नमस्कार मंडळी, या सदरातून मी तुम्हाला दर आठवडय़ाला सॅलडची एक रेसिपी देणार आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये कोशिंबिरी, चटण्या, रायते तसेच भरीत अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. सॅलड हा असाच एक पदार्थ. तो आहे पाश्चिमात्य, पण तुमच्या स्वयंपाकघरातल्याच काही पदार्थाचा वापर करून तुम्ही त्यात नावीन्य आणू शकता. जेणेकरून तुमच्या खाद्यकोशात भर पडेल.

पहिली पाककृती आहे, मेलॉन झुच्चीनी सॅलड. हे सॅलड साधारण चार जणांपुरते होईल इतक्या साहित्याचे प्रमाण दिलेले आहे. सोबत याच्या पौष्टिक घटकांची माहितीसुद्धा आहेच.

  • साहित्य – २ झुच्चीनी मध्यम आकाराच्या (जर उपलब्ध नसेल तर हिरवी काकडीही घेता येईल.) ३ मेलॉन, ३ टोमॅटो, १/२ टीस्पून लिंबाचा रस, ९० मिली एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, १ आईस बर्ग लेटयूजचा गड्डा, चवीनुसार मीठ व मिरपूड, सजावटीसाठी पुदिन्याची पाने
  • कृती – झुच्चीनीचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. मेलॉनच्या बिया काढून त्याचेदेखील चौकोनी तुकडे करून घ्यावेत. टोमॅटोचे लांब काप करावेत. आईस बर्ग लेटयूजचे हाताने तुकडे करून घ्यावेत. एका प्लेटमध्ये झुच्चीनीचे काप घ्यावेत, त्याच्यावर लिंबाचा रस घालावा आता हे दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावेत. एका मोठय़ा सॅलड बोलमध्ये १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावे. आईस बर्ग लेटय़ूज, झुच्चीनी व टोमॅटो घालून एकत्र करून घ्यावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावे. ऑलिव्ह ऑइल व पुदिन्याची पाने घालून सॅलड एकत्र करून घ्यावे. हे सॅलड थंडच खायला द्यावे.

पोषणमूल्य

  • कॅलरी : १५०
  • प्रोटिन : ९ ग्रॅम
  • फॅट : ५ ग्रॅम
  • फायबर : ३ ग्रॅम
  • कार्ब्स : १० ग्रॅम

 

नीलेश लिमये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nilesh@nileshlimaye.com