माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅक्लुहान यांनी एक सिद्धान्त मांडला आहे. मानवी ‘स्व’चा विस्तार म्हणून तो ‘माध्यमा’कडे पाहतो. आपण ई-मेल, चॅटरूम आणि वेबच्या माध्यमातून आपले विचार आणि कल्पना जगभर पोहोचवू लागलो. परंतु त्यामुळे आपण स्व-प्रतिमेच्या इतक्या अधीन गेलो आहोत, की आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. सध्या आपण ज्या प्रकारे संगणक, स्मार्टफोन वापरत आहोत, त्यावरून मॅक्लुहान यांचा सिद्धान्त खरा आहे हे समजते. तरीही हा वापर आताच्या सायबर विश्वामध्ये न टाळता येण्यासारखा आहे. मात्र, या सायबर विश्वाची तंत्रवैज्ञानिक ओळख करून न घेता, त्यातल्या संकल्पना समजून न घेता आपण हे तंत्रज्ञान वापरत आहोत. त्यातल्या संकल्पना समजून घेण्यासाठी ‘सायबर संस्कृती’ हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरावे. या पुस्तकाचे लेखक आहेत प्रा. रमेश नारायण वरखेडे.
विज्ञान आणि संस्कृती यांच्यात दोन ध्रुवाइतके अंतर आहे, असा सर सी. पी. स्नो यांचा सिद्धान्त आहे. वैज्ञानिक आणि कला यांच्यातल्या पोकळ्या काही वैज्ञानिकांनी बुजवल्या आहेत. पण सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, मराठी विषयाचे प्राध्यापक व साहित्यिक यांनी स्नो यांचा सिद्धान्त काही प्रमाणात खरा ठरवला आहे. मराठीचे प्राध्यापक व साहित्यिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाटेला ते वापरत असले तरी गेलेले नाहीत. पण प्रा. वरखेडे तसे नाहीत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मानव्य शाखेच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतर सायबर विश्व समजून घेण्यासाठी त्यांनी धडपड केली आणि त्यातून त्यांनी ‘सायबर संस्कृती’ या ग्रंथाची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी १३७ संदर्भ वाचले आणि अनेक अवघड संकल्पना सोप्या करून त्यांनी मराठीत या ग्रंथात सांगितल्या आहेत. ‘अनुष्टुभ’ या वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादक, महाविद्यालयीन शिक्षक, समीक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते या भूमिकांमधून काम करीत असताना विज्ञान-तंत्रज्ञानासारखा विषय त्यातील संकल्पनांसह आत्मसात करणे हे त्यांचे मोठेच वैशिष्टय़.
खरेदी-विक्रीच्या व्यवहारापासून वैचारिक-राजकीय संवाद प्रस्थापित करण्यापर्यंत, फॅशन डिझाइिनगपासून अभिरुचीसंपन्न संवर्धन या सर्व पातळ्यांवर संगणक, इंटरनेट मोडेम, मोबाइल, डिजिटल कॅमेरा या उपकरणांनी माणसाची सोबत केली आहे. सोशल मीडिया, ब्लॉग, सेल्फी, व्हॉट्स अॅप, हॅकिंग, स्ट्रिंग ऑपरेशन इत्यादी शब्द नुसतेच आपल्या कानावर पडत नाहीत, तर ते आपण प्रत्यक्षातही अनुभवतो आहोत. या तंत्रज्ञानाला ‘सांस्कृतिक उपकरण’ म्हणून जीवनव्यवहारामध्ये स्थान प्राप्त झालेले आहे. यातून नवीन जीवनशैली घडते आहे. अशा या संस्कृतीचा मागोवा प्रा. वरखेडे यांनी या पुस्तकात घेतला आहे. ते लिहितात, ‘सायबर संस्कृती अभ्यासात अनेक पारंपरिक अभ्यासक्षेत्रांचे सीमोल्लंघन झालेले आहे. सामाजिक संरचना, अस्मितांच्या धारणा, माध्यमांचे तंत्रज्ञान, आविष्काराचे घाट, संहितांचे भाषाद्रव्य, सायबर विश्वातील नैतिक मूल्ये, नेटाचार संहिता या अभ्यासक्षेत्रांचा सायबर संस्कृती अभ्यासात समावेश झाला आहे.’
