राजेंद्र श्रीकृष्ण भट
आपण रोज ज्या गोष्टी वापरतो, त्यातून ओला आणि सुका अशा दोन्ही स्वरूपाचा कचरा होतो. हा कचरा कमीत कमी प्रमाणात तयार व्हावा, जास्तीत जास्त कचऱ्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे, सरकारची नव्हे. आता ज्या संकुलांत १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो, अशा संकुलांचा कचरा उचलणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाकारले आहे. कदाचित पुढे सर्वच घरांतील कचरा उचलणे बंद केले जाईल.
आज आपल्या विभागातील कचरा कुठे टाकायचा हे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवतात. म्हणजे, तो कचरा आसपासच्याच कोणत्या तरी विभागात नेऊन टाकला जातो आणि त्या जागेला कचराभूमी म्हटले जाते. अनेक ठिकाणी कचराभूमीभोवती राहणारे याविरोधात उभे ठाकले आहेत. आपल्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट ही आपलीच जबाबदारी आहे. कचरा आपण कमी करू शकतो. स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण दोन प्रकारांत होते. भाज्यांची देठे, फळांची साले आणि शिल्लक राहिलेले अन्न
यापैकी भाज्यांची देठे, फळांची साले, तसेच पूजेतील निर्माल्य हे बारीक करून कुंडय़ांमध्ये टाकले, तरी सहज कुजते. उरलेल्या शिजवलेल्या अन्नापासून घरच्या घरी खत तयार करण्याचे तंत्र आता उपलब्ध आहे. त्याद्वारे आपण चांगल्या प्रकारे खत तयार करू शकतो. त्याची माहिती पुढील भागात घेऊ.