सेप ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनच्या (फिफा) रिक्तझालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी ब्राझीलचे माजी दिग्गज फुटबॉलपटू झिको मैदानात उतरले आहेत. त्यांनी तशी अधिकृत घोषणा केली. मात्र बहुमत मिळवण्यासाठी झगडावे लागणार असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
‘‘अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे मी जाहीर करतो. या पदासाठी आपण समर्थ असल्याचे मला वाटते. मात्र, त्यासाठी काही नियमांत बदल करणे आवश्यक आहे,’’ असे मत ६२ वर्षीय झिको यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
फिफामागे लागलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या ससेमिऱ्यानंतर १९९८ पासून अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या ब्लाटर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. जपान संघाचे प्रशिक्षपद यशस्वीपणे fifaभूषविणाऱ्या झिको यांच्याकडे व्यवस्थापकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या मते या खेळात मोठय़ा प्रमाणात सुधारणेची आवश्यकता आहे. ‘‘वर्षांअखेरीस निवडणूक होईपर्यंत ब्लाटर यांनी पदावर कायम राहावे, जेणेकरून ब्लाटर यांना शिस्तबद्ध पद्धतीने पदभार इतरांकडे सोपविता येईल,’’ असे प्रांजळ मतही झिको यांनी व्यक्त केले.
‘व्हाइट पेले’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या झिको यांना आपल्या कारकीर्दीत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. फिफाच्या अध्यक्षपदावर निवडून आल्यास पहिले कोणते काम हाती घेणार, या प्रश्नावर झिको यांनी निवडणुकीत होणारी सौदेबाजी संपुष्टात आणून सरळता आणण्याचा निर्धार बोलून दाखविला. झिको यांनी ब्राझिलियन फुटबॉल महासंघातही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. झुरिच येथे स्विस पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सात फिफा अधिकाऱ्यांमध्ये ब्राझीलचे माजी अध्यक्ष जोस मारिन यांचाही समावेश होता.
मॅराडोना उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत
सतत वादात अडकलेले अर्जेटिनाचे दिग्गज डिएगो मॅराडोना यांनी उपाध्यक्षपदावर दावेदारी सांगितली आहे. १९८६च्या विश्वचषक विजेत्या संघात मॅराडोना होते आणि त्यानंतर उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ८ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. फिफाच्या शुद्धीकरणाचा नारा देत मॅराडोना यांनी प्रिन्स अली बिल अल हुसेन यांना पाठिंबा
दर्शविला आहे.
फिफाच्या मुख्यालयातून संगणकीय माहिती जप्त
ल्ल ल्युसाने : २०१८ आणि २०२२च्या विश्वचषक आयोजनाच्या मतदान प्रक्रियेत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनने (फिफा) झुरिचमधील मुख्यालयातील संगणकीय माहिती गुरुवारी स्विस पोलिसांकडे स्वाधीन केली. या आरोपांमुळे फिफाने २०२६मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठीची निविदा प्रक्रियाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. २०१० साली फिफाने २०१८ व २०२२च्या विश्वचषक आयोजनासाठी मतदान घेतले होते आणि त्यात अनुक्रमे रशिया व कतारने बाजी मारली होती. कतारला आयोजनाचा मान मिळाल्यामुळे खूप वादंगही उठले आणि तब्बल चार वर्षांनंतर स्विस पोलिसांनी अमेरिकेच्या विनंतीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ‘‘अ‍ॅटर्नी जनरल यांच्या विनंतीनुसार फिफाने संगणकीय माहिती सुपूर्द केली,’’ अशी माहिती फिफाच्या प्रवक्त्याने दिली.
ब्लाटर यांनी त्वरित पद सोडावे : युरोपियन संसद
ल्ल स्ट्रॉसबर्ग (फ्रान्स) : फिफाच्या अध्यक्षपदाचा सेप ब्लाटर यांनी राजीनामा दिला असला तरी अद्यापही ते या पदावर काम करीत आहेत. त्यांनी पायउतार व्हावे व त्यांच्या जागी प्रभारी अध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी युरोपियन संसदेने केली आहे. फिफावर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर ब्लाटर यांनी २ जून रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत त्यांच्याकडे कारभार राहणार आहे. युरोपियन संसदेने आवाजी मताने ठराव करीत ब्लाटर यांनी त्वरित फिफावरून दूर व्हावे व संघटनेत आमूलाग्र बदल करण्यासाठी प्रभारी अध्यक्ष नियुक्त करावा, अशी मागणी केली आहे.