प्रतीक घरी आला आणि त्याने बूट काढून कसे तरी भिरकावले, तेव्हाच त्याच्या पत्नीला नेहाला अंदाज आला की काही तरी बिनसलंय. तिने पटकन् आत जाऊन चहा केला. प्लेटमध्ये खायचे घेतले आणि ट्रे घेऊन बाहेर आली. प्रतीक कपडे बदलून आला नव्हता. मग ती बेडरूममध्ये गेली तर तो तसाच पलंगावर पडला होता. त्याच्या कपाळावर हात ठेवत नेहा म्हणाली, ‘‘बरं नाही का रे? काय होतंय?’’ प्रतीक म्हणाला, ‘‘लिव्ह मी अलोन. तू जा तुझ्या मालिका बघ.’’

नेहा हसत म्हणाली, ‘‘छे! आता मी टीव्ही पाहात राहिले तर तुला वाटेल मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतेय. त्यापेक्षा तू हात-पाय धू. कपडे बदलून फ्रेश हो. मस्त आल्याचा चहा पीत आणि स्नॅक्स खात आपण गप्पा मारू. तेव्हा काय झालं ते सांग!’’ मग नेहा तिथून गेली. दहा मिनिटांत प्रतीक फ्रेश होऊन आला. मग खाऊन झाल्यावर नेहा म्हणाली, ‘‘सांग आता काय झालं ते! कितीही छोटं मोठं असू दे. मला कळणारं-न कळणारं असू दे. शेअर वीथ मी’’ हळूहळू नेहाला कळलं की एक महत्त्वाचं काम खूप कौशल्याने प्रतीकने केलं होतं. पण त्याच्या लगेचच्या वरिष्ठाने मोठय़ा बॉसला सांगताना मात्र ते काम त्याने स्वत: केल्याचं सांगून श्रेय घेतलं होतं. प्रतीकने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठे बॉस प्रतीकला म्हणाले, ‘‘तुम्ही याच्यासारखा बॉस मिळालाय म्हणून या कंपनीत टिकून आहात. जरा शिका यांच्याकडून.’’ या साऱ्याचा प्रतीकला खूप मन:स्ताप झाला होता. ‘‘मला तर वाटलं तिथल्या तिथे राजीनामा लिहून त्यांच्या तोंडावर फेकावा.’’ प्रतीक म्हणाला. नेहाने घाबरून विचारलं, ‘‘मग? काय केलंस?’’ प्रतीक म्हणाला, ‘‘काही केलं नाही. घरी आलो!’’ नेहा हसत म्हणाली, ‘‘प्रतीक, विश्वास ठेव, तू योग्य गोष्ट केलीस. आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठय़ा बॉसला सत्यस्थिती सांग आणि तुझ्या लगेचच्या बॉसलाही त्याने हे बरोबर केले नाही याची जाणीव हुशारीने करून दे. पुन्हा असाच प्रकार घडला तर अधिकृत तक्रार कर आणि दुसरी चांगली नोकरी शोधत राहाच.’’

