07 March 2021

News Flash

स्वयंचलित घरासाठी

घरांमध्ये स्वयंचलित यंत्रणा बसवण्याकडे ओढा वाढला आहे.

– समीर ए. एम.

‘स्मार्ट होम’ ही संकल्पना आता भारतात नवीन राहिलेली नाही. सध्या आलिशान गृहसंकुलांची उभारणी करताना तेथील घरांमध्ये स्वयंचलित यंत्रणा बसवण्याकडे ओढा वाढला आहे. अनेक ठिकाणी सदनिकाधारक स्वत:देखील अशा यंत्रणेचा अवलंब करू लागले आहेत. घराच्या सुरक्षेपासून देखरेखीपर्यंत अनेक गोष्टी ‘स्मार्ट होम’मुळे शक्य होत आहेत.

मुलांना घरात एकटे सोडून नोकरीवर जाणाऱ्या दाम्पत्यांची संख्या लक्षणीय आहे. अशी मंडळी घरापासून कितीही दूर असली तरी, त्यांचे अर्धे लक्ष आपल्या मुलांकडेच असते. मुलं गॅसशेगडीशी खेळतील किंवा पाण्याचा नळ सुरूच ठेवतील किंवा घरात कुणी अनोळखी शिरणार तर नाहीना, अशी चिंता या पालकांना सतत सतावत असते. अशा पालकांसाठी ‘स्मार्ट होम’ ही संकल्पना मोठा दिलासा ठरू शकतो. केवळ स्मार्टफोनच्या मदतीने घराची देखरेख करण्याची सुविधा या संकल्पनेतून मिळते. काही समस्या असल्यास सेन्सर्स ती शोधून काढतात आणि तुमच्या स्मार्टफोनवर लागलीच संदेश पाठवतात, उदा. जर सिक्युरिटी डोअर उघडे राहिले असेल किंवा टीव्ही चालू राहिला असेल.

‘होम ऑटोमेशन’ उपकरणे उपभोक्त्यांचे दैनंदिन जीवन सुकर आणि अधिक चांगले करण्यासाठी तयार करण्यात आली होती. सुरक्षा, मनोरंजन, कनेक्टिव्हिटी, टिकाऊपणा आणि संरक्षण यांसारख्या उपभोक्त्यांच्या बदलत्या गरजांना अनुरूप होण्यासाठी या उपकरणांत वेळोवेळी बदल होत गेले.

प्रगत टेक्नॉलॉजिकल वैशिष्टय़े असलेल्या अनेक इनोव्हेटिव्ह साधनांनी उपभोक्त्यांना तणावमुक्त केले आहे, उदा. कॅमेरा पाळत, स्मार्ट डोअर लॉकिंग सिस्टम, फायर डिटेक्शन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक सक्षम लायटिंग सिस्टम, इ. सध्या असलेल्या प्रणालीतच काही ऑटोमेटेड नियंत्रणयुक्त स्मार्ट उपकरणे जोडून स्मार्ट घर बनवता येणे आता सहज शक्य आहे.

अर्थात, घर स्मार्ट करणे हे केवळ ऑटोमेशन आणि स्वयंस्फूर्त उपकरणांपुरतेच मर्यादित असू नये, तर या उपकरणांनी विजेचा खपही कमी केला पाहिजे. अशा अनेक स्मार्ट टेक्नॉलॉजी सादर झाल्या आहेत, ज्या कमी वीज वापरतात आणि त्याच वेळी तुम्हाला अधिक आरामशीर ठेवतात. ऑटोमेटिक टायमर आणि मोशन डिटेक्टरच्या मदतीने विनाकारण सुरू असलेले दिवे आणि पंखे बंद करून त्या तुमचे विजेचे बिल कमी करण्यात हातभार लावतात. ऊर्जा बचतीसाठी लाइट डिमरदेखील वापरता येतात, ज्यांची तीव्रता प्रसंगानुरूप आधीच नक्की करून ठेवता येते.

होम ऑटोमेशन सिस्टम या स्वतंत्रपणे फक्त ऑटोमेशन सिस्टम असू शकतात किंवा संपूर्ण इन्टिग्रेटेड असू शकतात, ज्यात एका साध्याशा यूझर इंटरफेसवरून तुम्ही लायटिंग, ऑडिओ, हीटिंग, अ‍ॅक्सेस आणि थिएटर यांना सहज नियंत्रित करू शकता. ही स्वतंत्र साधने ऊर्जा बचतीचा उद्देश साध्य करतातच शिवाय त्यांच्यासाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकता असते व ती पैसे वाचवतात. उदा. आयरोबोट इंडियाची रूम्बा व्हॅक्यूम क्लीनर्स. हे रोबो क्लीनर्स घरातील पायऱ्या व वाटेतले सर्व अडथळे टाळून फर्निचरच्या खाली सहजगत्या जाऊ  शकतात. अशातली बरीचशी उपकरणे अ‍ॅमेझॉन अलेक्साच्या मदतीने आवाजाने, स्मार्टफोन अ‍ॅपचा उपयोग करून दुसऱ्या ठिकाणाहून नियंत्रित करता येतात, तसेच त्यात ऑटोमेटेड कामांसाठी आयएफटीटीटी (एक वेब आधारित सेवा) इन्टिग्रेट करता येऊ  शकते.

तुमच्या घरातील बहुतेक सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे आणि सिस्टम्स यांचे ऑटोमेशन सहजपणे होऊ  शकते आणि एका स्मार्ट डिव्हाइसद्वारे त्यांचे व्यवस्थापन होऊ  शकते तसेच त्यांचे स्वतंत्र नियंत्रणदेखील आपल्या हातात येते. होम ऑटोमेशनच्या सुरुवातीच्या काळात अनेक सिस्टम अशा रीतीने डिझाइन केलेल्या असत की, घर बांधताना किंवा घराची डागडुजी करताना सुरुवातीच्या टप्प्यात त्या सिस्टम्स बसवाव्या लागत, परंतु आता टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे. आता बरेच नवीन आणि प्रगत पर्याय आहेत, ज्यांच्यामुळे वर्तमान घरांमध्येदेखील या स्मार्ट सिस्टम्स बसवता येतात.

आपल्या घरांमध्ये या स्मार्ट टेक्नॉलॉजी आणण्यासाठी ग्राहकाला प्रेरित करणारी मुख्य परिबळे आहेत, खर्च करण्यासाठी हाती येणारा मुबलक पैसा, ऊर्जा बचतीला दिले जाऊ  लागलेले प्राधान्य आणि आरामशीर आयुष्य जगण्याची आकांक्षा. यातील काही उपकरणे महागडी असू शकतात, पण ती इतर खर्च उदा. विजेचा खर्च कमी करणारी असू शकतात, तसेच मनुष्यबळाची गरजही कमी करणारी असतात. एकदाच खर्च करून विकत घेतलेल्या या उपकरणांमुळे नंतर दीर्घ काळापर्यंत त्याचे मूल्य मिळते आणि घरातील अबालवृद्धांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. इंटरनेटचा प्रसार आणि सुरक्षेबाबतची वाढती दक्षता यामुळे आज समजूतदार घर-खरेदीदार स्मार्ट होम संकल्पनेकडे वळत आहेत.

(लेखक ‘बोनिटो डिझाइन्स’ या कंपनीचे संस्थापक प्रमुख आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:44 am

Web Title: home automation systems for a smart home
Next Stories
1 ऑफ द फिल्ड : मैदानात नसताना..
2 परदेशी पक्वान्न : व्हिएतनामीझ नूडल फो
3 घरातलं विज्ञान : भांडीकुंडी..
Just Now!
X