‘सायबर विश्वाची उत्क्रांती’ या पहिल्या प्रकरणामध्ये लेखकाने लष्करी अंगाने विकसित झालेले संगणकीय संशोधन, इंटरनेटची वाटचाल, वेब पेजची संकल्पना, सायबर-स्पेस, वेब-२, विकिपीडिया ते सध्याची प्रचलित सर्च इंजिन्सची सोप्या मराठीमध्ये ओळख करून दिली आहे. ते म्हणतात, ‘वेब-२ हा दुसऱ्या नेटवर्क क्रांतीचा कालखंड प्रामुख्याने तरुण व्यावसायिकांचे आत्मभान जागवणारा कालखंड आहे. सतत स्पर्धेसाठी तयार राहणे हा आज युगधर्म बनला आहे. नेटवर्क हे रेल्वेरुळासारखे संक्रमणाचे माध्यम आहे. रेल्वेरुळ हे कधीच स्थानिक वा जागतिक नसतात. ते म्हटले तर सर्वार्थाने स्थानिक असतात आणि त्याचवेळी ते आपल्याला अनेक ठिकाणी घेऊन जात असल्याने वैश्विकही असतात. आधुनिक नेटवर्क स्थानिक आणि वैश्विक यांच्यात संबंध प्रस्थापना करणारी मध्यस्थाची भूमिका निभावत असतात. भविष्यातील व्यूहनीती रचण्यासाठी नेटवर्कचा अधिक समंजस उपयोग करून घेण्यातच शहाणपण आहे.’
सायबर विश्वातील यंत्रे, अनुभवकथनाची विविध माध्यमे, ती हाताळणारी माणसे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात रचलेली विविध कथानके व संगणकीय प्रतिमाविश्व यांतून सायबर संस्कृती आकारीत होते. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल होतात, या गृहितकावर सायबर संस्कृती-विचारांची मांडणी होत आलेली आहे. संगणक ही जितकी तंत्रज्ञानात्मक वस्तू आहे, तितकीच ती सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक वस्तू आहे. या तंत्रज्ञानात्मक सवयीतून इंटरनेट-समाज आकार घेत आहे.
सायबर संस्कृतीत इंटरनेट आणि डिजिटल संज्ञापन माध्यमांना मध्यवर्ती स्थान आहे. सायबर विश्वाच्या परिघात रेडिओ, दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट, ध्वनिमुद्रित संगीत, सिनेमा अशा माध्यमांचे संमीलन झाले असून त्याद्वारे सांस्कृतिक रचनेमध्ये देवाणघेवाण झाली आहे.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आपण या सायबर संस्कृतीचे घटक म्हणून अतिवेगाने तिच्यात सामील झालो आहोत. सोशल मीडिया आज चुकीच्या संदेशप्रसारात गुंतला आहे. कुजबुज वाढली आहे. मध्यपूर्वेतली अशांतता आणि हिंसा तसेच दहशतवाद्यांचा मोठा हिस्सा सायबर संस्कृतीमुळे वाढला आहे. सोशल मीडियावरील चुकीचे संदेश प्रसारित करण्यावर लक्ष ठेवण्यात आले नाही तर गोंधळ, अराजकता निर्माण होऊ शकते. मात्र, चांगल्या कामांसाठी, आजारांवर उपचार करण्यासाठी, मदतीसाठी उपाय सुचवणारी, माणसाला अधिक सुसंस्कृत बनण्यासाठी या सायबर संस्कृतीचा उपयोग झाल्यास उत्तमच.
दुसऱ्या प्रकरणामध्ये ‘नेटवर्क समाज’ या विषयावर लिहिताना विविध आंतरजालांचा परिचय करून देण्यात आला आहे. सोशल नेटवर्क, आर्थिक आंतरजाल, राजकीय आंतरजाल, शैक्षणिक आंतरजाल, तंत्रसेवांचे आंतरजाल अशा विविध आंतरजालांचे उपयोग काय, ते त्यात सांगितले आहेत.
