पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात भारतीय फिरकीपटूंची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसून आली. कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी १०-१० षटके टाकली, पण दोघांना एकही गडी बाद करता आला नाही. पण सध्या या दोघांना सोडून तिसराच फिरकीपटू चर्चेत आहे. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा सध्या एका सोशल पोस्टमुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहलने इन्स्टाग्राम त्याचा आणि कुलदीप यादवचा एक फोटो शेअर केला आहे.
त्या फोटोत हे दोघे एखाद्या जाहिरातीसाठी शूटींग करत असल्यासारखे वाटते आहे. या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक केले आहे, पण इंग्लंडची क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिने मात्र चहलची फिरकी घेतली आहे. “(फोटो पाहून) तू तर माझ्यापेक्षाही छोटा आहेस असं वाटतं”, अशी कमेंट तिने केली आहे.
वेस्ट इंडीजची विजयी सलामी
भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. राहुल, रोहित, विराट झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. हे दोघे माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. कॉट्रेल, पॉल आणि जोसेफ यांनी २-२ तर पोलार्डने १ बळी टिपला.
भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत त्यांनी अक्षरश: भारताकडून विजय हिसकावून घेतला. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.