नमिता धुरी

फक्त एक योद्धा म्हणूनच नव्हे तर एक प्रशासक म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराज तितकेच सक्षम होते. महाराजांची ही दुसरी बाजू उजेडात प्रयत्न काही अभ्यासू तरुण इतिहासप्रेमी करीत आहेत.

senior scientist dr anil kakodkar
अग्रलेख : सुरक्षित सपाटांचे साम्राज्य!
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
mohan bhagwat remark on ram mandir
‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?
Rajabhau Waje
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

शिवजयंती हा असा सण नाही जो साजरा करून सोडून द्यावा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर अभिमान बाळगण्यापुरता मर्यादित ठेवावा का? चौथीच्या इतिहासात आपण महाराज वाचतो. पण ते अभ्यासतो का? महाराजांच्या इतिहासात जेवढे खोलवर जावे तेवढे हा इतिहास भरभरून देतो. काही तरुण छंद म्हणून तर काही करिअर म्हणून महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास आणि जमेल तसा प्रसारही करत आहेत. त्यासाठी मोडी, ब्राह्मी, खरोस्ती, ऊर्दू अशा विविध प्राचीन लिपी शिकण्याकडे तरुणांचा कल आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचे ७८ ते ८० प्रकार उपलब्ध आहेत. त्यात आज्ञापत्र, महजर, निवाडापत्र, फर्मान, इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक कागदपत्राच्या लेखनशैलीचा अभ्यास तरुण इतिहास संशोधक करत आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा एकमेव पर्याय राजकारण्यांना दिसतो. मात्र महाराजांच्या काळात दुष्काळ नव्हता का? महाराजांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर कसे उभे केले असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. स्वराज्याच्या चलनाचा अभ्यास करताना तत्कालीन अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो. महाराजांच्या काळातील शस्त्रेही तरुणांना खुणावतात. त्यांची युद्धकला अंगावर काटा आणते. सध्याच्या काळात प्रत्येकाला शस्त्र घेऊन फिरणे शक्य नसले तरी स्वसंरक्षणासाठीचे किमान डावपेच माहीत असायलाच हवेत, या हेतूने युद्धकलेचे प्राथमिक प्रशिक्षणही तरुण देत आहेत.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओढ मुंबईच्या कौस्तुभ कस्तुरे याला इयत्ता चौथीत असतानाच लागली होती. त्याने या लिपीचे प्रशिक्षण घेतले. १६७६ साली शिवाजी महाराजांनी प्रभावळी येथील सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात महाराजांनी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा उल्लेख आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच ज्याला जे कमी, उदाहरणार्थ धान्य, बैल, नांगर, पोटास धान्य इत्यादी या स्वरूपात भरपाईची सूचना महाराजांनी केली आहे. इतकेच नव्हे, तर शेतकरी उभा राहू लागल्यास त्या पुढच्या वर्षीपासून सरकारातून मदत केलेल्या मुद्दलाचे पैसे हळूहळू परत घेणे सुरू करावे. म्हणजे पूर्ण माफी न देता ती  पुन्हा वसूल करता येईल.

पाणीपुरवठा आणि बंधारे

१६७६ साली महाराजांनी रामदास स्वामींना दिलेल्या सनदेचा फोटोझिंकोग्राफ ब्रिटिश लायब्ररीत उपलब्ध आहे. ३३ गावांचा महसूल चाफळ येथील रामनवमी उत्सवासाठी लावून दिल्याचा उल्लेख यात आहे. वतनदारी पद्धत महाराजांनी पूर्णपणे बंद केली हा गैरसमज असल्याचे कौस्तुभ म्हणतो. त्या काळी प्रत्येक गावचा एक पाटील आणि त्याचा सहाय्यक कुलकर्णी, तसेच प्रत्येक मावळचा एक देशमुख आणि त्याचा सहाय्यक देशपांडे असायचा. यांना गावचा महसूल गोळा करण्याचा अधिकार असायचा. त्या बदल्यात पाणीपुरवठा करणे, बंधारे बांधून देणे ही कामे पाटील, देशमुख करायचे. काही वेळा महाराजांनी एखाद्या गावची पाटीलकी विकत घेतल्याचीही उदाहरणे कौस्तुभला त्याच्या अभ्यासात आढळली.

