सातव्या गेमच्या वेळी रामकुमार याने बॅकहँड व फोरहँड अशा दोन्ही पद्धतीने फटकेबाजी करीत स्टॅथम याची

सव्‍‌र्हिस तोडली. लागोपाठ दोन सेट घेतल्यानंतर रामकुमारचे मनोधैर्य आणखी उंचावले.  तिसऱ्या सेटमध्येच सामन्याचा निकाल लावायचा निर्धार ठेवीत त्याने खेळ केला आणि विजय निश्चित केला.