27 January 2021

News Flash

मुस्लीम महिला आंदोलन

मुस्लीम महिलांच्या आंदोलनात तीन प्रवाह आहेत.

मुस्लीम महिलांच्या आंदोलनात तीन प्रवाह आहेत. काही मुस्लीम महिला संविधानाने दिलेले हक्क मागतायत, काही जणी इस्लामच्या दायऱ्यात राहून इस्लामने दिलेले हक्क मागतायत तर काही जणींनी पूर्ण नास्तिकतेची भूमिका घेतली आहे. स्त्री हाच माझा ईश्वर, असे त्या मानतात.

भारतात १९ व्या शतकापासून स्त्री-दास्यमुक्तीसंदर्भात काम करणारे राजा राम मोहन रॉय, जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून अनेक मोठमोठे सुधारक होऊन गेले. भारतात मुस्लीम समाजात तेव्हा कुणी अशा प्रकारचा लढा दिलेला नव्हता. अर्थात, वैयक्तिक पातळीवर काही मुस्लीम स्त्रिया आघाडीवर होत्या. उदा. महात्मा फुले यांच्या चळवळीतल्या फातिमाबी या पहिल्या ज्ञात मुस्लीम महिला कार्यकर्त्यां आणि धडाडीच्या नेत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीत बेगम इजाज रसूल यांचा समावेश होता. पण ही गोष्ट किती जणांना माहिती असेल? अर्थात, या स्त्रियांची संख्या हातावर मोजण्याइतकीच होती.

या संदर्भात ‘मुस्लीम सत्यशोधक समाजा’चे ज्येष्ठ कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी आणि बेनझीर तांबोळी यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, ‘‘खरं तर इस्लाम हा असा धर्म आहे ज्यात महिलांना समान हक्क दिलेले आहेत, संपत्तीत समान वाटा दिलेला आहे. तसेच अंधश्रद्धा, कर्मकांड हिसा, कर्ज अशा इतरही अनेक बाबतींत इस्लाममध्ये सुधारणावादी उपदेश आढळतो;
परंतु मुस्लीम समाजात मात्र अनेक प्रश्न, विशेषत: स्त्रियांचे प्रश्न भेडसावत आलेले आहेत. उदाहरणार्थ एकतर्फी तलाक पद्धत, बहुपत्नित्व, मूल दत्तक घेण्यास नाकारलेली परवानगी इत्यादी. त्याचप्रमाणे जरी मुस्लीम स्त्रियांना संपत्तीत समान वाटा कायद्याने
दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र समाजात तिला त्या न्याय्य हक्कांपासून वंचितच ठेवले जाते. चादर,
चुल्हा, चार दिवारे या तीन ‘च’मध्येच तिचे आयुष्य जखडले जाते.’’

या संदर्भात सर्वप्रथम, मुस्लीम महिलांचा मुक्ततेसाठी लढा उभारण्याची गरज वाटली ती हमीद दलवाई या ज्येष्ठ मुस्लीम नेत्याला. त्यांनी सुरुवातीला ‘सदाए निस्वा’ नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेचे मोठे योगदान म्हणजे १६ एप्रिल १९६६ रोजी सात तलाकपीडित स्त्रियांना घेऊन त्यांनी काढलेला विधानभवनावरील मोर्चा. त्या वेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. या महिलांनी तेव्हा अत्यंत धडाडीने वसंतरावांची भेट घेतली आणि त्यांना स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन दिले आणि समान नागरी कायद्याची मागणी केली. या मोर्चाची चर्चा महाराष्ट्रात सगळीकडे झाली. वृत्तपत्रांनीही त्याची दाखल घेतली. याच काळात हमीद दलवाई, ए. बी. शहा यांनी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ आणि नंतर आजपासून बरोबर ५० वर्षांपूर्वी, २२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. या चळवळीने त्या काळात अनेक मुस्लीम महिला परिषदा आणि तलाकपीडित महिला परिषदा घेतल्या. त्यात शेकडो स्त्रिया सहभागी होत. अगदी बांगलादेशातूनसुद्धा मरियम रफ़ाद ही कार्यकर्ती दिल्ली परिषदेत सहभागी झाली होती. २७ व २८ डिसेंबर १९७१ रोजी पुण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपाऱ्यातून, राजस्थान, गुजरातमधूनही महिला आल्या होत्या. या महिलांमध्ये बऱ्याचशा तलाकपीडित होत्या. त्या वेळी एक सत्र ‘मेरी कहानी, अपनी जुबानी’ असे होते. त्यात महिला ज्या पद्धतीने बोलत होत्या, आपले अनुभव, विचार, भावना मांडत होत्या त्याने अक्षरश: उपस्थितांना अश्रू अनावर झाले. याची दखल वर्तमानपत्रांनी मोठय़ा प्रमाणावर घेतली. ‘‘एकूणच वादळ यावे तसा तो विषय गाजला. त्यामुळे मुस्लीम समाजातील धार्मिक, राजकीय नेत्यांची झोप उडाली,’’ तांबोळी सांगत होते. ‘‘त्यांनी या परिषदेला विरोध करण्यासाठी आपल्या घरातील बायका, मुली गोळा करून ‘आम्हाला शरियतचेच संरक्षण आहे’ असा मोर्चा काढला. त्याचा परिणाम म्हणून ‘मुस्लीम व्यक्तिगत कायदा संरक्षण समिती’ची स्थापना झाली, जिचे रूपांतर कालांतराने ‘मुस्लीम लॉ’ बोर्डात झाले.

