प्रशांत ननावरे

केरळातील बॅकवॉटर्स म्हणजे निसर्गाची अफाट किमया आहे. त्याची अनुभूती घ्यायची असेल तर अलेप्पीला जाऊन वेम्बेनाड लेक व काठावर वसलेल्या कुमारकोम या छोटय़ा गावाला भेट द्यायलाच हवी.

मीनाचील, पंबा, मनिम्ला आणि पेरियार या मुख्य नद्या वेम्बेनाडला मिळतात. दक्षिणेकडील बाजूस, अलापुझा बॅकवॉटर आणि उत्तरेला लेक थेट कोचीनच्या समुद्राला जाऊन मिळतो. याच लेकमध्ये हाऊसबोट २४ तासांसाठी किंवा शिकारा पद्धतीच्या लहान बोटी चार-पाच तासांसाठी भाडय़ाने घेता येतात. नाविक तुम्हाला वेम्बेनाड लेकच्या आजूबाजूला वसलेल्या गावांच्या आणि बेटांच्या कडेकडेने फिरवून आणतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळच्या बॅकवॉटरमधला खजिना म्हणजे करीमीन मासा. लेकच्या काठावर असलेल्या छोटेखानी हॉटेलमध्ये हा मासा खाता येतो. बोटीने हॉटेलवर उतरलात की बर्फात ठेवलेले सकाळी पकडून आणलेले ताजे मासे तुम्हाला दाखवून तुमच्या पसंतीनुसार बनवले जातात. तळून हवा असेल तर तसा नाहीतर रस्सा. हा मासा तळून अधिक चवदार लागतो. सोबत स्थानिक मसाले वापरून केलेली माशाची झणझणीत करी मोफत आणि हवी तितकी न मागताच मिळते. केरळचा जाडाभरडा लाल भात, माशाची करी आणि तळलेला करीमीन मासा म्हणजे स्वर्गसुखच! किंवा दुसरा पर्याय म्हणजे माशाच्या जोडीला हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेलं केरळी पद्धतीचं शाकाहारी जेवण मागवावं. जेवणाचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर संथ  विहार करणाऱ्या बोटीत पहुडण्यासारखं सुख नाही.