26 October 2020

News Flash

करोनाष्टक : वाचनाचे वेड

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत

संग्रहित छायाचित्र

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

coronafight@expressindia.com

वाचनाचे वेड

* चंद्रशेखर सावंत, मुलुंड

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे परिणाम पाहता, आपल्या देशाने टाळेबंदीचा निर्णय घेतला. जो अतिशय महत्त्वाचाच होता. मुंबईसारख्या धावत्या शहरात मात्र प्रत्येकाला प्रश्न पडला होता, घरी बसून करायचे काय? खरे तर या महानगराला आणि इथल्या जवळपास सर्वानाच वेगाचे वेड आहे. आपण सारे सतत धावत असतो. शहर सतत वाहत असते. त्यामुळे हा एक मोठाच धक्का होता. सुरुवातीला मीही असाच विचार करत होतो. फार कं टाळलो होतो, पण मग पुस्तके  आठवली. ती जणू मला म्हणत होती, ‘अरे आम्ही आहोत ना, आमच्याशी बोल, गप्पा मार.’ मग सगळी पुस्तके  एक एक करून बाहेर काढली.  टाटायन, अन्यथा, गॉडफादर, बराक ओबामा, व्यक्ती आणि वल्ली, सखी, झोपाळा, भुलभुलैया, महोत्सव, सारे प्रवासी घडीचे, मृत्युंजय, ज्ञानेश्वरी, अग्निपंख अशी बरीच पुस्तके सापडली. ती नव्याने वाचतानाही छान अनुभव मिळाला. पुस्तके  प्रत्येक वाचनाच्यावेळी आनंद देतात, बरेच काही शिकवतात. नवे काही शिकवतात. वाचनानंतर उरलेल्या वेळात बातम्या ऐकणे, रामरक्षा म्हणणे, प्राणायाम, थोडासा व्यायाम करणे यात दिवस निघून जातो. पण कधी कधी कं टाळा येतोच. अशा वेळी आठवतात ते या संकटकाळातही बाहेर पडणारे, जीवाची बाजी लावून करोनाशी लढणारे, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षा राखणारे पोलीस, आर्थिक व्यवहार सुरळीत राहावे म्हणून कार्यरत असलेले बँक कर्मचारी या साऱ्यांना पाहिल्यावर खरोखरच डोळे भरून येतात. या सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांचा आदर राखण्यासाठी आपण सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे, हे लक्षात येते. आपण सगळेच ते लक्षात घेऊ आणि घरात राहू. करोनाला पळवून लावू.  करोनाने शिकवलेला स्वच्छतेचा धडा मात्र कायमचा लक्षात ठेवू.

सूर्यनमस्काराचे महत्त्व

* श्रीनिवास पुराणिक, ठाणे

औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी मा. भवानराव यांनी ‘सूर्य नमस्कार’ नावाचे एक अभ्यासपूर्ण असे छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. मला स्वत:ला या पुस्तकातील मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरले. ऑक्टोबर २००० मध्ये मधुमेहाचे निदान झाल्यानंतर मी सूर्यनमस्कार घालायला लागलो. आणि डॉक्टरांचा सल्ला, पथ्यपाणी, शास्त्रशुद्ध पद्धतीने घातलेले सूर्यनमस्कार या साऱ्याचा माझ्या आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम मला दिसून आला. करोनाच्या या संकटकाळात जेव्हा आपण घरीच राहायचे आहे, व्यायाम करण्यासाठी अगदी लहानशा फे रफटक्यासाठीही आपण बाहेर जाऊ शकत नाही, अशा वेळी घरातल्या घरातच सूर्यनमस्कार घालणे, हा एक उत्तम व्यायाम आहे. या टाळेबंदीच्या काळात मी दररोज न चुकता सूर्यनमस्कार घालतो आणि माझ्या मित्र-परिवारालाही त्याचे महत्त्व समजावून  सांगत आहे.