सोन्याचा होन

औरंगाबादच्या आशुतोष पाटील याला शाळेत असल्यापासूनच नाणी गोळा करण्याचा छंद होता. सध्या त्याच्या संग्रहात ६ हजार ५०० नाण्यांचा समावेश आहे. त्यातील २ हजार ५०० नाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात वापरली जात होती. यावर आधारित ‘स्वराज्याचे चलन’ या आशुतोषने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ६ जून २०१८ रोजी रायगडावर झाले. याच दिवशी १६७४ साली शिवराज्याभिषेका दिवशी स्वराज्याचे पहिले चलन अस्तित्वात आले होते. महाराजांनी विजयनगर साम्राज्याच्या ‘पागोडा’ या चलनाच्या धरतीवर सोन्याचा होन हे चलन सुरू केले. तसेच निजामशाहीतील चलनाच्या धरतीवर तांब्याची शिवराई सुरू केली. शिवराईचे वजन १२ ग्रॅम तर, सोन्याच्या होनाचे वजन २.८ ग्रॅम होते. शिवराईची किंमत १ पैसा तर, होनाची किंमत साडेतीन रुपये होती. चलन हे जनतेच्या सोयीचे असावे यदृष्टीने महाराजांनी त्याची रचना केल्याचे आशुतोष सांगतो. महाराजांच्या चलनाचे कधीही बनावटीकरण झाले नव्हते. यासाठी महाराजांनी काय व्यवस्था केली होती याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे, असे आशुतोषला वाटते. त्याने नाण्यांसोबतच त्यांच्याशी संबंधित काही कागदपत्रांचाही अभ्यास केला आहे.

तलवारी, पट्टा, कटय़ारी आणि बिचवा

ठाण्याचा प्रणय शेलार याने महाराजांच्या काळातील युद्धकलेचा प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. गड-किल्ल्यांच्या सभोवतालच्या बाजारातून मिळवलेली विविध प्रकारची शस्त्रास्त्रे त्याच्याकडे आहेत. त्याचा वापर प्रणयला अतिशय कुशलतेने करता येतो. ऐतिहासिक मालिका, चित्रपट, शिवचरित्र, शंभूचरित्रावरील महानाटय़ यात त्याने युद्धकलेचे सादरीकरण केले आहे. राजा शिवछत्रपती मालिकेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांनाही प्रणयने प्रशिक्षण दिले आहे. २०१६ साली राज्य सरकारने आयोजित केलेल्या रायगड महोत्सवातही त्याने युद्धकलेचे सादरीकरण केले होते. प्रणयने महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी युद्धात वापरलेली शस्त्रे आणि युद्धप्रकार यांचा अभ्यास प्रणयने सुरू केला. अशी ऐतिहासिक शस्त्रे संग्रहातसुद्धा असावी या प्रेरणेने गेली पाच वर्षे जुन्या ऐतिहासिक शस्त्रांचा संग्रह करायला सुरुवात केली. आज जवळजवळ  दीडशेहून अधिक शस्त्रे संग्रहात आहेत. अनेक तलवारी, धोप पद्धतीच्या परदेशी बनावटीच्या व मराठा बनावटीच्या तलवारी, पट्टा, कटय़ारी, बिचवा, वाघनखे, अनेक ढाली, सांग, वीट, विविध भाले, तोफगोळ्यांचा समावेश आहे.

महाराज दिशादर्शक म्हणून हवेत

महाराजांच्या शौर्यगाथा ऐकताना ऊर अभिमानाने भरून येतो. मात्र वास्तवात परतल्यानंतर आपल्याला असे काही शौर्य गाजवता येईल, अशी परिस्थितीच नसते. मग शिवाजी आमचे की तुमचे, आमच्या महाराजांचा अपमान करण्याची हिंमतच कशी होते अशा वादात तरुण पडतात. मिरवणुका काढून, भगवे फेटे घालून, पुतळ्याला हारतुरे घालून स्वराज्यप्रेम दाखवले जाते. पण या सगळ्याच्या पलीकडचे महाराज किती कळले? महाराजांचे प्रशासन, युद्धनीती, आप्तजनांशी त्यांची वागणूक, अर्थव्यवस्था, इत्यादी पैलू दुर्लक्षितच राहिलेले दिसतात.  महाराज अभिमान म्हणून नव्हे तर दिशादर्शक म्हणून तरुणांना हवे आहेत.