मुस्लीम महिलांचे प्रश्न प्राधान्याने असले तरीही त्यांनी जमातवाद, अंधश्रद्धा यांच्या विरोधातदेखील लढा दिला. खरे तर या सगळ्याच बाबी महिलांच्या जीवनाशी निगडित असतात कारण यात पहिला बळी महिलांचाच जातो. या लढय़ात सर्वप्रथम नाव घ्यावे लागते ते प्राचार्य कुलसुम पारीख यांचे. त्यांचे चळवळीला मोठे प्रोत्साहन होते. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: आंतरधर्मीय विवाह केला होता. नझमा शेख
या कायद्याच्या अभ्यासक. परिषदांमध्ये त्या तसेच प्रा. यास्मिन लुक्मानी अभ्यासपूर्ण बोलत. १९७७ मध्ये हमीद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उर्दू भाषिक असूनसुद्धा मराठीचा पुरस्कार केला. ‘मी भरून पावले’ हे पुस्तकही मराठीत लिहिले.

या चळवळीत विशेष उल्लेख केला पाहिजे तो कोल्हापूरच्या मुमताज रहिमतपुरे यांचा. त्या अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्यां, लेखिका होत्या. शहाबानो प्रकरणात त्यांनी अनेक वेळा दिल्लीला जाऊन राजीव गांधी, नजमा हेपतुल्ला यांची भेट घेतली होती. १९८५-८६ मध्ये कोल्हापूर ते नागपूर तलाकमुक्ती मोर्चात परभणी, औरंगाबाद येथे मोर्चावर दगडफेक झाली, तरीसुद्धा त्यांनी हिमतीने भाषण केले. मुमताज यांचे आकस्मिक निधन झाले तेव्हा कोल्हापुरातील मुस्लीम लोकांनी ‘त्या काफर आहेत, दफन करू देणार नाही’ अशी भूमिका घेतली. त्यांच्या समवेत चळवळीत आशा अपराध, प्रा. ऐनुल अख्तारदेखील  होत्या. आशा अपराध यांनी ‘भोगिले जे दु:ख त्याला’ हे आत्मचरित्र लिहिले.
त्यानंतरच्या काळात मुमताज इनामदार (सोलापूर), मुन्ना इनामदार (जुन्नर, पुणे), मरियम जमादार (हुसेन जमादार यांच्या पत्नी) असा गट सक्रिय होता. मुंबईला लैला शेख होत्या, तसेच, नागपूरमध्ये रुबिना पटेल यांनी स्वत: ‘मुस्लीम महिला मंच’ स्थापन केला होता. त्या स्वत: तलाकपीडित होत्या, मुलाचा ताबा मिळत नसल्याने आत्महत्या करायला निघाल्या होत्या. बाबा आमटे यांच्या प्रेरणेने त्या कार्यरत झाल्या. सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार यांत त्या सक्रिय होत्या. आजही त्या कार्यकारिणीत कृतिशील आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या सायरा मुलाणी उपाध्यक्ष आहेत. या महिला चळवळीतून बळ घेऊन स्वत:चा तसेच इतर स्त्रियांचा विकास करण्यासाठी धडपडल्या. तमन्ना शेख यांनी तलाकच्या प्रश्नावर ‘एक नजर-तलाकनंतर’ हे पुस्तक लिहिले. डॉ. बेनझीर तांबोळी या मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेच्या संपादक असून त्या उर्दू माध्यमातील मुलांच्या इंग्रजी भाषा विकसनासाठी लेखन करतात. तसेच नरहर कुरुंदकरांनी ज्यांना आपली मानसकन्या मानले होते त्या प्रा. डॉ. तस्नीम पटेल यांनी चळवळीला मोठा आधार दिला. त्यांचे ‘भाळ आभाळ’ हे पुस्तक प्रकाशित आहे. शासनाच्या बालकल्याण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.  रजिया पटेल हीदेखील मुस्लीम समाजातील एक लढाऊ  कार्यकर्ती. ती सत्यशोधक समाजाची सभासद नव्हती तरीदेखील तिचे उद्दिष्ट तेच होते. मुस्लीम महिलांना सिनेमा बघण्यास असलेल्या बंदीविरोधात तिने जळगावात केलेले आंदोलन महाराष्ट्रात गाजले होते. अन्वर राजन यांच्याबरोबर त्यांनी ‘प्रगतिशील मुस्लीम महिला आंदोलन’ ही संघटना काढली. मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून प्रेरणा घेऊन नंतर देशभर अनेकांनी स्त्री-मुक्तीची चळवळ उभी केली.

