– प्रा. योगेश अशोक हांडगे

उन्हाळ्याची सुटी सुरू होताच प्रत्येकालाच बाहेरगावी सहलीला जाण्याचे वेध लागतात. शक्यतो नवीन ठिकाणी जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण नवीन ठिकाण म्हटलं की आपल्यासाठी सारंच अनोळखी असतं. अशा वेळी कोणी तरी विश्वासू वाटाडय़ा सोबत असला की साऱ्या अडचणी दूर होतात, पण असा वाटाडय़ा तुम्हाला आता चोवीस तास उपलब्ध होऊ शकतो. तो म्हणजे तुमचा स्मार्टफोन. तुमच्या स्मार्टफोनमधील पर्यटनविषयक अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही अनोळखी पर्यटन स्थळीही एखाद्या जाणकाराप्रमाणे भ्रमंती करू शकता. तुमचे पर्यटन सहजसुलभ करणाऱ्या अशाच काही अ‍ॅपविषयी.

गुगल मॅप

तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर गुगल मॅप स्वतंत्रपणे डाऊनलोड करण्याची गरजच नाही. ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच असेल. गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणच्या रस्त्यांचा तसेच रेल्वे वा अन्य वाहतूक मार्गाचा तपशील तुम्हाला उपलब्ध होतो. तसेच त्या ठिकाणापर्यंत पोहोचवणारा नकाशाही तुमच्या स्क्रीनवर दर्शवला जातो. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे इंटरनेट सुरू ठेवणे आवश्यक आहे. इंटरनेट व जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असेल तर गुगल मॅप तुमचा सदासर्वकाळ मार्गदर्शक बनू शकतो. तुम्ही पर्यटनाला निघण्यापूर्वीच ज्या शहरात जाणार आहात त्या शहराचा नकाशा गुगल मॅपवर डाऊनलोड करून घेऊ शकता आणि नंतर तो ‘ऑफलाइन’ वापरूही शकता.

ट्रिपिगेटर

भारत सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी इन्क्रेडिबल इंडिया ही मोहीम हाती घेतली होती. यामध्ये पर्यटन मंत्रालयातर्फे विविध पर्यटन केंद्रांच्या विकासापासून ते तेथे सहलीचे आयोजन करण्यापर्यंत विविध उपक्रम हाती घेतले. या सर्वाची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटकांकरिता केंद्र सरकारने पर्यटन विभागामार्फत नुकतेच एक मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. यात देशातील विविध शहरांची माहिती देण्यात आली असून यामध्ये आपण आपल्याला आवडते ठिकाण आणि तेथे जाण्याचा कालावधी निवडल्यानंतर त्या कालावधीत तेथे असणाऱ्या हवामाबद्दलही या अ‍ॅपद्वारे माहिती मिळते. कायम प्रवास करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम अ‍ॅप आहे.

झॉपहॉप (Zophop)

रोज किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यावर बसने प्रवास करायचा असेल तर हे अ‍ॅप अत्यंत उपयोगी आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरु, इंदूर, जयपूर, छत्तीसगड, भोपाळ, पुणे या आणि अशा १५ वेगवेगळ्या ठिकाणचे बसस्टॉप, ठिकाणांवर पोहोचायचा सुलभ मार्ग, बसची वेळ, भाडं, अशा अनेक गोष्टींच्या माहितीमुळे हे अ‍ॅप उपयोगी ठरतं.

इंडियन नॅशनल पार्क

(Indian National Park)

कुठलं अभयारण्य कुठल्या वन्यजीवांसाठी प्रसिद्ध हे जाणून घेण्याकरिता हे अ‍ॅप उपयोगी आहे. या अ‍ॅपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणच्या अभयारण्यांची माहिती, खासियत, सगळ्या जास्त दिसणारा प्राणी, भेट देण्याचा योग्य काळ अशा विविध गोष्टींची माहिती मिळते.

युरोप ट्रॅव्हल गाइड ऑफलाइन (Europe Travel Guide offline)

युरोप ट्रॅव्हल गाइड हे अ‍ॅप परदेशात फिरणाऱ्यांकरिता उपयोगी आहे. हे ऑफलाइनसुद्धा वापरता येत असल्यानं उपयोगी ठरतं. युरोपमधली प्रेक्षणीय ठिकाणं, खासियत, विविध शहरं या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती अ‍ॅपमध्येच असल्यामुळे ऑफलाइन वापरणं शक्य होतं. पन्नासच्या वर  वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती या अ‍ॅपमध्ये आहे.

