News Flash

मिश्कीलीच्या मिषाने.. : पत्रास कारण की..

मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय विडंबन-कवीच्या लेखणीतून उतरलेलं..

तर मुख्य मुद्दा सांगायचा राहिलाच. हल्ली इतक्या गोष्टी करायला समोर असतात, की काय करावे, हेच नेमके कळत नाही.

मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय विडंबन-कवीच्या लेखणीतून उतरलेलं.. अवतीभवतीच्या घटना-प्रसंगांवर मिश्कील शेरेबाजी करणारं मासिक सदर..

प्रिय तातूस,

खूप दिवसांनी तुला पत्र लिहितोय. परवाच्या दिवशी तुझी आठवण काढणार होतो आणि तेवढय़ात तुझा फोन आला. मला तोंडदेखल्या शुभेच्छा देणे आवडत नाही. अरे, आपल्या मनात सगळ्यांबद्दल चांगले होवो अशीच भावना असते. मला तर शत्रूबद्दलदेखील चांगलं व्हावं असं वाटलं असतं. (आता मला शत्रूच नाहीत, ही गोष्ट वेगळी.) आता रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवावा, हेच कळत नाही. मी तर कधी कधी घरातल्या वेगवेगळ्या घडय़ाळ्यांत किती वाजलेत, हे बघत वेळ घालवतो. माझा स्वभाव मुळात धावपळ करण्याचा नाही. मध्यंतरी तो धावणारा बोल्ट की काय त्याची मुलाखत ऐकत होतो. त्याने एकदा धावून झाल्यावर नंतर काय करायचं समजत नाही, म्हणाला. हे मुलाखत घेणारे लोकही खूप चलाख असतात. त्यांना कधी काय सुचेल, सांगता येत नाही. सुधीर गाडगीळ यांनी मागे एकदा पी. टी. उषाची मुलाखत घेताना ‘तुमची खूप धावपळ होत असेल नाही?’ असा प्रश्न विचारला होता ते मला अजून आठवते.

तर मुख्य मुद्दा सांगायचा राहिलाच. हल्ली इतक्या गोष्टी करायला समोर असतात, की काय करावे, हेच नेमके कळत नाही. माझे अक्षर चांगले असल्याने अण्णा नेहमी मला ‘तू आत्मचरित्र लिही,’ असा आग्रह करतात. आमच्या इथे दादरला तर वेगवेगळे क्लासेस निघालेत. मध्यंतरी मी त्यातले दोन-तीन क्लास पूर्ण केले. त्यातला एक वेगवेगळ्या लेखनाचा- साहित्याचा होता. खरे तर मी कवितेचा क्लास जॉइन करणार होतो. कवितेत कसं थोडक्यात सांगितलेलं असतं! ते मला फार आवडतं. आइनस्टाईननं आपला सिद्धान्तदेखील  ए = टउ2 असा किती थोडक्यात सांगितलाय. त्यामुळे तो आपल्याला समजला नाही तरी लक्षात राहतो. पण हल्ली तर कवितेपेक्षाही शॉर्टकट मेथड आलीय. एसएमएसच्या भाषेमुळे आपली भाषा लोप पावणार असं म्हणतात. यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषणदेखील अशाच पद्धतीने छापले आहे असे म्हणतात. कवितेमध्ये काही वेळा एकेका कडव्याची खूप लांबण लावलेली असते. हायकू तीन ओळींचा असतो. तर आमच्या एका मित्राने चक्क तीन पानांचा हायकू वाचला होता. समोरच्या रसिकांचे जाऊ दे, पण अरे, लाऊडस्पीकरवाला पण हॉल सोडून निघून गेला. नानाचं तर म्हणणं असं की, ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढिला’ आणि शेवटी मग ‘हात नका लावू माझ्या साडीला’ अशी ताकीद देतात, त्याऐवजी सरळ ‘कृपया साडीला हात लावू नये’ अशी पाटीच का रंगवत नाहीत? कित्येक लोकांना कवितेतलं ठो पण कळत नाही. आता कवितेसाठी कसं सुचावं लागतं.. प्रतिभा लागते. मी आयुष्यभर फक्त मेमो बनवले. त्यामुळे प्रतिभा वगैरे काय आपल्याला कळत नाही. आता पाडगांवकरांनी ‘पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा’ असं लिहिलंय. अरे तातू, आपण इतकी र्वष पान खात आलो, पण या कोमल रेषा वगैरे आपल्याला बापजन्मी सुचलं नाही. कवी हा जन्माला यावा लागतो असे म्हणतात; पण असं म्हटलं की नाना लगेच ‘गाढवपण जन्माला यावं लागतं!’ असं म्हणतो. बीएला लॉजिक घेतलेल्या लोकांना कविता काय कळणार? आपला आणि उन्हाचा संबंध कपडे वाळत घालण्यापुरताच. पण कवीला ते ऊन हळदीचे वाटते. शेवटी सुचणे महत्त्वाचे असते! अरे, त्या श्रीराम नेन्यांना इतक्या लांब अमेरिकेत असूनसुद्धा माधुरीशी लग्न करायचं सुचलं याचं मला आश्चर्य वाटतं. कविता म्हणजे कसं सगळ्या सृष्टीवर आणि जगण्यावर प्रेम करायचं, असा पाडगांवकरांच्या कवितेचा सारांश आहे. पण वय झाल्यावरच या गोष्टी ध्यानात येतात. असो!