तिसरे प्रकरण ‘सायबर संस्कृती’ या विषयावर आहे. सायबर संस्कृती आणि स्त्रियांचे सबलीकरण, स्त्रियांच्या वेबसाइट्स, ब्लॉग्स याविषयी माहिती या प्रकरणात आहे. सायबर संस्कृतीच्या सत्तेची कल्पना जॉर्ज ऑर्वेल, आल्ड्स हक्स्ले, ई. एम. फॉर्स्टर यांनी कित्येक दशके अगोदर केली होती. व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण, माहितीभ्रम पैदा करणाऱ्या यंत्रणेचा धुमाकूळ आणि इलेक्ट्रॉनिक भांडवलशाहीचा वरचष्मा ही त्यातील तीन भाकिते आज खरी ठरली आहेत. आता सायबर गुन्हेगारी, हॅकिंग, क्रॅकिंग, आभासी युद्ध म्हणजे काय, ते आपल्याला समजते आहे. दहशतवादी हल्ले आपल्याला माहीत आहेत. त्यात या यंत्रणांचा दहशतवाद्यांनी अत्यंत हुशारीने वापर केलेला असतो.
चौथ्या प्रकरणामध्ये सायबर संस्कृतीच्या वाटचालीची सैद्धान्तिक चर्चा करण्यात आली आहे. पाचव्या प्रकरणामध्ये सायबर विश्वातली परिभाषा दिलेली आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी पारिभाषिक संकल्पना दिलेली आहे. पुस्तकातल्या शंभर पानांमध्ये हे शब्द दिलेले आहेत. नुसतेच प्रतिशब्द न देता शब्दकोशाप्रमाणे प्रत्येक संकल्पनेचा अर्थही दिला आहे. यामुळे मराठी शब्दही रुळायची शक्यता आहे. त्याशिवाय सायबर क्रांतीचा इ. स. १८०३ मध्ये सुरू झालेला आजतागायतचा कालपट एका परिशिष्टामध्ये आहे. संदर्भ/ वाचनसूचीचे दुसरे परिशिष्ट आहे. तिसऱ्या परिशिष्टामध्ये प्रत्येक प्रचलित शब्दांची संक्षेपरूपे देऊन त्यांचा मूळ शब्द दिलेला आहे. चौथ्या परिशिष्टामध्ये इंग्रजी-मराठी पारिभाषिक शब्दावली आहे
या पुस्तकामध्ये विवेचनाचा मुख्य भर इंटरनेट क्रांतीनंतर अस्तित्वात आलेल्या आभासी जगाचा संबोध स्पष्ट करणे, सामाजिक संज्ञापनांच्या शैलीचा मागोवा घेणे, आर्थिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रांना या तंत्रज्ञानाने कसे घेरले आहे, यावर आहे. आणि ते सोप्या मराठीत सांगण्यात प्रा. वरखेडे यशस्वी झाले आहेत.
संपूर्ण पुस्तकामध्ये मराठी शब्द जागोजागी वापरले आहेत. ते अर्थवाही आहेत. परंतु त्यातले अनेक शब्द आपल्या परिचयाचे नाहीत. त्या शब्दांबरोबर लगेचच इंग्रजी शब्द दिलेले आहेत. तसे ते दिले नसते तर जागोजाग वाचताना अडखळल्यासारखे झाले असते. केवळ मराठी शब्दच वापरला जावा असा लेखकाचा आग्रह नाही. परंतु यानिमित्ताने मराठी पारिभाषिक शब्द वापरले गेले, ते चांगले रुळल्यानंतर आत्मसात झाले तर उत्तमच. भविष्यात अशा प्रकारचे लेखन मराठीतून वाढेल असा विश्वासही लेखकाला वाटत असावा. संगणक नवसाक्षरांना इंग्रजी व मराठी शब्द सारखेच. त्यांना या पुस्तकाचा चांगलाच उपयोग होईल.
‘सायबर संस्कृती’- रमेश नारायण वरखेडे, इन्स्टिटय़ूट ऑफ नॉलेज इंजिनीयरिंग, नाशिक,
पृष्ठे- ३४४, किंमत- ३५० रुपये.
जयंत श्रीधर एरंडे director@ikeonline.org
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2016 रोजी प्रकाशित
आभासी जगाचा संबोध
विज्ञान आणि संस्कृती यांच्यात दोन ध्रुवाइतके अंतर आहे, असा सर सी. पी. स्नो यांचा सिद्धान्त आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-07-2016 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber sanskruti book by dr ramesh warkhede