डॉ. नागेश टेकाळे

विज्ञानप्रसाराचा वसा घेतलेल्या मराठी विज्ञान परिषदेने पंडित पब्लिकेशन, कणकवली यांच्या सहकार्याने ‘शंभर वनस्पती शास्त्रज्ञ’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. वृक्षाचे खोड आणि पाने यांच्या कलात्मक मांडणीचे आकर्षक मुखपृष्ठ असलेल्या या पुस्तकाचे संपादन मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी केले असून पुस्तकात त्यांची अभ्यासू प्रस्तावनाही समाविष्ट आहे. पुस्तकात प्रत्येक पृष्ठावर एका वनस्पतीशास्त्रज्ञाची आणि त्याच्या संशोधनाची ओळख करून दिली आहे. अनेक विद्यार्थी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतात, काही विज्ञानप्रेमी केवळ आवड म्हणूनही या शास्त्राशी जवळीक साधतात. परंतु शास्त्रज्ञांच्या संदर्भाअभावी या अभ्यास आणि वाचनात अनेक वेळा अपुरेपण राहते. या पुस्तकामुळे ही उणीव दूर होऊ शकते. पुस्तकातील सर्वच चरित्रात्मक टिपणे वाचनीय झाली आहेत. याचे कारण ती नामवंत वनस्पतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लिहिली गेली आहेत. काही अपवाद वगळता महाराष्ट्रामधील वनस्पतीशास्त्रज्ञांमुळे हे पुस्तक समृद्ध झाले आहे. यातील काही चरित्रे- उदा. डॉ. आनंदचंद्र दत्ता, डॉ. हेमा साने, डॉ. जानकी अम्मल, प्रा. श्री. द. महाजन, डॉ. बी. जी. एल. स्वामी, डॉ. दिलबागसिंग अटवाल, डॉ. अदिती पंत.. वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आणि तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील. ओघवती भाषा, आकर्षक मांडणी, शास्त्रज्ञांची रंगीत छायाचित्रे ही या पुस्तकाची जमेची बाजू ठरावी.

‘शंभर वनस्पती शास्त्रज्ञ’

संपादन- अ. पां. देशपांडे

पंडित पब्लिकेशन, कणकवली,

पृष्ठे- ११०, मूल्य- १२० रुपये.