करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय आणि विजय शेटे, मु.पो. तारापूर, ता. पंढरपूर</strong> : आम्हा जुळ्या भावांची नुकतीच भारतीय लष्करात निवड झाली. प्रशिक्षणासाठी जाणार एवढय़ात संपूर्ण भारतात टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे आम्हाला घरीच थांबावे लागले. टाळेबंदीमुळे बाहेरचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले होते, पण आपल्या मनाचे दरवाजे उघडण्याची संधी होती. घरात बसून कंटाळा तर येणारच होता, परंतु तो दूर करण्यासाठी आम्ही नियोजन तयार केले. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे. यापूर्वीही करतच होतो, परंतु शारीरिक व मानसिक क्षमता वाढवण्यासाठी या निवांत काळात व्यायामात वाढ केली. त्यामध्येही व्यायामाचे नवीन प्रकार शिकणे, योगा, प्राणायाम, स्ट्रेचिंगचे व्यायाम, इ. प्रकार शिकलो आणि शिकत आहोत. आम्ही ग्रामीण भागात शेतात राहत असल्यामुळे शेतातील कामांमध्ये घरच्यांना मदत करणे. त्यामध्ये फवारणी, कोळपणी, मळणी, पिकांना पाणी देणे ही सर्व कामे करणे. तसेच या कडक उन्हाळ्यात शेतातील घनदाट झाडाच्या सावलीला दुपारी गाढ झोप घेण्याचा आनंदही घेत आहोत. या सगळ्यासोबतच आवडते सिनेमे, वेबमालिका, न्यूज ऑन एआयआर या अ‍ॅपवरून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणेही सुरू आहे. आम्ही आमच्या आवडत्या विषयातून म्हणजे अर्थशास्त्रातून बीए करत आहोत. शेवटचे सत्र राहिल्याने त्याचाही अभ्यास चालू आहे. खरेतर आम्ही ‘लोकसत्ता’चे नवीन वाचक आहोत. आम्ही ‘लोकसत्ता’च्या ई-आवृत्तीचे रोज न चुकता वाचन करतो. आम्हाला त्यामधून भरपूर अर्थविषयक वाचायला मिळते. तसेच अच्युत गोडबोले यांचे ‘अर्थात’ हे अर्थशास्त्रावरील पुस्तक वाचून काढले. तसेच इतरही संग्रही असणाऱ्या जुन्या पुस्तकांचा नव्याने आस्वाद घेत आहोत. तसेच आम्ही चौघे भाऊ रोज विविध विषयांवर चर्चा करत आहोत. अशा प्रकारे आम्ही व आमचे भाऊ, आई-वडील या टाळेबंदीच्या कठीण काळात स्वविकासासाठी मिळालेल्या नव्या संधीचा उपयोग करून घेत आहोत.

अविस्मरणीय वाढदिवस

संध्या पांडे, हैद्राबाद : खरं तर आता वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या गोष्टींचे अप्रूप वाटण्यापलीकडचे आमचे दिवस. पण यंदा तर सर्व वेगळेच आहे. २२ मार्चपासूनच आपला देश करोनाने थांबवून ठेवलाय. टाळेबंदीने आपल्या साऱ्यांना जणू स्तब्धच के ले आहे. या काळात सामान्य जनता खूपच भयभीत झाली होती. प्रत्येकापुढे होते फक्त प्रश्न आणि प्रश्नच. ऑनलाइनच्या तंत्रामुळे अनेक प्रश्न सुटले. घरातूनही कार्यालयाचे काम सुरू झाले.  आम्ही मुंबईत मुलुंड येथे राहतो. फेब्रुवारीमध्ये हैदराबादला मोठा मुलगा हर्षद याच्याकडे आलो.  मार्चअखेर परतीचे तिकीट होते. पण त्याआधीच टाळेबंदी झाली आणि आम्ही तिथेच थांबलो. इथे लहानगा नातू मिहीर आहे. त्याला गोष्टी सांगण्यात, त्याच्याशी खेळण्यात छान वेळ जातो. रोज सकाळी सारे व्यायाम करतो. मग मोबाइलवर वृत्तपत्रांच्या ई-आवृत्तीचे वाचन, शनिवार, रविवारी यूटय़ूबवर छानसे नाटक पाहणे, नवे पदार्थ करणे यात वेळ कसा जातो कळतच नाही. बातम्या पाहून हे संकट किती तीव्र आहे, याची जाणीव होते आहे. परंतु सरकारने घालून दिलेले नियम पाळणे महत्त्वाचेच आहे. गुढी पाडवा,अक्षय्य तृतीया यांसारखे आपले सणही यातच गेले. एप्रिलमधील माझ्या वाढदिवसाला सून प्रणिता हिने बासुंदी-पुरी के ली. मला नवी साडी नेसायला लावली. रांगोळी काढली.  यानंतर ६ मे रोजी आमचा लग्नाचा वाढदिवस असतो. तो मुंबईत सर्वानी मिळून साजरा करायचा असे ठरले. पण टाळेबंदी हटेना. मग कसचे काय. त्यामुळे लग्नाचा एक्के चाळीसावा वाढदिवसही हैद्राबादमध्येच साजरा झाला. सकाळपासूनच नातेवाईकांचे फोन आणि व्हिडीओ कॉल चालू होतेच. प्रणिताने श्रीखंड -पुरी, आमरस, बटाटय़ाची भाजी, मसालेभात असा सुंदर बेत केला होता. केकही तयार झाला. संध्याकाळी आम्हा दोघांना तिने औक्षण केले. नातू मिहीरने स्वत: रंगवलेले ग्रीटिंग कार्डही दिले. संध्याकाळी छान सरप्राइज मिळाले. मुलुंड येथे राहणारा लेक निनाद आणि सून श्रेया यांनी व्हिडीओ कॉल के ला. रोजच्यासारख्या गप्पांबरोबरच आमच्यासाठी गमतीशीर प्रश्नमंजूषा होती. त्याच्या उत्तरांना गुणही राखलेले होते. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या कार्यक्रमात मस्तपैकी तास-दीड तास गेला. शेवटी उखाण्यांचा छान कार्यक्रम झाला. रात्री खूप वर्षांनी पत्ते खेळलो. अशा रीतीने बाहेर कु ठेही न जाता हा दिवस अतिशय अविस्मरणीय ठरला.  आपणही सर्वानी घरीच राहू, सुरक्षित राहू.

