‘ये घाटी क्या चायनीज रेस्टॉरंट चलाएगा?’ अशी शेरेबाजी ज्या राहुल लिमयेंच्या बाबतीत केली गेली, त्यांनी माणसं जोडत, जनसंपर्क वाढवत ‘जिप्सी चायनीज हॉटेल’चा शिवाजी पार्क, दादर येथील उद्योग जिद्दीने, कष्टपूर्वक वाढवत नेला. ही वाटचाल खूप तपशील टिपत, वेधक पद्धतीने ‘निमित्त.. जिप्सी, शिवाजी पार्क’ या पुस्तकात त्यांनी शब्दबद्ध केली आहे. पुस्तकाचं शब्दांकन मनिषा सोमण यांनी इतकं नेमकं केलं आहे, की दर पानागणिक उत्कंठा वाढत जाते. लिमये यांनी विस्तारत नेलेल्या हॉटेल उद्योगात त्यांना आरंभापासून सहकार्य करणाऱ्यांबद्दल त्यांच्या गुणवैशिष्टय़ांसह सांगत, व्यवसायातील सर्व चढउतार तपशिलानं मांडले आहेत. त्यामुळे एका व्रात्य मुलाचा यशस्वीतेकडे उंचावत गेलेला हा विलक्षण प्रवास ओघवता झाला आहे.

हॉटेल व्यवसायाला पूरक अशी नेमकी शीर्षके अनुक्रमणिकेपासूनच देत वाचकांची उत्सुकता वाढवत नेली आहे. प्रास्ताविकाला ‘ऑर्डर घेताना’, अनुक्रमणिकेला ‘मेन्यूकार्ड’ म्हणत ‘स्टार्टर’मध्ये ‘बालपण’ नोंदवले आहे. ‘मेन कोर्स’मध्ये ‘ड्रमबीट’ची उमेदवारी व ‘जिप्सी’- ‘नेब्युला’चा टप्पा सांगितला आहे, तर ‘गोडधोड मिठाया’ या शीर्षकाखाली नातीगोती, सगेसोयरे, सहकाऱ्यांचे स्नेहबंध आपुलकीने शब्दबद्ध केले आहेत. ‘मसाले काही गोडे, काही गरम’ या पुढच्या विभागात मोहन वाघ यांचं ‘जिप्सी’शी असलेलं पंचवीस वर्षांचं अतूट नातं आणि आठवणी सांगत, अनेक ग्राहकांच्या नाना तऱ्हा कथन करत, राजकीय नेत्यांबरोबरचे क्षण नोंदवत स्वत:ची ‘खव्वयेगिरी’ सांगितली आहे. शेवटच्या ‘मसाला पान’ या टप्प्यावर ‘कसा मी? असा मी!’ हे मोकळेपणी मांडले आहेच; शिवाय खाद्यसंस्कृतीचा ऊहापोह करून ‘जिप्सी’ हा ब्रँड न होता ‘लिमये’ हे नाव फक्त कसं ‘जिप्सी’मुळे मोठं झालं, हे खुलेपणाने त्यांनी कथन केलं आहे. नित्य जोडत गेलेल्या माणसांच्या पाठबळावरच लिमये ही भरारी मारू शकले. त्यांच्या हॉटेल व्यवसायाचा जनसंपर्क हाच कणा होता, हे या पुस्तकातून जाणवतं.

उद्योजक होण्याचा स्वप्नातही विचार नव्हता हे मोकळेपणी सांगत, बालपणीचा व्रात्य-खोडकरपणा नोंदवत, ‘योग्य वेळी योग्य संधी मिळत गेली आणि मी माझ्या मेहनतीनं त्या संधीला योग्य तो न्याय दिला..’ असं लिमये यांनी स्पष्टपणे म्हटलंय. वडील प्रभाकर लिमये, भक्कम पाठिंबा आणि स्फूर्ती देणारे सासरे भाऊ ऊर्फ श्यामराव गोडबोले, विश्वास टाकून संधी देणारे दादा पेठे या त्रिकुटाला राहुल लिमयेंनी ही ‘हॉटेल कहाणी’ अर्पण केली आहे.

बालपणीच्या आठवणी सांगताना लिमये यांनी आपली अभ्यासातली अधोगती स्पष्टपणे सांगितली आहे. बी. ई. पदवी घेतलेले अभियंते आजोबा, मुगाच्या डाळीचा शिरा करणारी देखणी आई आणि खव्वये असलेल्या वडिलांविषयीच्या आठवणी सांगत स्वत:चा त्या काळात सायकल चालवण्याचा विक्रमही लिमये यांनी किस्सारूपाने नोंदवला आहे.

