प्रो कबड्डी लीगविषयी खूप ऐकले होते. त्यामध्ये मला भाग घेण्याची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. यंदा या लीगमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वप्नवत अनुभवातून जात आहे, असे उद्गार पुणेरी पलटणचे प्रतिनिधित्व करणारा बांगलादेशचा खेळाडू झियाउर रेहमानने काढले आहेत.

या स्पर्धेत रेहमानला प्रथमच खेळण्याची संधी मिळाली आहे. विश्वचषक स्पर्धेतील अप्रतिम पकडींच्या बळावर रेहमानसाठी यंदा प्रो कबड्डीची दारे खुली झाली. नौदलात नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय रेहमानला लहानपणापासूनच कबड्डीचे वेड आहे. अर्थात शालेय जीवनात तो क्रिकेट खेळत असे. त्या वेळी क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे त्याने ठरवले होते. परंतु नौदलात नोकरी मिळाल्यानंतर त्याला क्रिकेट खेळणे शक्य झाले नाही. नौदलातील अनेक जण जहाजावर कबड्डी खेळत असल्यामुळे त्यानेही कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन वर्षांमध्ये त्याने बांगलादेश संघात स्थान मिळवले.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

बांगलादेशातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पध्रेविषयी रेहमान म्हणाला, ‘‘नौदलाच्या संघात चढाया करणाऱ्यांची कमतरता नाही. आपल्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल तर पकडीचे कौशल्य अधिक आत्मसात केले पाहिजे असा मनाशी निश्चय करीत पकडी करण्याच्या कौशल्यावर मी अधिक लक्ष केंद्रित केले. सुदैवाने हे तंत्र मला जमले. आमच्याकडेही राष्ट्रीय स्पर्धा विलक्षण चुरशीने खेळल्या जातात. विजेतेपद कोण मिळवेल हे सांगता येत नाही. भारताप्रमाणे आमच्याकडेही क्रिकेटची अफाट लोकप्रियता आहे, तरीही कबड्डीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.’’

प्रो लीगविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय कालावधी आहे. आमच्या देशातही या लीगचे चाहते आहेत. अशा लीग आमच्याकडे आयोजित केल्या तर निश्चितपणे आमच्याकडेही कबड्डी हा खेळ क्रिकेटला मागे टाकेल. लीगचे प्रक्षेपण, त्याची मांडणी, समालोचन या सर्वच गोष्टी माझ्यासाठी अद्भुत आहेत.’’

नौदल व्यवस्थापनाने पगारी रजा दिली काय असे विचारले असता रेहमान म्हणाला, ‘‘मला बिनपगारी रजाच घ्यावी लागली. अर्थात नोकरीची हमी ठेवूनच मला त्यांनी या स्पर्धेसाठी परवानगी दिली आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या लीगमधील अनुभवाचा फायदा घेत राष्ट्रीय स्पर्धेत नौदल संघाला विजेतेपद मिळवून द्यावे, हीच त्यांची माफक अपेक्षा आहे.’’