मेधाने सुनीताच्या घराची बेल वाजवली. पण दार अर्धवट उघडं होतं. ते ढकलून ती आत गेली तर हॉलमध्ये भाजीच्या पिशव्या पसरल्या होत्या. सुनीताची धाकटी मुलगी मिनू त्यात खेळत पसारा वाढवत होती. रौनक मिनूचा मोठा भाऊ ‘आई भूक’ म्हणून ओरडत होता. आतल्या खोलीतून आजी सुनीताला हाका मारत होत्या आणि सुनीता फोनवर बोलत होती, ‘‘अहो, आज मला मरायलासुद्धा वेळ नाही. तुम्ही आजच कशाला त्यांना जेवायला बोलावलंत? निदान आधी फोन करून विचारायचं तरी! तुम्हाला आता काय सांगायचं? माझा थोडा तरी विचार करा!’’ सुनीताने रागाने फोन ठेवला. तिथेच सोफ्यावर दोन्ही हातांने डोकं धरत ती बसली. मेधा तिच्या जवळ जात म्हणाली, ‘‘काय झालं गं?’’ सुनीता म्हणाली, ‘‘काही नाही गं! या सगळ्याचा भयंकर वैताग आलाय! काय काय मी एकटीने करायचं आणि किती ठिकाणी मी पुरी पडणार आहे?’’ मेधाने पटकन भाज्या पुन्हा पिशव्यांमध्ये भरल्या. पर्समधला बिस्किटाचा पुडा मोठय़ाच्या हातात ठेवला. आत जात आजींना हवी असणारी गोळी शोधून दिली. पुन्हा बाहेरच्या खोलीत येत सुनीताजवळ बसत म्हणाली, ‘‘हं सांग!’’ सुनीता म्हणाली, ‘‘सांग काय? प्रत्येकाच्या मागण्यांनी मी हैराण झालेय. आता मुलांना खेळायला खाली नेऊ की येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक करू?’’ मेधा म्हणाली, ‘‘तुला निवड करता यायला हवी. एक तर तू मुलांना खेळायला घेऊन. तिथे भाज्या निवड. येताना पोळ्यांची पाकिटं घेऊन ये. कोपऱ्यावर व्हेज बिर्याणी मस्त मिळते. ती घेऊन ये आणि आल्यावर तुझा बाकी स्वयंपाक पटकन् होईल. दुसरा पर्याय म्हणजे आता आजी मुलांना गोष्टी सांगतील किंवा मी आले आहे तर मी त्यांच्याशी खेळते. तू स्वयंपाक कर. कुठलाही पर्याय निवडलास तरी असा मूड घालवू नको! तू हे सारं नीट करू शकतेस, या खात्रीने तर तुझा नवरा लोकांना आमंत्रित करतो!’’

बनी कॉलेजला पोहचला तर त्याचा अख्खा ग्रुप नको इतका शांत होता. बनीने पिंटय़ाच्या टपलीत मारत म्हटलं, ‘‘अरे काय झालंय? कुणी टपकलंय का?’’ पिंटय़ा म्हणाला, ‘‘परीक्षा अलीकडे आल्यात. सरळ सरळ आठ दिवस आधीपासून सुरू होतेय. नेहमीप्रमाणे अपरिहार्य कारण असेलच काही तरी. आताच तुकाराम नोटीस लावून गेलाय बघ.’’ बनी म्हणाला, ‘‘मग?’’ वाणी म्हणाली, ‘‘मग काय मी नक्की नापास होणार.’’ रोहन म्हणाला, ‘‘मी नापास नाही. पण जेमतेम पास होईन.’’ पिंटय़ा म्हणाला, ‘‘माझ्याबद्दल बोलायलाच नको. मी नेहमीच शेवटी शेवटी अभ्यास करतो. हा शेवट तर आजपासूनच चालू झालाय.’’ बनीने हातात पेन आणि वही घेतली. त्यावर प्रत्येकाचं नाव लिहिलं. म्हणाला, ‘‘चला आपण एक एक्सरसाइज करू. मी नुकतंच हे कुठं तरी वाचलंय. आपली आता प्रत्येक विषयाची किती तयारी झालीय ते प्रामाणिकपणे सांगायचं.’’ मग प्रत्येकाची दहा, पंचवीस, पाच, शून्य टक्के तयारी जी काही होती ती त्याने प्रत्येक विषयासमोर लिहिली. बनी म्हणाला, ‘‘हे बघा, आता एका नजरेत आपल्याला प्रत्येक विषयाची किती तयारी करायची आहे ते कळतंय. चला लगेच अभ्यासाचं नियोजन करू. नेट, मोबाइल, टीव्ही, टाइमपास सगळं कमी करायचं. आखलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यास करायचा. रोज संध्याकाळी साडेसहा ते आठ कट्टय़ावर भेटायचं आणि फालतू गप्पा मारण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांची तोंडी उजळणी करायची. काही कळलं नसेल तर ज्यात येतंय त्याच्याकडून समजावून घ्यायचं. परीक्षेची ऐशी की तैशी. गुणांचा विचारच करायचा नाही.’’ वाणी म्हणाली, ‘‘अरे असं कसं?’’ बनी हसत म्हणाला, ‘‘गुण काय आपण देणार आहोत का? आपण फक्त परीक्षेत उत्तरं लिहिणार. उत्तरं जे आपल्याला येतंय त्या ज्ञानातून आणि माहितीतून लिहिणार. माहिती अभ्यास करून मिळणार. म्हणून लेट्स फोकस ऑन ..’’ सगळे एकदम म्हणाले, ‘‘अभ्यास!’’ बनी हसत म्हणाला, ‘‘यस! परीक्षा ‘अलीकडे’ आली तर आपल्याला आता करायची मजा ‘पलीकडे’ नाही का करता येत?’’

