लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा अवधी असताना नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. या दोन नेत्यांच्या राजकीय वाटचालीचा पट आणि प्रवासात अनेक साम्यस्थळे दिसत असली तरी राष्ट्रीय राजकारणात मोदी यांच्या पक्षाने स्वबळावर ताकद दाखविली आहे, तर नितीशकुमार यांना स्वबळाचा फाजील समज असलेल्या विरोधकांची मोट बांधावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेससारखा पक्ष आपले पत्ते लगेचच खुले करण्याची शक्यता नाही. सध्याच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणात आणखी एक नाव एवढय़ापुरतेच नितीशकुमार यांच्या प्रतिमावर्धनाकडे पाहावे लागेल..

लोकसभा निवडणुकीला दोन-अडीच वर्षांचा कालावधी असला की पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील संभाव्य नावांबाबत ठोकताळे बांधले जाऊ लागतात. त्या दृष्टीने राजकीय वतावरण तापू लागते. आपल्याला किती पाठिंबा मिळू शकतो, याचा अंदाज पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील नेतेही घेऊ लागतात. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. मग त्यावर चर्चा सुरू होते. २०१४ची निवडणूक ही व्यक्तिकेंद्रित (नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी) अशी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या धर्तीवर झाली होती. लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा अवकाश असला तरी पुढील निवडणूक हीसुद्धा व्यक्तिकेंद्रित होण्याची चिन्हे आहेत. सत्ता कायम राखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. असहिष्णुता, सरकारबद्दलची नाराजी, देशातील सध्याची एकूण स्थिती लक्षात घेता मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल, असे काँग्रेसचे गणित आहे. पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी हा सामना पुन्हा होण्याची शक्यता असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले आहे. गेल्याच आठवडय़ात नितीशकुमार यांची जनता दल (युनायटेड) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याचे नितीशकुमार यांनी जाहीर केले. यावरून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणारे नितीशकुमार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्याचे स्पष्ट होते. त्यातच भाजपला पराभूत करण्याकरिता सर्व निधर्मवादी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याचे नितीशकुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी केलेले आवाहन पुरेसे बोलके आहे.

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेले. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणारे नितीशकुमार यांनी मागासलेल्या बिहारचा गेल्या दहा वर्षांमध्ये केलेला विकास, शांत व संयमी स्वभाव तसेच इतर मागासवर्गीय चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्याने महिलावर्गात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. केंद्र सरकारमध्ये रेल्वे आणि कृषी ही दोन महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली आहेत. जनता दल (यू)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर नितीशकुमार यांनी जनता परिवाराला एकत्र आणण्यावर भर दिला आहे. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याची त्यांची योजना आहे. लोकसभेच्या १५० पेक्षा जास्त जागा असलेल्या हिंदी भाषक पट्टय़ात नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारले जाऊ शकते. भाजप किंवा काँग्रेसच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न शरद पवार किंवा मुलायमसिंग यादव यांनी केला. पण यापैकी कोणत्याच नेत्याला तिसऱ्या आघाडीची मोट बांधता आली नाही. हा प्रयत्न आता नितीशकुमार करणार आहेत. १९९१ मध्ये जनता परिवारातील चंद्रशेखर, १९९६ मध्ये  देवेगौडा किंवा १९९७ मध्ये इंदरकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत असलेल्या मर्यादा किंवा त्यांचे नेतृत्व मान्य होण्याबाबत असलेली साशंकता लक्षात घेता भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून पंतप्रधानपद मिळविण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे. पण त्यांच्यासाठी हे आव्हान मात्र काटेरी आहे.

मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू आदी प्रादेशिक पातळीवरील प्रस्थापित नेते नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य करण्याबाबत साशंकताच आहे. मोदी यांना रोखण्याकरिता काँग्रेसला नितीशकुमार यांचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. मुळात नितीशकुमार यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असला तरी बिहारच्या बाहेर या पक्षाची फारशी ताकद नाही. एका अर्थाने तो प्रादेशिक पक्षच आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच नितीशकुमार यांना बिहारची सत्ता एकहाती मिळालेली नाही. आधी भाजपबरोबर त्यांनी राज्य केले, आता लालूप्रसाद यादव यांना बरोबर घेऊन ते सत्तेत आहेत. अलीकडेच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. नितीशकुमार यांच्या तुलनेत मुलायमसिंह यादव, जयललिता, ममता, चंद्राबाबू किंवा नवीन पटनायक यांना स्वबळावर सत्ता मिळाली आहे. भाजप किंवा मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार यांच्याकडे बघितले जाते. इतर मागासवर्गीय समाजातील नितीशकुमार यांचे नेतृत्व दलित, अल्पसंख्याक, दुर्बल घटक, इतर मागासवर्गीयांनी स्वीकारल्याचे बिहारच्या निकालावरून स्पष्ट झाले. हा कल त्यांना राष्ट्रीय पातळीवर उपयोगी ठरू शकतो. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये नितीशकुमार यांनी काम केले आहे. २००५ ते २०१३ या काळात बिहारमध्ये भाजपबरोबरच त्यांनी सत्ता राबविली. नितीश यांच्यावर भाजपचा शिक्का असला तरी मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला होता. ही बाब त्यांच्याकरिता जमेची ठरणार आहे. मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने अल्पसंख्याक किंवा निधर्मवादी गटात नितीश यांच्याबद्दल चांगली भावना आहे. नितीश यांना प्रतिकूल ठरणारे अनेक मुद्दे असले तरी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाकडे सरकार बनविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्यास नितीशकुमार काँग्रेस, डावे, जनता परिवारातील पक्षांचे पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार ठरू शकतात. १९९०च्या दशकात कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसताना जनता परिवारातील नेत्यांना पंतप्रधानपद मिळाले होते. नितीशकुमार ही परंपरा पुढे सुरू ठेवू शकतात.

काँग्रेस पक्ष नैसर्गिकदृष्टय़ा सक्षम होतो, असा आजवरचा अनुभव आहे. पक्षाची प्रतिमा सुधारण्याकरिता राहुल गांधी सध्या देशभर दौरे करीत आहेत. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास लगेचच तेथे धावून जातात. वर्षभरात त्यांनी स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर टीकाटिप्पणी करण्याची संधी ते सोडत नाहीत. मग मुंबईतील देवनारमधील कचरा क्षेपणभूमीतील आग असो वा काश्मीरमधील हिंसाचार साऱ्यांचे खापर राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर फोडले जाते. निवडणुकांना अद्याप तीन वर्षे असल्याने पक्षाची प्रतिमा उंचाविण्याचा काँग्रेस आणि राहुल यांचा प्रयत्न राहील. निवडणूक निकालानंतरच काँग्रेस आपले पत्ते खुले करेल.

राष्ट्रीय राजकारणात नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ने आतापासूनच कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत चार खासदार निवडून आल्याने आपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अकाली दल-भाजप युती आणि काँग्रेसला पर्याय म्हणून आम आदमी पार्टीने पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल यांची पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. पंजाबच्या एकूण लोकसंख्येत ५६ टक्के शिखांचे प्रमाण असून, उर्वरित हिंदू वा अन्य धर्माचे आहेत. गेल्या चार दशकांमध्ये पंजाबमध्ये कधीच बिगर शिख मुख्यमंत्री झालेला नाही.  पंजाबमध्ये सध्या आपचा प्रचार हा केजरीवाल यांच्या व्यक्तिकेंद्रित आहे. उद्या दिल्लीपाठोपाठ पंजाबची सत्ता मिळाल्यास आम आदमी पार्टीचे महत्त्व वाढणार आहे. राष्ट्रीय पातळीवर स्वत:चा पर्याय निर्माण करण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न राहील. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या फक्त २० जागा असल्याने आपचा तेवढा प्रभाव पडणार नाही. दिल्लीत वीजदर कमी करणे, मोफत वैद्यकीय सेवा, डायलेसिस केंद्रे उभारणे या माध्यमातून दिल्लीच्या आम आदमीशी केजरीवाल यांची गाठ भक्कम बांधली गेली आहे. केजरीवाल स्वत:ची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करीत असले तरी राष्ट्रीय पातळीवर आम आदमी पार्टी आपला प्रभाव पाडण्याची शक्यता नाही.

सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप तीन वर्षे असली तरी राजकीय पातळीवर आतापासूनच जुळवाजुळव सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार आपली प्रतिमा निर्माण करीत आहेत. नितीशकुमार यांचे प्रस्थ वाढणे काँग्रेसला परवडणारे नाही. मोदी पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेर प्रतिस्पर्धी तयार होणार नाही याची कायम दक्षता घेतात. तीन वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी वा उलटसुलट होऊ शकते. राहुल गांधी की नितीशकुमार यांच्यातच मोदी यांना आव्हान देण्यासाठी चुरस होऊ शकते. नितीशकुमार यांची प्रतिमा उंचावणे काँग्रेससाठी नक्कीच तापदायक ठरणारे आहे.