डोक्याला खुराक

क्षमा एरंडे, पुणे : करोनाने साऱ्यांनाच घरात जखडून ठेवले आहे. पण या काळात आपण सारे सकारात्मक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी डोक्याला काहीतरी काम हवे. काहीजणांना कार्यालयीन कामे आहेत पण तरीही शिणवटा येतोच. मग अशावेळी एखादी कला जोपासण्याने किं वा बुद्धिला चालना देईल असे काही के ल्याने थोडे तरतरीत वाटू शकते. मीही हाच विचार के ला आणि एक उपक्रम हाती घेतला.

मला पूर्वीपासून वर्तमानपत्रातील कोडी सोडविण्याची आवड होती. निवृत्तीनंतर हीच आवड माझा एक छंद बनून गेली आणि मी स्वत: कोडी बनविण्यास सुरुवात केली. फोनवरून वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप गटांवर मी ही कोडी पाठवू लागले. त्याला छान प्रतिसाद मिळाला. आपल्याबरोबरच इतरांच्याही स्मरणशक्तीला जरा उजाळा मिळावा म्हणून मी चक्क फे सबुकवर एक पेजच सुरु के ले. तिथेही उत्तम प्रतिसाद मिळाला. या टाळेबंदीच्या काळात माझ्या कोडय़ांना विशेष मागणी येत आहे. मी तयार के लेली ही शब्दकोडी काळ्या पांढऱ्या चौकटीतली नसून मी काही संकेत देते, त्या वरून ती ओळखायची असतात. उदा. चार अक्षरी शब्द सांगा ज्याच्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार आहे किं वा काही वाक्यांमधून पुण्यातील प्रसिध्द ठिकाणे शोधा किंवा गणपतीची नावे शोधा, तीन अक्षरी असे शब्द सांगा ज्याचे शेवटचे अक्षर ‘त्र‘ असेल..वगैरे वगैरे. आता माझ्या कोडय़ांनीही हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही कोडी बनवताना खूप अभ्यास करावा लागतोच. दोन दोन तीन तीन दिवसांची कोडय़ांची बेगमी करून ठेवावी लागते. गुगल आणि मराठी शब्दकोषाचीही मदत होते. पण या सगळ्या धडपडीमध्ये आनंद आहे. मुख्य म्हणजे आपला वेळ सत्कारणी लागतो आहे, फु कट जात नाही, अशी भावना आहे.

विनोदाचा आधार

डॉ. दुष्यंत कटारे, बाभळगाव, लातूर : सध्या सगळ्या वाहिन्यांवर नवीन कार्यक्रम सुरू नाहीत, जुन्याच मालिका दाखवल्या जातात. त्यातही विनोदी मालिका आम्ही मुद्दाम पाहत आहोत.  महाराष्ट्राची हास्यजत्रा, चला हवा येऊ द्या, एक टप्पा आऊट, तारक मेहता का उल्टा चष्मा अशा सगळ्या मालिका आम्ही आवर्जून पाहतो आणि पोट धरधरून हसतो. करोनाच्या या संकटकाळात आपण सर्वानीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु घरात राहून आपले मानसिक आरोग्यही संतुलित राखायला हवे. त्यासाठी खळखळून हसण्यासारखा व्यायाम आणि उपाय नाही. आम्ही सारेचजण या विनोदी मालिकांचा आधार घेत, करोनामुळे येणाऱ्या नकारात्मकतेवर मात करत आहोत. विशाखा सुभेदार, समीर चौगुले, डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम हे सारे आपल्या घरातील वाटतात. त्यांच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हसू फु लते. मनातल्या चिंता, काळज्यांना पूर्णविराम मिळतो.