पुस्तकात कुठेही शब्दांचे अकारण फुलोरे नाहीत. स्पष्ट, सत्य, नेमकं सांगत कथनाचा ओघ सांभाळलाय. शिरूभाऊ-अरुण लिमये ही नाती कळल्यावर तर गंमतच वाटते. अभ्यासासाठी लेखकाची रवानगी खोपोलीला झाल्यावर तिथे गाडय़ा मोजणे, राजेश खन्ना-शर्मिलाचे ‘आराधना’चे चित्रीकरण पाहणे, कॉपीत अडकणं, वेगवेगळय़ा कार पाहणं.. असे सारे ‘उद्योग’ खुलेपणे सांगितले आहेत. पुढे अर्धागिनी बनलेल्या स्मिताबरोबरची प्रेमकहाणीही मोकळेपणाने मांडल्याने लिमयेंच्या शब्दांना ‘चव’ आलीय! लिमये यांनी त्यांच्या यशस्वी संसाराची गुरुकिल्ली सांगितली आहे- ‘भांडा सौख्य भरे’!

केटरिंग कॉलेज, तिथले दया शेट्टीसारखे मित्र, कॉपर चिमणी, ठक्कर, अमिगो, प्रीतम, सुरुची, सेंटॉर इथल्या उमेदवारीचे अनुभव कथन केले आहेत. गल्ला न मोजता भटारखान्यात कांदे, बटाटे, तेल किती संपलं हे बघून त्या दिवसाच्या गल्ल्याचा अचूक हिशोब मांडणारे बळीराममामा, ‘गझिबो’चा टर्निग पॉइंट, शंभर रुपयांची टीप नाकारल्याने खूश झालेले सैगलसाहेब, आत्मविश्वास आणि ग्राहकाशी गोड बोलणं हे यशसूत्र देणारे डी. एन. शर्मा यांच्याविषयीच्या आठवणीही सांगितल्या आहेत. शिवाय बिंदुमाधव ठाकरे-बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ड्रमबीट’च्या निमित्तानं झालेला दुरावा, तरीही नंतर त्यांनी दिलेली दाद हे सारं मुळातूनच वाचायला हवं.

माणसं पाहणं, अनुभवणं आणि नोंदवणं ही  लिमयेंची खासियत! असंख्य व्यक्तिरेखांच्या आठवणी रेखाटत हा खाद्यप्रवास त्यांनी रंजक केला आहे. जुन्या दादरकरांना उत्तम मासे मिळणारं, अंधारलेलं शेटय़ेंचं हॉटेल आठवत असेल. त्या शेटय़ांकडून जागा घेणं, दादा पेठेंनी एकेक जागा सोपवणं असा सारा विस्तारत जातानाचा तपशीलही पुस्तकात वाचायला मिळतो. योगायोगाच्या जोडीनेच घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहणं, जिद्द, कष्ट, मदत केलेल्या माणसांचे स्मरण हे सारं लिमयेंना यशाकडे कसं घेऊन गेलं, हे वाचताना हॉटेल व्यवसायात येणाऱ्या नव्यांना वागण्या-जगण्याच्या ‘टीप्स’ मिळतात. रवीन्द्रनाथ बॅनर्जीनी ‘जिप्सी’ नाव सुचवलं, ही कुतूहल शमवणारी बाबही या पुस्तकातून कळते. शिवाय चायनीज, नेब्युला ते दुबईत चायनीज, पतंग रेस्टॉरंट, अंधेरी, सांताक्रूझ, पुणे, नाशिक, पार्ले हा सारा प्रवास समजतो. तसेच हॉटेल व्यवसायात टाकलेलं पुढचं पाऊल म्हणजे ‘रेस्टॉरंट कन्सल्टन्सी’विषयीही कळतं.

श्रीकांत ठाकरे, रमेश मोरे, बनी रुबेन, पवार, वळसेंची गाठ घालून देणारे अरुण मेहता, विठ्ठल कामत, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, उद्धव ठाकरे, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, राजन शिरोडकर, वसंत शेट्टी, टेबल नं. २६ राखीव असलेले मोहन वाघ.. अशा साऱ्यांच्या आठवणी जागवत, लता मंगेशकरांनी जिप्सीला दिलेली भेट अभिमानाने नोंदवत लिमयेंनी त्यांचा लोकसंग्रह किती अफाट होता हे सिद्ध केलंय.

खरं तर पदार्थाच्या चवीतून, उत्तम वागण्या-बोलण्यातून जोडलेल्या माणसांमुळे आणि मित्र, कुटुंबीय व दादा पेठेंच्या आधारावरच ‘जिप्सी’ विस्तारले. लिमयेंचा हा खाद्यप्रवास सांगणारं हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

  • ‘निमित्त.. जिप्सी, शिवाजी पार्क’ – राहुल लिमये, राजहंस प्रकाशन,
  • पृष्ठे- १४२, मूल्य- २५० रुपये.