मी हो-ना करता करता शेवटी कवितेच्या क्लासला न जाता कादंबरीच्या क्लासला नाव घातले. आमच्या सरांनी सुरुवातीलाच- आपले सर्वाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरीच असते, हे सांगितल्याने खूपच हायसे वाटले. त्यांनी कादंबरीसाठी तीन पिढय़ांची आवश्यकता सांगितली : आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंडे. त्यामुळे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण रंगवता येते. म्हणजे लहान मुलाचे पात्र रंगवताना त्याला दुधाचे दात कसे येत जातात.. तारुण्यात ऊस कसा कडाकड दाताने सोलून खातो.. आणि पुढे कसे दाढदुखी, कवळी बसवणे, रूट कॅनॉल वगैरे असे प्रसंग रंगवता येतात. मी कधी साहित्याचा असा विचारच केला नव्हता. मी बाजारात गेलो तर कधीही यादी करून निघत नाही.

मात्र, कादंबरीत काय काय लागते त्यासाठी आता

यादी करावी लागणार. शेजाऱ्यांशी भांडण, इस्टेटीचे दावे, नातलगांचे ताण आणि नायक ठरवावा लागतो. त्याचे प्रेमाचे अनुभव दाखवावे लागतात. कल्पनाविस्तार म्हणून आपण शाळेत कथा लिहायचो- त्याचाच हा वाढवलेला प्रकार असतो. एकदा कथानक ठरवून घेतले म्हणजे प्रेमभंग काय, मृत्यू काय.. त्यात वाढवावे लागतात. नुसता ढाचा तयार करून भागत नाही, तर वर्णन करावे लागते. नायक बसमधून, किंवा परिस्थिती असेल तर कारमधून उतरून राघोबा निवासमध्ये शिरला, असं एका वाक्यात लिहिता येत नाही. मग काय बत्तीस पानांत कादंबरी आटपेल. आमच्या सरांनी त्यासाठी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघराचे वर्णन लिहून आणायला सांगितले.

मग मी तो प्रसंगच लिहिला..

‘सुमनला आज सुट्टी होती. अनायासे स्वयंपाकघर आवरायला घ्यावं म्हणून तिनं एकेक करत लायनीतले डबे काढले. तूरडाळ संपत आली होती तो डबा घासायला टाकला. सगळी कडधान्ये उन्हात ठेवली.  वसंताला गावच्या मटकीची उसळ आवडते म्हणून भाऊरावांनी खास मटकी आणली होती, ती उन्हात ठेवली. सगळं स्वयंपाकघर आवरता आवरता तिला दोन वाजले. मग तिने बाहेरूनच पोळीभाजी मागवली आणि सगळं स्वयंपाकघर धुऊन काढलं..’

आमच्या सरांनी हे वर्गात वाचून दाखवले. त्यांनी नायक-नायिकेच्या प्रेमाचादेखील प्रसंग लिहायला सांगितला. ‘ती दोघे एकरूप झाली’ या प्रसंगाचं वर्णन करताना मी, ‘एखाद्या नव्या साबणाच्या वडीत जुन्या साबणाचा तुकडा एकरूप व्हावा तशी ती त्याच्याशी एकरूप झाली,’ असे लिहिले. आता तो बिजवर असल्याने ही प्रतिमा सरांना फारच आवडली. १५ दिवसांत कादंबरीचा कच्चा फॉर्म तयार झालाय. तात्यांनी वाचून झाल्यावर, आपल्या वॉर्डमध्ये अजून या तोडीचा कादंबरीकार झाला नाही, असे सांगितले. कादंबरी छापून झाल्यावर खपवायसाठी तुझी मदत लागेल. इथल्या गॅसवाल्याला सांगून प्रत्येक सिलिंडरमागे एक प्रत देता येईल का, याची विचारणा केलीय. पुरस्काराचीदेखील चौकशी करून ठेवलीय. तुला थोडे विस्ताराने लिहिलेय. कारण तुझ्याशिवाय माझे ऐकून घेणारे दुसरे कोण आहे? असो.

तुझा
– अनंत अपराधी

 

अशोक नायगावकर
ashoknaigaonkar@gmail.com

 

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2016 12:46 am

Web Title: comment on trending topics 2
Next Stories
1 एका गुन्हेगाराची जडणघडण
2 मुक्याने गुळ खादला
3 साहित्य संमेलनाध्यक्ष व्हायचे आहे?
Just Now!
X