रुग्णालयातील दिवस

शिवाजी गावडे : निवृत्तीच्या दिवसांत सुट्टीचा आनंद घेत होतो. या दिवसांत माझा सर्व वेळ साहित्यिक कार्यक्रम आखणे आणि ते तयार करण्यातच जात होता. परंतु करोनाचा वणवा जगभर पेटला आणि इतरांप्रमाणे मीही घरातच कै द झालो.  ‘लोकसत्ता’त आलेले माझे आणि इतरांचे जुने लेख, पुस्तक परीक्षणे, कविता वाचू लागलो. ते शोधताना मी लिहिलेले अनेक अर्धवट लेख आणि  केलेल्या कविता सापडल्या. त्याचे पुस्तक करावे, असे एका पत्रकार मित्राने सुचवल्याने मी हे साहित्य गोळा करण्याचे काम करत होतो. दरम्यान मला पोटाचा थोडा त्रास जाणवू लागला. हा शारीरिक त्रास एवढा वाढला की यावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे कळले.  माझ्या पोटातील सुमारे दीड किलोचा मांसाचा गोळा फोर्टीस रुग्णालयातील डॉ. अरुण बेहेल यांनी बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि कठीण होती. त्यामुळे ती उत्तम करून मला संकटातून बाहेर काढल्याबद्दल रुग्णालयाचे आणि डॉक्टरांचे आभार. तसेच मला या दरम्यान मदत करणाऱ्या सर्वाचेच आभार मानतो.  रुग्णालयातील वास्तव्यात सतत भीती होतीच, पण मन रमवण्यासाठी वाचनही करत होतो. दररोज ‘लोकसत्ता’ची ई-आवृत्ती वाचत होतो.

मी फु लराणी

मंजूषा किरण शेलार, फ्रान्स : माझे बालपण अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर पती किरण यांच्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक, मुंबई, डेन्मार्क,  जर्मनी अशी भ्रमंती करत आम्ही पाच वर्षे एक्स एन प्रोव्हिन्स फ्रान्स येथे स्थिरावलो आहोत. सगळे ठीकठाक चालले असताना अचानक करोना आला आणि सारेच जनजीवन विस्कळीत झाले.

फ्रान्समध्ये १२ मार्चला टाळेबंदी जाहीर झाली. सुरुवातीला सारेच गांगरलो. पण मग किरणचे काम आणि मुलींच्या शाळा ऑनलाइन सुरु झाल्या. मलाही बागकामासाठी जास्त वेळ मिळू लागला. बंगल्याभोवतीच्या जागेत २०-२५ फळा-फु लांची झाडे लावली आहेत. गुलाब, जरबेरा, जेरेनियम, फु के शिया, सिक्लमन, पॉसे, जास्वंद अशी फु लझाडे तर लिंबू, स्ट्रॉबेरी, चेरी, ऑलिव्ह ही फळझाडे, कढीपत्ता, पुदिना, ओरेगानो, रोमेरो ही स्वयंपाकात  वापरली जाणारी पानेही आहेत.

आम्ही राहतो त्या परिसरात लव्हेंडरची शेती के ली जाते. जांभळ्या रंगाच्या या मंद सुवासिक झुपक्यांना पाहण्यासाठी जूनमध्ये पर्यटकांची गर्दी होते. या फु लांपासून आइस्क्रीम, मद्य, सुवासिक तेल अशा अनेक गोष्टी तयार होतात. या सगळ्या बागकामात मी छान रमले आहे. सोबतच पुस्तके  वाचणे, चित्र काढणे हे छंदही जोपासत आहे. सध्या फ्रेंच भाषेचे धडेही घेते आहे.  ऋजुता आणि मनस्वी या माझ्या दोन मुलीही बागेत आवडीने काम करतात. ते करताना करोनाच्या संकटाचे मळभ दूर पळून गेल्यासारखे वाटते.

कागदापासून कला

दादासाहेब येंधे, मुंबई : टाळेबंदीमुळे घरात बसून मुलांनाही कंटाळा आला आहे. अशा वेळी मुलांना घरातच काही हलकीफु लकी कामे शिकवायला सुरुवात के ली आहे. कु टुंबात छान संवाद होतो आहे. प्रदूषण कमी झाल्याने शुद्ध हवा मिळते आहे. मी वर्तमानपत्रातील माझ्या लेखांची कात्रणे काढून त्यांचा संग्रहसुद्धा करत आहे. परीक्षा रद्द झाल्याने मुलेही खूश आहेत. पण अभ्यास नसल्याने त्यांचा वेळ कसा जावा, हा प्रश्नही आहेच. मग मोबाइलवर गाणी ऐकणे, नाचणे, योगा करणे, विविध चित्रे काढणे सुरू आहे. मी आणि मुले मिळून जुन्या वृत्तपत्रापासून, घरातील कागदांपासून वेगवेगळ्या कलाकृती बनवतो आहे. आमच्या बालपणीच्या गमतीजमती, कृष्णधवल दूरचित्रवाणी संचाची गंमत अशा गोष्टी मी मुलांना सांगत असतो. खऱ्या अर्थाने मुलांचे बालपण अनुभवायला मिळत आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activities for lockdown activities at home during lockdown zws
First published on: 13-05-2020 at 02:59 IST