03 March 2021

News Flash

प्रांजळ आणि थेट आत्मकथन

तर, याच करण जोहरने स्वत:च्या आयुष्यावर आधारित ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ हे पुस्तक लिहिले आहे.

सिने-कलाकारांच्या दैनंदिन जीवनापासून ते त्यांची प्रेमप्रकरणे, लफडी, लैंगिक आवडीनिवडी अशा प्रत्येक गोष्टीत चाहत्यांना कुतूहल असते. असाच एक कलाकार म्हणजे करण जोहर. रूढार्थाने तो अभिनेता नाही, तरीही ‘स्टार’ मात्र आहे. त्याच्या सिनेमांवर प्रचंड टीका होते, पण ते मोठय़ा प्रमाणात पाहिलेही जातात. वैयक्तिक आयुष्यातही त्याच्या ‘वेगळे’ असण्यामुळे लोकांची टीका, तिरस्कार त्याला सहन करावा लागतो; तितकेच त्याला पाठिंबाही मिळत असतो.

तर, याच करण जोहरने स्वत:च्या आयुष्यावर आधारित ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ हे पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी यांनी ‘खरं सांगायचं तर..’ या नावाने केला आहे. करणविषयी लोकांना जे जे वाचायचे आहे, समजून घ्यायचे आहे त्यातील बऱ्याचशा बाबी या पुस्तकातून स्पष्ट मांडल्या आहेत. अर्थात, त्याचे खासगीपण राखूनच!

करणने अगदी आपल्या लहानपणापासून ते थेट आत्तापर्यंतच्या प्रवासातील अनेक घटना या पुस्तकात उलगडून दाखवल्या आहेत. त्याचे खास मलबार हिल स्टाइल बालपण तो सांगतो. एकुलता एक असल्याने आई-वडिलांचा प्रचंड लाडका असलेला हा मुलगा, मनात मात्र आपल्या स्थूलपणाची आणि काहीसे बायकी असण्याचा सल घेऊन जगत होता. ‘बायल्या’ म्हणून चिडवले जाणे, हे काही करण जोहरला नवीन नव्हते. पण लहानपणी त्याचा होणारा परिणाम आणि आता चाळिशीपर्यंत पोहोचल्यावर ट्रोल्सच्या अशा चिडवण्याचा परिणाम यातला फरक तो सहज उलगडून सांगतो. शाळेतली वागणूक, बोर्डिग स्कूल्समधून पळून येणे, फिल्म व्यवसायातल्या व्यक्तींशी असलेले जवळचे संबंध या सगळ्याचबद्दल त्याने विस्तृत लिहिले आहे. यश चोप्रा आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या कुटुंबीयांशी जोहर कुटुंबीयांचे जवळचे संबंध होते. पण त्यांच्यामुळे करण सिनेमात आला नाही. त्याला सिनेमाने नेमके कशा प्रकारे स्वत:कडे ओढले, याची एक छान गोष्ट तो सांगतो. ‘डीडीएलजे’च्या दिवसात करण सहज रमतो, तसेच ‘धर्मा प्रोडक्शन’चा डोलारा सांभाळताना आलेला ताण आणि भीतीही सहज सांगून जातो. या प्रवासात त्याला ज्या न्यूनगंडांशी लढावे लागले, त्यांच्यावर मात करावी लागली, त्याबद्दलही त्याने लिहिले आहे. शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा या दोघांसोबत असलेले त्याचे खास नाते, शाहरुख आणि त्याच्याबद्दल होणारी कुजबूज या सगळ्याबद्दल करणने अगदी मोकळेपणाने लिहिले आहे. वडिलांचा मृत्यू ही त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारी सगळ्यात मोठी गोष्ट होती. या घटनेबद्दल करणने फार समरसून लिहिले आहे. पण त्याचे विशेष कौतुक करायला हवे ते पुस्तकातल्या दोन प्रकरणांसाठी; ‘लव्ह, रिलेशनशिप अ‍ॅण्ड सेक्स’ व ‘चाळिशीतली अस्वस्थता’- ही ती दोन प्रकरणे. करणच्या लैंगिक निवडीविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. त्याविषयी नको इतकी उत्सुकता लोकांमध्ये आहे. करण हा विषय अतिशय समंजसतेने उलगडून सांगतो. कोणत्याही चाळिशीतल्या माणसाला ज्या चिंता भेडसावतील, त्याच करणलाही भेडसावतात. सरोगसीच्या माध्यमातून तो दोन मुलांचा पिता झाला आहे. ‘आपल्यामागे कोण?’ हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न त्यालाही पडला आणि त्याने हा निर्णय घेतला. या मुलांचे पालकत्व स्वीकारण्यामागची अस्वस्थता त्याने प्रांजळपणे सांगितली आहे. याचबरोबर त्याचा बहुचर्चित कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ आणि ‘एआयबी रोस्ट’सारख्या कार्यक्रमात सहभागी होण्यामुळे त्याला झेलावी लागणारी प्रचंड टीका याबद्दलही त्याने थेट लिहिले आहे.

‘खरं सांगायचं तर..’- करण जोहर

अनुवाद – नीता कुलकर्णी,

 रोहन प्रकाशन,

पृष्ठे- २२८, मूल्य- २५० रुपये.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:54 am

Web Title: loksatta book review 5
Next Stories
1 .. पुन्हा उभा राहीन!
2 भैरप्पांच्या साहित्याचा रसस्पर्शी वेध
3 ऐतिहासिक चरित्रग्रंथ
Just Now!
X