शनिवार

सटाणा-मालेगावर रस्त्यावर सौंदाणे फाटय़ावरून २० कि.मी. वर असलेला दुंधा किल्ला पाहायला जावे. अगदी छोटेखानी किल्ला आहे. जंगलातील पायवाटेने गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात. तिथून किल्ल्यावर प्रवेश होतो. तिथे महादेव मंदिर आणि पाण्याची टाकी आहेत. परत येताना वाटेत देवळाणे इथे यादवकालीन अप्रतिम शिल्पकाम असलेले शिवमंदिर आहे. त्यावरील शिल्पे, मकरप्रणाल पाहून थक्क व्हायला होते. तिथून सटाण्याकडे परत येताना छोटासा अजमेरा किल्ला पाहावा. याला लागून असलेला सुळका लक्ष वेधून घेतो.

रविवार

सटाण्याच्या उत्तरेला ताहराबादकडे जावे. इथून साल्हेर-मुल्हेर किल्ले पाहता येतात. इथेच समोर असलेले मांगी-तुंगीचे सुळके लक्ष वेधून घेतात. वर जाण्यासाठी ३ हजार पायऱ्या आहेत. परंतु त्या चढायला अगदी सोप्या आहेत. नाहीतर डोलीची सोय आहे. हे जैन मंडळींचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दोन्ही सुळक्यांच्या पोटात खोदलेली लेणी पाहावीत. र्तीथकरांसोबत अनेक जैन मुनींची शिल्पे कोरलेली आहेत. खाली आल्यावर मुल्हेर गावात जावे. उद्धव महाराजांचा मठ आणि तिथे लाकडी खांबांवरील शिल्पकाम पाहावे. ट्रेकिंगची तयारी असेल तर शेजारीच असलेला मुल्हेर किल्ला आणि नंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेला साल्हेरचा किल्ला पाहावा. मात्र यासाठी स्वतंत्र दिवस हवा. परत येताना आलियाबाद इथले प्राचीन दगडी शिवमंदिर पाहावे. मोसम नदीच्या खोऱ्यातला हा प्रदेश समृद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ashutosh.treks@gmail.com