News Flash

कारचे रुपडे बदलताना

आज अनेक कंपन्या कार मॉडिफिकेशन करून देतात. त्याचप्रमाणे मॉडिफिकेशन किटदेखील विकतात.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

भारतीय रस्त्यांवर ज्या प्रमाणात गाडय़ांची संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे कार मॉडिफाय करून घेणाऱ्यांच्या प्रमाणातही भर पडत आहे. प्रत्येक जण कार खरेदी करताना बजेट, गाडीची क्षमता, अ‍ॅव्हरेज अशा अनेक निकषांचा विचार करतो. त्यांनतर  ही गाडी माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे का? याचा विचार करतो. कारण कार  हे आज केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे साधन नसून त्यातून आपले व्यक्तिमत्त्व, समाजातील आपले स्थान दर्शविते. त्यामुळेच लोक इतरांहून आपली गाडी उठून दिसावी यासाठी कार मॉडिफिकेशनचा पर्याय निवडतात.

आज अनेक कंपन्या कार मॉडिफिकेशन करून देतात. त्याचप्रमाणे मॉडिफिकेशन किटदेखील विकतात. आपल्याला कार का मॉडिफाय करायची आहे हे आधी ठरवा. काही लोक आवश्यकता म्हणून तर काही लोक हौस म्हणून कारमध्ये बदल करतात. गाडीचे रूप बदलायचे आहे की गाडी अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यात बदल करायचे आहेत. कार मॉडिफिकेशन संकल्पना बरीच मोठी आहे. परंतु या सर्व प्रकारच्या मॉडिफिकेशनचा उद्देश एकच आणि तो म्हणजे आपल्या गाडीची पर्यायाने आपली वेगळी छाप पाडणे. कार मॉडिफिकेशनमुळे तुमची गाडी कंपनीच्या उत्पादन केंद्रात तयार केल्या जाणाऱ्या लाखो गाडय़ांपेक्षा वेगळी ठरते. हे बदल कारचे रूप आणि क्षमता दोन्ही बदलून टाकतात. गाडी आणि आपली गरज योग्यरीत्या पडताळून केलेले हे बदल गाडीच्या कार्यक्षमतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरू शकतात.

कार मॉडिफिकेशन म्हणजे नक्की काय?

गाडीत कोणत्याही प्रकारचा केलेला बदल हा मॉडिफिकेशन या संज्ञेत मोडतो. गाडीचे रूप बदलणे, किंवा गाडीच्या क्षमतेत बदल करणे म्हणजेच कार मॉडिफिकेशन.

कार मॉडिफिकेशनचे प्रकार?

कार मॉडिफिकेशचे तीन मुख्य प्रकार आहेत कारच्या क्षमतेत बदल करणे, कारच्या एखाद्या ठरावीक यंत्रणेत बदल करणे, तिसरे गाडीच्या बॉडीत बदल करणे.

कारच्या इंजिनची क्षमता वाढवणे, हॅँडलिंग सुधारणे, इंधनाची बचत करण्यासाठी केलेले बदल (गाडीमध्ये सीएनजी किट बसवणे)  किंवा एअर फिल्टर, ब्रेक, सस्पेंशन, टायर यामुळे कारच्या क्षमतेत बदल होतात. दुसरा भाग म्हणजे कारच्या एखाद्या यंत्रणेत बदल करणे, गाडीला सनरूफ लावणे, वातानुकूलन यंत्रणा बसविणे, दिशादर्शक यंत्रणा लावणे, साउंड सिस्टिम लावणे हे सर्व या प्रकारात मोडतात.

शेवटचे म्हणजे गाडीच्या बॉडीत केले जाणारे बदल. यामध्ये गाडीचे बाह्य किंवा आतील रूप बदलले जाते. आता हे बदल वेळेस गाडीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ बाजारात मिळणाऱ्या काही मॉडिफिकेशन किटमुळे गाडीची रस्त्यावरील पकड मजबूत होते. त्याचप्रमाणे त्याच्या एरोडॅनॅमिक्समध्येदेखील सुधारणा होते. यामध्ये गाडीच्या सीट्स बदलणे, टायर बदलणे, चाकांना मॅग व्हील बसवणे याचा समावेश होतो. कारच्या बॉडीसाठी बाजारात वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे विणाईल मिळतात. हे मेटॅलिक, ग्लॉसी अशा पर्यायमध्ये उपलब्ध आहे.

गेअर बॉक्स : बरेच वेळा गाडीची क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रवास सुखद करण्यासाठी गाडीच्या गेअर बॉक्समध्ये बदल केले जातात.