विकू बसमध्ये चढला आणि कशी तरी त्याला उभं राहायला जागा मिळाली. दप्तराचं ओझं मोठं होतं. पण ते ठेवायलाही कुठे जागा नव्हती. नेहमी त्याला आई स्कूटरवरून घरी नेत असे. पण आज तिला काही तरी काम होतं म्हणून तिने विकूला बसने यायला सांगितलं होतं. तिकिटाचे पैसेही दिले होते. पैसे काढण्यासाठी विकूने खिशात हात घताला तर हात बाहेरच आला. खिसा फाटला होता किंवा उसवला होता. पैसे पडले होते कुठे तरी वाटेत. बाप रे. आता? विकू कावराबावरा झाला. तेवढय़ात कंडक्टर आला, ‘‘कुठे रे जायचेय?’’ त्याने विचारले. विकू म्हणाला, ‘‘काका पैसे होते माझ्याकडे पण खिसा फाटलाय. त्यातून पडले.’’ कंडक्टर वैतागला. ‘‘ए चल खाली उतर. तूच उडवलेस कुठे तरी.’’ विकू म्हणाला, ‘‘नाही काका. मी खरंच बोलतोय.’’ पण कंडक्टर काही ऐकत नव्हता. तेवढय़ात मागे उभ्या असणाऱ्या बाईंनी म्हटलं, ‘‘असू दे. मी देते त्याच्या तिकिटाचे पैसे. होतं असं कधी तरी!’’ मग उतरताना विकूने त्यांचा फोन नंबर विचारून घेतला. त्या सांगत नव्हत्या. पण विकू म्हणाला, ‘‘मावशी, मी फोन करून आईला घेऊन येईन. तुमच्यासारख्या चांगल्या मावशीला थँक्स म्हणायला आईलाही आवडेल आणि पैसेही परत करता येतील.’’

आयुष्यात हे असे थोडे परीक्षा पाहणारे, कस लावणारे, गोंधळात टाकणारे प्रसंग येतच असतात. अशा वेळी मनाचा शांतपणा आणि विचारांचा समन्वय टिकवणं महत्त्वाचं असतं. समस्या छोटी असो वा मोठी-आपण ती सोडवू शकतो असा भरवसा बाळगला तर त्यातून मार्ग काढणं सोपं होतं. ‘आपण मोठे, समस्या छोटी.’ असं मनात म्हणायचं. समस्या ठरावीक प्रसंगात, ठरावीक पद्धतीची, ठरावीक प्रकारात मोडणारी असते. आपल्या क्षमता, बुद्धी, कौशल्य, माहिती, शारीरिक, मानसिक शक्ती यांची गोळाबेरीज बहुधा जास्त असते. त्या जोरावर आपण समस्या सोडवू शकतो. पण आपण समस्या आहे या विचारानेच घाबरलो, गोंधळलो तर आपल्या शरीर-मनाची ऊर्जा भीती आणि गोंधळाचे निवारण करण्याकडे आधी लागते.

आत्मविश्वासाने मन शांत ठेवलं आणि समस्येचे नेमकेपण लक्षात घेतलं की ती सोडवण्यासाठीचे पर्यायी मार्गही सुचू लागतात. मग याची सवय होऊ लागते. प्रसंगावधान वाढू लागते. जेव्हा आपल्या क्षमता अपुऱ्या असतात तेव्हा इतरांची मदत घेता येते आणि क्वचित कधी एखादी समस्या सुटण्यागत नसली तर ते अपरिहार्यपण मोकळ्या मनाने स्वीकारण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. जगताना रोजचा दिवस आनंदात घालवायचा, वेळ सत्कारणी लावायचा आणि आपल्या जगण्याला आपणच अर्थ द्यायचा हे ठरवलं तर निराशेचा स्पर्शही होत नाही आणि आशेचा एक दिवा मनात निरंतर तेवत राहतो!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in