राजेंद्र भट
रस शोषणारी कीड मुख्यत्वे झाडाच्या कोवळ्या पानांवर वाढते. पानांच्या कोवळेपणामुळे कीड सोंड सहजपणे खुपसते आणि रस शोषते. ही कीड अनेकदा चिलटाएवढी असते. तिच्या शरीरातून थोडासा ओलावा पाझरत असतो. त्यावर कोणताही कोरडा पदार्थ फवारला की कीड नियंत्रण शक्य होते. घरातील झाडांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक पदार्थ आणि साधने वापरणे आवश्यक असते.
* चिकट सापळे
रसशोषक कीड पिवळ्या आणि निळ्या रंगाकडे आकर्षित होते. या रंगाच्या चिकट सापळ्यामुळे रस शोषणाऱ्या कीटकांपासून झाडाचे संरक्षण इतर काहीही न वापरता करता येते. असा सापळा घरी तयार करता येतो. घरच्या गोडेतेलाच्या पिशव्या पिवळ्या रंगाच्या असतात. तेल काढून घेतल्यावर पिशवी उलटी करावी. आतील बाजूला तेल असतेच. ती पिशवी तशीच झाडांजवळ लटकवावी. पिवळ्या रंगाकडे आकर्षित होऊन कीड त्यावर येते आणि तेलाला चिकटून बसते. चार-पाच दिवसांनी पिशवी पुसून घेऊन नंतर पुन्हा तेल लावून ठेवावे. अशाच प्रकारे निळ्या रंगाची प्लास्टिकची वस्तू घेऊन तिला तेल लावून ठेवता येईल. निळ्या चिकट सापळ्यावर पांढरी माशीसारखे घातक कीटक आकर्षित होतात. हे कीटक व्हायरसचाही प्रसार करतात. अशा चिकट सापळ्यांद्वारे प्रभावी कीड नियंत्रण करता येते.
* काळी माती
काळी माती आणून सुकवावी. नंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यावी. ही चमचाभर भुकटी कपभर पाण्यात मिसळून कीड असलेल्या झाडांवर फवारावी. दिवसाच्या उष्णतेत त्यातील पाणी वाफ होऊन निघून जाते आणि माती कीटकाच्या अंगावर चिकटून राहते. त्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही आणि ते मरतात.
* मैद्याचा फवारा
कपभर पाण्यात चमचाभर मैदा मिसळून ते पाणी कीटकांवर फवारावे. मैदा कीटकांना चिकटून राहतो. त्याचा पापुद्रा कडक होऊन कीटकांचा श्वासोच्छ्वास थांबतो. मैद्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी शोषले जाते आणि कीटक मरतात.
* कडुनिंबाच्या पानांची चटणी
कडुनिंबाच्या पानांची चटणी करून ती पाण्यात मिसळावी. हे पाणी झाडांवर फवारावे. त्यामुळे कीटकांची भूक मंदावते आणि ते मरतात.
* बाजरीचे पीठ
जुने बाजरीचे पीठ असल्यास ते पाण्यात मिसळून फवारावे. ते पीठ कीटकांसाठी विष ठरते.