30 September 2020

News Flash

पेटटॉक : स्वावलंबी ‘माऊ’ची देखभाल हवीच

 मांजराची पिल्ले ही खूप खेळकर असतात त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जागा असावी

रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

श्वानांपेक्षा मांजर पाळणे सोपे असल्याचा समज पार पूर्वीपासून कायम राहिलेला आहे. मात्र श्वानाइतकीच मांजरीचीही देखभाल करण्यास पुरेसा वेळ द्यावाच लागतो.

प्राणी पाळायची टूम मोठी घरे असलेल्या एकत्रित कुटुंबांतून सुरू झाली असली, तरी आता शहरगावांमध्ये कुटुंबव्यवस्था आणि घरांची जागा आक्रसत चालली आहे. परिणामी सध्या बहुतांश हौशी प्राणीपालक श्वान आणि मांजर यातून एकाची निवड करतात. त्यात श्वानांपेक्षा मांजर पाळणे सोपे असल्याचा गैरसमज पार पूर्वीपासून कायम राहिलेला आहे. मात्र श्वानाइतकीच मांजरीचीही देखभाल करण्यास पुरेसा वेळ द्यावाच लागतो.

जगभरात पाळीव मांजरांमध्ये साधारण ७५ ते ८० प्रजातींची नोंद वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा असून ४० प्रजाती अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच हायब्रिड  किंवा मिक्स ब्रिड प्रजातींचा समावेश आहे. हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे ब्रीडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे ब्रीडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी वैशिष्टय़े दिसली तर त्याची नोंद मिक्स ब्रीड म्हणून केली जाते. मांजर पाळायला घेताना प्रत्येक प्रजातीची वैशिष्टय़े आणि त्यांच्या गरजा यांचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते.

यावर लक्ष द्या..

कुत्र्यापेक्षा मांजर स्वावलंबी असते. मात्र म्हणून मांजराला खाणे देण्यापलीकडे बाकी काही करावे लागत नाही अशी चुकीची धारणा आहे. मांजरांनाही सवयी लावणे, वेळ देणे आवश्यक असते. ते लहान जागेतही राहू शकते. घरात मांजर आणताना त्याचा एक हक्काचा कोपरा असावा. मांजराला त्याची जागा खूप प्रिय असते. त्यासाठी कॅटहाऊसचा विचार करता येऊ  शकतो. त्या कोपऱ्यात स्क्रॅच पॅड, खाणे आणि महत्त्वाचे म्हणजे पिण्यासाठी स्वच्छ आणि भरपूर पाणी असणे गरजेचे असते. स्थानिक प्रजातींची मांजरे घरी तयार होणारे पदार्थ खातात. बहुतेक परदेशी मांजरांसाठी मात्र तयार मिळणारे खाद्य हा सोयीचा पर्याय असतो. मांजरे नेहमी नखे घासत असतात. त्यासाठी स्कॅ्रचपॅड नसेल तर फर्निचर, गाद्या यावर त्यांच्या नखांचे ओरखडे उठणे स्वाभाविक आहे. मांजराला नैसर्गिक विधीची जागा कळण्यासाठी ‘लिटर बॉक्स’ हवा ठरतो.

भवतालाची काळजी..

मांजराची पिल्ले ही खूप खेळकर असतात त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जागा असावी. मांजरांना साधारणपणे झाडांची पाने, पाती चावायला आवडतात. त्यामुळे घरातील शोभेची झाडे विषारी नाहीत, ना याची पडताळणी करायला हवी. मांजरांना बांधून ठेवणे शक्य नसते त्यांचा घरभर मुक्त वावर असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे विद्युत उपकरणे, वायर्स यांची काळजी घ्यावी लागते.

मांजर पालकांचा कल..

अद्यापही बहुतेक घरांमध्ये स्थानिक प्रजातींची मांजरे पाळण्याकडे कल असतो. मात्र पर्शिअन ही मूळ इराणमधील आणि युरोपीय देशांनी विकसित केलेली प्रजाती. मूळ तुर्कस्तान येथील तुर्कीश अंगोरा, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, रॅग डॉल, माईन कुन, मूळ थायलंडमधील सयामी या परदेशी प्रजाती पालनाकडेही कल वाढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 2:29 am

Web Title: how to take care of selfdependent cats zws 70
Next Stories
1 पूर्णब्रह्म : पालक पनीर
2 कोड समज-गैरसमज
3 सौंदर्यभान : बोटय़ुलिनम टॉक्सिन
Just Now!
X