गूगलचे पर्यटन अ‍ॅप(‘ट्रिप्स’) :

पर्यटनाची ठिकाणे सुचवणारी, माहिती देणारी आणि अगदी प्लॅनिंगची सुविधादेखील पुरवणारी गूगलने ‘ट्रिप्स’ अ‍ॅप्सची घोषणा केली आहे . हे अ‍ॅप ऑफलाइन पद्धतीने काम करत असल्याने इंटरनेट नसतानादेखील याचा वापर करता येणार आहे हे विशेष. या ‘ट्रिप्स’मध्ये नकाशे, पर्यटनस्थळांचे फोटो, ऑनलाइन तिकिटे तसेच हॉटेल बुक करणे अशा सोयी असणार आहेत. यात एक विशेष फीचरदेखील उपलब्ध असणार आहे. ते म्हणजे युजरच्या गूगल सर्च हिस्ट्रीवरून त्या युजरची आवडनिवड जाणून घेत त्या संदर्भातली माहितीदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एअरलाइन फ्लाइट स्टेटस ट्रॅकिंग

देशांत परदेशात विमानाने प्रवास करणाऱ्यांकरिता हे अ‍ॅप उपयोगी आहे. या अ‍ॅपमध्ये विमानाचा नंबर टाकला की, ते विमान कुठे आहे, त्याचे स्टेटस काय आहे या सर्वाची माहिती मिळते. यामुळे विमानाला विलंब होणार असेल तर, विमानतळावर ताटकळत बसण्याची गरज लागत नाही.

पे राइट फेअर ‘(पीआरएफ)

पे राइट फेअर ‘ (पीआरएफ) नावाचे. हे अ‍ॅप वापरताना आपल्या फोनमधील जीपीएस सुरू होते. आपण रिक्षात अथवा टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वी हे अ‍ॅप सुरू करून ठेवायचे आणि रिक्षा किंवा टॅक्सी सुरू झाली की, स्टार्ट क्लिक करायचे. मग रिक्षाच्या मीटरप्रमाणे आपल्या मोबाइलमधील हे मीटरही काम करण्यास सुरुवात करते. वापरकर्त्यांना  यामध्ये रिक्षाचा स्पीड, पार केलेले अंतर तसेच वेटिंग टाइम इत्यादी माहितीही समजते. हे अ‍ॅप जीपीएसशी जोडले गेल्याने ते अधिक प्रभावीपणे काम करते. यामध्ये मुंबईबरोबरच नवी मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, गुरगाव, पुणे, ठाणे या शहरांमधील रिक्षा, टॅक्सी, कूल कॅब यांचे दरही कळू शकतात.

हॉटेलशी संबंधित अ‍ॅप्स

बाहेरगावी मुक्कामाच्या हिशेबाने पर्यटनाला जाणार असाल तर, निघण्यापूर्वीच तेथील निवासाची सोय करून घेणे कधीही चांगले. टूर कंपन्या किंवा एजंट या कामी आपल्याला उपयोगी ठरतात. पण सध्या अशी सोय पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांचे अ‍ॅप्स तुम्हाला सहज उपलब्ध होतात. हॉलिडे आयक्यू, मेक माय ट्रिप, ट्रिव्हागो अशा अनेक कंपन्या तुम्हाला पर्यटनस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व हॉटेलांची माहिती, दरपत्रक तेथील व्यवस्था तसेच छायाचित्रे किंवा व्हिडीओ उपलब्ध करून देतात. एवढेच नव्हे तर, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही संबंधित हॉटेलांमध्ये निवासाचा अनुभव घेतलेल्या पर्यटकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊ शकता. याखेरीज पर्यटनस्थळी आपल्या घरातील खोल्या कुटुंबांसाठी भाडय़ाने देणाऱ्यांचाही तपशीलही अशा अ‍ॅपवर उपलब्ध असतो. अशा घरगुती व्यवस्थेमुळे तुमचा राहण्याचा खर्च वाचतोच शिवाय तुम्हाला त्या पर्यटनस्थळावरील स्थानिक खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घेता येतो.

दुर्ग संपत्ती (Durg Sanpatti)

गड-किल्ल्यांना भेट देणाऱ्यांकरिता हे अ‍ॅप उपयोगी ठरेल. महाराष्ट्रातल्या विविध गड-किल्ल्यांची माहिती, इतिहास, नकाशा, दिशा, समुद्रसपाटीपासून त्याची असलेली उंची अशी सगळी माहिती अ‍ॅपवर उपलब्ध आहे. जलदुर्ग, नलदुर्गासारखे वनदुर्ग, गिरिदुर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांची माहिती या अ‍ॅपवर मिळवता येईल.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)