खाणे आणि खिलवणे

* पूजा वैभव खैरनार, नवी मुंबई

टाळेबंदीमुळे घरूनच काम करावे लागत आहे, त्याचे खरे तर बरे वाटले. कारण रोजच्या धावपळीमध्ये दिवस कसे जायचे, काहीच कळत नसे. सकाळी घाईघाईने आवरून बकोटीला पिशवी मारून घामाघूम होत प्रवास करायचा आणि कार्यालय गाठायचे. संगणकासमोर बसून एकीकडे मोबाइल आणि एकीकडे लॅपटॉप.. दुपारी कसेतरी एका हाताने जागेवरच जेवायचे. संध्याकाळी पुन्हा गर्दीतून घरी पोहोचायचे. हे सगळे घरीच काम करायचे असल्याने थांबणार, प्रवासाची दगदग संपणार, असे वाटत होते. पण हा आनंद चार दिवसांत ओसरला. रोजची गडबडच बरी, असे वाटायला लागले. मग आम्ही या टाळेबंदीच्या काळात काय करायचे, यावर विचार करायला सुरुवात के ली. वेगवेगळे पदार्थ शिकायचे, करायचे, खायचे. गुलाबजाम, पाणीपुरी, कचोरी, इडली सांबार, वडापाव, पावभाजी असे अनेक पदार्थ झाले. आता वेळ कसा जातो ते कळतंच नाही. कंटाळा जाऊन नवा उत्साह वाटू लागला आहे. दोघांनी बनवलेला एखादा मस्त पदार्थ एकमेकांच्या संगतीत खाणे,  पु. ल. देशपांडेचे किस्से ऐकणे, जुने सिनेमे, मालिका पाहणे, मस्त वेळ जाऊ लागला. घरातील कुंडय़ांना पाणी घालतानाही मस्त गाणी गुणगुणू लागलो. झाडाचे निरीक्षण करायचे रोज राहूनच जात होते, ते करू लागलो. अशाप्रकारे एकू णच हा टाळेबंदीचा काळ आम्ही मजेत घालवत आहोत. अर्थात अजिबात घराबाहेर न पडता!

समाजसेवेचा आनंद

* सत्येंद्र राठी, पुणे

करोनामुळे माजलेला हाहाकार पाहता टाळेबंदी होणार, हे अपेक्षित होतेच. पण मग दिवस कसा घालवायचा, हा  पेच होता. वर्तमानपत्र घरी येत नसल्याने दिवसाची सुरुवातही मलूलच होत होती. घरात मी, पत्नी मोनिका,  दोन मुली आणि आई असे पाच जण राहतो. या तिन्ही पिढय़ांची सांगड घालायची म्हणजे सोपे काम नाही. आमच्याकडे के बल नाही. के वळ दूरदर्शन. पण त्यांनीच आधार दिला. रामायण, चाणक्य या मालिका सारे एकत्र बसून पाहतोच. रामायण बघताना विवेकबुद्धी, साधेपणा, नावडत्या स्थितीतही नात्याविषयी आदर बाळगणे, नैतिकता या गोष्टी मुलींपर्यंत पोहोचू लागल्या. गमतीने मी त्या दोघींना राम-लक्ष्मणाप्रमाणे रामी-लाखी अशी टोपणनावेही दिली.

मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे मी वाचलेल्यातील चांगले काही मुलींना सांगत असतो. आमच्यातील संवादही खूप वाढला आहे. दुपारी आम्ही सारे मिळून चौपड हा खेळ खेळतो. तास-दोन तास त्यात सहज निघून जातात. माझ्या दिवंगत आजीचा हा चौपड संच आहे. त्यामुळे तो खेळताना तिची आठवणही निघतेच. आई वगळता बाकी सगळे मिळून सामूहिक प्राणायाम, ओंकार साधना, सूर्यनमस्कार, सिंह क्रिया करणे सुरू केले आहे. स्वयंपाकघरातील कामे पत्नी आणि मुली मिळून करत आहेत. सगळे जण वेळोवेळी हात धुतात आणि इतर धुतात की नाही, यावर नजरही ठेवतात.

आमच्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाची पत्नी टाळेबंदीमुळे माहेरीच अडकल्याने त्याच्या कु टुंबाच्या भोजनाची व्यवस्थाही आम्ही करतो, यात माझ्या मुली महत्त्वाचा वाटा उचलतात. आमच्या श्रीराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, मुकुंद भवन ट्रस्टच्या माध्यमातून रोज पाचशे गरजू लोकांसाठी भोजनाची पाकिटं बनविण्यात येतात. अशी सहा केंद्र असून रोज अंदाजे तीन हजार लोकांची दुपारच्या आहाराची सोय केली जाते. या कार्यामध्ये मी आनंदाने सहभाग घेतो. मदत करतो. जबाबदारी स्वीकारतो.