डॉ. झीनत शौकत आली यांनी नया निकाहनामा तयार केला, ज्यात विवाह हा एक करार आहे त्यात एकतर्फी तलाक मान्य नाही, असे स्पष्ट म्हटले होते. तसेच हसिना खान यांनी ‘आवाजे निस्वा’ ही संस्था मुंबईत उभी केली तर शाहिस्ता अंबर (तामिळनाडू) यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड दखल घेत नाही म्हणून ‘मुस्लीम पर्सनल लॉ महिला बोर्ड’ स्थापन केले. आता मुस्लीम महिलांना नमाज पढण्यासाठी आंदोलन सुरू आहे. मुस्लीम महिलांसाठी स्वतंत्र मस्जिदही बांधली आहे.

सध्या मुंबई येथील हाजी आली दग्र्यात मुस्लीम महिलांना प्रवेश मिळावा म्हणून निदर्शने, मोर्चे सुरू आहेत. विवाह लावण्यासाठी मुस्लीम महिला काझी म्हणूनही तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठीचा एक अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. याला अर्थातच मौलानांचा विरोध आहे पण मुस्लीम महिला भिंतीला धक्के देत आहेत. या एकूण आंदोलनात तीन प्रवाह आहेत. काही मुस्लीम महिला संविधानाने दिलेले हक्क मागतायत, काही जणी इस्लामच्या दायऱ्यात राहून इस्लामने दिलेले हक्क मागतायत तर काही जणींनी पूर्ण नास्तिकतेची भूमिका घेतली आहे. स्त्री हाच माझा ईश्वर, असे त्या म्हणतात.

दलवाई यांच्यानंतर सत्यशोधक चळवळीचे काम वाढविण्यात सय्यदभाई, शमशुद्दीन तांबोळी यांचा वाटा मोठा आहे. सय्यदभाईच्या पत्नी अख्तर सय्यद यादेखील चळवळीत क्रियाशील होत्या. आजही सत्यशोधक चळवळीत अनेक तरुण कार्यकर्त्यां कार्यशील आहेत. त्यात मिनाझ लाटकर (कोल्हापूर), झरिना तांबोळी (परभणी), अर्जुमान तांबोळी (आटपाडी) अशा अनेक जणी आहेत. तसेच फक्त मुस्लीम महिला संघटनांमध्ये सीमित न राहता काही जणी इतर अनेक संघटनांमध्ये काम करतायेत. उदाहरणार्थ मुमताज शेख मुंबईत ‘राइट टू पी’ या आंदोलनात सक्रिय आहे. तिने ‘कोरो’ या संघटनेच्या माध्यमातून तब्बल ४००० दलित आणि मुस्लीम महिलांचे संघटन केले आहे. बीबीसीने जगातल्या शंभर धाडसी महिलांमध्ये तिचे नाव समाविष्ट केले आहे. हालिमा ही तरुण पत्रकार गेली दोन-तीन वर्षे आळंदी-पंढरपूर वारीचे वार्ताकन करते आहे. तळागाळातल्या लोकांना भेटून सामाजिक प्रश्न समजून घेते आहे. अलिगढमधील मुलींच्या लढय़ातही तिचा सहभाग होता. हीना कौसर खान ही  तरुण पत्रकारही हिरिरीने काम करीत आहे. याचा अर्थ, धर्म आणि लिंग यांच्या मर्यादा ओलांडून मुस्लीम महिला एकूण सामाजिक प्रश्नांच्या विशाल आकाशात आपल्या पंखांची ताकद आजमावत आहेत. हे संचित खरोखर केवढे मोठे आहे.

– अंजली कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2016 1:14 am

Web Title: muslim womens movement
Next Stories
1 ‘हर जोर जुर्मकी टक्कर में संघर्ष हमारा नारा है’
2 ‘न भूतो न भविष्यति’ महागाईविरोधी आंदोलन
3 गोवामुक्तीसाठी सरसावल्या महाराष्ट्रकन्या
Just Now!
X