अनेकदा नोकरीच्या ठिकाणी, मित्रमंडळींमध्ये तसेच कुटुंबातही एखाद्या मुद्दय़ावरील मतभेदामुळे टिपेचा सूर लागतो आणि वातावरणातील तणाव वाढतो. अशा वेळी गरज असते ती तुमचा मतभेद योग्य प्रकारे नोंदवण्याची!

* तुमचा दृष्टिकोन कायम ठेवूनही समोरच्या व्यक्तीचे मत आपल्या मतापेक्षा भिन्न असू शकते हे मुळात स्वीकारायला हवे. समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकायला हवे, आणि त्यानंतर शांतपणे आणि ठामपणे तुम्ही तुमचे मत व्यक्त करायला हवे.
* मतभिन्नता व्यक्त करणे हे एक कौशल्य आहे आणि ते सरावानेच शक्य होते.
* दुराग्रह टाळा. जेवढे अज्ञान अधिक तेवढा दुराग्रह जास्त असतो. तुमचा मुद्दा मांडण्याआधी दुसऱ्याच्या मताचा आदर राखून त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्यायला हवे. केवळ समोरची व्यक्ती भिन्न मताची आहे म्हणून त्याचे मत वाट्टेल त्या पद्धतीने खोडून काढणे चुकीचे असते. आवाज चढवून, असभ्य भाषेत समोरच्या व्यक्तीची अथवा समोरच्या व्यक्तीच्या मताची निंदा करणे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते.
* ‘आपलेच म्हणणे खरे’ असा दृष्टिकोन बाळगल्यास लोक तुमच्यापासून दूर जातात. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीच्या मताशी सहमत आहात, असा होत नाही. मात्र, त्यातून समोरच्या व्यक्तीला संदेश जातो की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहात. बोलताना ‘तुम्ही कसा विचार करत आहात’ किंवा ‘तुमच्या मते..’ या शब्दांचा उपयोगही महत्त्वाचा ठरतो. जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहात असे लक्षात आले तर तुमचे म्हणणेही समोरची व्यक्ती ऐकून घेते.
* समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतल्याने गैरसमजुती टळण्यास मदत होते. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा वेगळाच अथवा चुकीचा अर्थ आपण लावलेला असतो. त्या व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली तर झालेल्या गैरसमजुती टळून त्या बोलण्यामागचा नेमका अर्थ स्पष्ट होण्यास मदत होते.
* समोरच्याचे म्हणणे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल. समोरच्याचे मत खोडून काढण्याच्या प्रयत्नांत विषयांतर होण्याची शक्यता असते. ते न करता ठामपणे तुम्ही तुमचे मत व्यक्त करावे. आपले म्हणणे मांडताना तुम्ही तुमचा आवाज स्थिर आणि खालच्या पट्टीत ठेवावा. समोरच्याला उद्देशून वक्रोक्ती अथवा अपमानास्पद बोलणं टाळावं.
* आपल्या देहबोलीचे भान राखावं. तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवलं तरी डोळे फिरवणं, डोकं हलवणं, मान फिरवणं या सगळ्यातून तुमचा राग आणि धुसफुस व्यक्त होते. त्यामुळे बोलताना अत्यंत शांतपणे, आदरपूर्वक, समोरच्याच्या डोळ्यात बघून तुम्ही तुमचं म्हणणं विचारपूर्वक मांडावं.
* म्हणणे मांडताना समोरच्या व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत उल्लेख टाळावा. उदाहरणार्थ- तू अत्यंत संकुचित विचारांचा / विचारांची आहेस, तू बेअक्कल, असमंजस आहेस. यामुळे समोरची व्यक्ती लगेचच बचावात्मक पवित्रा घेते आणि ती व्यक्ती तुम्हालाही काही लेबलं चिकटवण्याची शक्यता वाढते. इथे वादविवाद अथवा युक्तिवादाने काहीच
साध्य होत नाही.
* तुम्ही तुमची बाजू मांडल्याने लगेचच समोरच्या व्यक्तीचं मतपरिवर्तन होईल अशा भ्रामक कल्पनेत तुम्ही राहू नका. समोरच्या व्यक्तीच्या मनातील खोलवर रुजलेली मते एका रात्रीत बदलणे शक्य नाही, हे तुम्ही समजून घ्यायला हवं. खरं तर जे विषय संवेदनशील असतात त्याकरता मतपरिवर्तन होण्यास लोकांना वेळ लागतो. तुम्ही तुमचं मत मांडा आणि काही वेळ, दिवस जाऊ द्यात! जर तुम्ही तुमचं म्हणणं शांतपणे, विचारपूर्वक मांडलं असेल तर समोरची व्यक्ती जेव्हा त्या विषयाचा विचार करेल तेव्हा तुमचे म्हणणे त्या व्यक्तीच्या मनात पिंगा घालत राहील यात शंकाच नाही.
* मात्र, जर तुम्ही आवाज चढवून, आक्रस्ताळेपणा केलात तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या म्हणण्याचा तार्किक विचार करणं अधिकच कठीण होऊन बसेल. तुम्ही काय म्हणताय तो आशय लक्षात घेण्याऐवजी तुमच्या रागावर प्रतिक्रिया देईल.
* जरी तुम्हाला विरोधी प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुमचा युक्तिवाद तुम्ही कधी थांबवावा हे तुम्हाला लक्षात यायला हवं. सर फ्रान्सिस बेकन (Sir Francis Bacon) यांनी म्हटल्याप्रमाणे मौन हे ज्ञानाचे पोषण करणारी झोप आहे.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

– गीता देसाई