ब्रेक : ब्रेक हे गाडी हाताळताना सर्वाधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे ब्रेकिंग यंत्रणेच्या ब्रेक शू आणि मास्टर सिलिंडरमध्ये सुधारणा केली जाते.

सस्पेंशन : भारतीय रस्त्यांसाठी कुठल्याही गाडीची सस्पेंशन यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे. गाडीची रस्त्यावर पकड मजबूत राहावी आणि गाडी नियंत्रणात ठेवण्यासाठी सस्पेंशनची मदत होते. रस्त्यात भरपूर खड्डे असल्यामुळे काही वेळा गाडीची मूळ सस्पेंशन यंत्रणा तोकडी पडते. त्यामूळे सस्पेंशन यंत्रणेमध्ये बदल केले जाते.

सायलेन्सर : बाइक असो वा कार सायलेन्सर बदलणे हे सर्वात लोकप्रिय मॉडिफिकेशन आहे. यामुळे केवळ गाडीच्या कार्यक्षमतेतच सुधारणा होत नाही, तर कारचे रूपडेही बदलते. बरेच वेळा हे सायलेन्सर विशिष्ट ध्वनी निर्माण करीत असल्यामुळे हे वापरले जातात. बहुतेक वेळा मफलरमध्ये बदल एअर फिल्टरमध्ये बदल केला जातो.

फायदे आणि तोटे

* चांगल्या दर्जाचे मॉडिफिकेशन किट वापरून योग्य पद्धतीने केलेले बदल हे गाडीसाठी फायद्यचे ठरू शकतात, तर चुकीच्या पद्धतीने केलेले इंस्टॉलेशन आणि निकृष्ट दर्जाचे भाग वापरल्यास गाडीच्या क्षमतेवर आणि सुरक्षेवर दुष्परिणाम  होऊ  शकतात.

*  गाडीच्या क्षमतेला पूरक असणारेच बदल योग्य आहेत. अशा प्रकारचे बदल करताना तज्ज्ञांची मदत घ्या.  कारच्या इंजिनमध्ये बदल केल्यास तुमची इंजिन वॉरंटी रद्द होऊ  शकते. त्याचप्रमाणे गाडीच्या यंत्रणेत बिघाड होण्याची  शक्यता वाढते.

*  बरेचदा असे मॉडिफिकेशन गाडीच्या इतर भागांवर परिणाम करतात. त्यामुळे मॉडिफिकेशनबाबत संपूर्ण माहिती घेऊनच बदल करणे योग्य आहे. अशा प्रकारचे बदल करण्याआधी संबंधित यंत्रणांची परवानगी घेणे गरजेचे आहे.

*  गाडीच्या मॉडिफिकेशनमुळे वाहनाच्या विम्यावरदेखील परिणाम होतो. गाडीत केलेल्या बदलामुळे तुमच्या विम्याचा हफ्ता वाढण्याची शक्यता आहे.

हे लक्षात ठेवा

* गाडीला पूर्णत: मॉडिफाय करून तिच्या रचनेत बदल करणे हे बेकायदा असून असे केल्यास  दंडात्मक कारवाई होऊ  शकते.

*  त्याच प्रमाणे सरकारच्या नवीन नियमानुसार गाडी मॉडिफाय करण्यावर काही बंधने आली आहेत. बंपर गार्ड ,गाडीचे फॉग लाइट , गाडीचा मूळ रंग आणि आकार यामध्ये बदल केल्यास कारवाई होऊ शकते. ५५ ते ६० वॅटचे हेडलाईट तुम्ही गाडीत लावू शकता.

*  काही वेळेस इंधनाची बचत करण्यासाठी इंजिन बदलण्याचे प्रकार केले जातात गाडीचे पेट्रोल इंजिन काढून त्याजागी डिझेल इंजिन बसवले जाते. त्यामुळे आपल्या आर सी पुस्तिकेत असलेला मूळ इंजिन क्रमांक रद्द होतो. अशाप्रकारे इंजिन बदलणे देखील बेकायदा ठरवण्यात आले आहे. गाडीचे इंजिन बदलायचे असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवानगी घेणे गरजेचे आहे.

*  त्याचप्रमाणे इंडिकेटरचा रंग बदलून इतर रंगाचे लाइट वापरण्यासही मनाई आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:39 am

Web Title: article about changing the look of the car
Next Stories
1 फ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड
2 रानफुलांच्या गावा जावे..
3 दोन दिवस भटकंतीचे : कराड
Just Now!
X