तसेच डॉक्टरांना पीपीई किट्स, शिल्ड मास्क, इत्यादी सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यासही कार्यरत आहे. पोलीस स्टेशनजवळ सॅनिटायझर युनिटस्ही उभे केले आहेत. एकटय़ा दुकटय़ा राहणाऱ्या वृद्धांच्या जेवणाची तजवीज करून देण्याचाही आमचा प्रयत्न असतो. टाळेबंदीच्या या दिवसांत समाजसेवा करून अशाप्रकारे पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आनंदी राहू

* अनुराज, परभणी

मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. परभणी शहरात राहतो. सध्या टाळेबंदीमुळे महाविद्यालयही बंद आहे. दिवसाची  सुरुवात सूर्यनमस्काराने होते. मनाचे श्लोक वाचतो. त्यातून एक आंतरिक बळ मिळते.  सध्या मी छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र ‘छावा’ वाचत आहे. त्याबरोबरच सुरेश भट यांच्या कविता वाचतो. दिवसभरातील जास्त वेळ वाचनाचा आनंद घेतो.

कुटुंबासोबत कॅरम आणि लुडो खेळण्याचा आनंद घेतो. संध्याकाळी शेजारच्या मुलांना बुद्धीबळ शिकवितो. मला कविता करायला आवडते, त्यामुळे कविता करण्याचे प्रयत्न सुरू असतात. तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

वृत्तवाहिन्या पाहणे मात्र कटाक्षाने टाळतो.  या काळात महत्त्वाचे म्हणजे आपण निराशेवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे चांगल्या कामात स्वत:ला गुंतवू या.

जरा डोके  चालवा

* सोहम संतोष पोवळे, रसायनी

मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली. पेपर संपले आणि ठरवले, आता दोन दिवस मस्त मित्रांसोबत धम्माल करायची. मग सीईटीच्या तयारीला लागायचे. पण तेवढय़ात टाळेबंदी झाली आणि सारेच नियोजन गडबडले. सुट्टी कशी घालवायची,  हा प्रश्न होता. मोबाइल होता पण सतत तोच तो घेऊन मग त्याचाही कं टाळा आला. मग मी माझे छंद आठवले. मला निरनिराळ्या आकाराचे दगड जमवण्याची आवड आहे. त्याचबरोबर रुबिक क्यूब सोडवायचीही आवड आहे. दगड शोधायला घराबाहेर कसे पडणार मग रुबिक क्यूबच उरले. दूरदर्शनवरच्या एका कार्यक्रमात पाहिले की, एक मुलगा डोळ्यांना पट्टी बांधून रुबिक क्यूब सोडवत होता. मीही ठरवले की आपणही असा प्रयोग करून पाहायचा. त्याप्रमाणे सराव करू लागलो. सलग तीन आठवडय़ांच्या सरावानंतर मीही डोळे बांधून रुबिक क्यूब सोडवण्यात यश मिळवले. आता डोळे बांधून मी चार मिनिटांत रुबिक क्यूब सोडवतो.

अर्थशास्त्राचे मर्म

* महेश जरळी, मुंबई

देशात टाळेबंदी लागू झाली आणि एकूण दिनक्रमच बदलून गेला. समोर असलेल्या या वेळाचे करायचे काय, हा एक नवीन प्रश्नच उभा राहीला. सुरुवातीला वर्तमानपत्रांच्या ई आवृत्याही मिळाल्या नव्हत्या, पण यथावकाश त्याची माहिती मिळवली. आणि थोडासा दिलासा मिळाला. लोकसत्तासह इतरही वर्तमानपत्रे वाचणे सुरू झाले. व्यायामाची आवड आहे, पण व्यायामशाळाच बंद मग घरीच जमेल तेवढा व्यायाम करायला सुरुवात के ली. कपाटातील जुनी पुस्तके ही पुन्हा वाचली, त्यांची नीट मांडणी के ली.

याचबरोबर मी एक वेगळा उपक्रमही करत आहे. मला अर्थशास्त्राची आवड आहे त्यामुळे करोनाकाळातील ढवळून निघालेल्या अर्थव्यवस्थेची विविध स्रोताद्वारे माहिती घेत आहे. सोबतच अर्थविषयक घडामोडींमध्ये रस असलेल्या मित्रांचा एक समूह ऑनलाइन तयार के ला आहे. त्यातून अर्थविषयक माहितीची देवाणघेवाण चालते. चर्चा होते. या चर्चेतून अर्थशास्त्राचे मर्म समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 3:05 am

Web Title: readers share their creative activities during lockdown abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 तारांगण घरात : वाचन, लेखनात रमलो
2 तारांगण घरात : मुलींसोबत वेळ घालवतो
3 करोनाष्टक : बालगीतांना उजाळा
Just Now!
X