ममध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य सांभाळण्याची अत्यंत कठीण अशी कामगिरी त्यांनी प्रतिकूल काळात पार पाडली. आजवर इतिहासलेखकांकडून त्यांना पुरेसा न्याय मिळालेला नाही. या पाश्र्वभूमीवर ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या डॉ. जयसिंगराव पवार लिखित ग्रंथाने ही उणीव दूर केली आहे. ४२४ पृष्ठांचा हा ग्रंथ छत्रपती राजाराम महाराजांवरील मराठीतील पहिलाच एवढा मोठा चरित्रग्रंथ आहे.

२४ प्रकरणे आणि चार परिशिष्टे असा भरभक्कम ऐवज या ग्रंथात आहे. ख्यातनाम इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी हा ग्रंथ लिहून मराठय़ांच्या इतिहासातले एक न्यूनच दूर केले आहे. त्यांनी विषयाला आणि ‘छत्रपतीं’ना न्याय दिला आहे. प्रस्तावनेमध्ये ग्रंथकारांनी मराठीजनांच्या इतिहास लिहून न ठेवण्याच्या वृत्तीकडे लक्ष वेधले आहे. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारीत शेकडो कारकून होते. एकालाही असे वाटले नाही, की आपण कर्नाटक स्वारीचा अथपासून इतिपर्यंतचा इतिहास लिहून काढावा. आपणास या मोहिमेची माहिती पोर्तुगीज- इंग्रजांकडून मिळाली. यावरून महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास लिहिणे किती जिकिरीचे काम आहे, हे आपल्या ध्यानात येईल.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

महाराष्ट्रातील इतिहासकार, कादंबरीकार आणि नाटककार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भरपूर लिहिले. (खरं तर जागतिक इतिहासपर साहित्याचा विचार केल्यास ते अपुरेच ठरते.) छत्रपती संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचे जीवन मात्र दुर्लक्षित राहिले आहे. ग्रंथकार त्यांची खंत पुढील शब्दांत व्यक्त करतात : ‘छत्रपती संभाजी महाराजांस तर मराठी बखरकार व मोगल, तसेच इंग्रज इतिहासकार आणि सरदेसाई-सरकार यांच्यासारखे स्वदेशी इतिहासकार यांनी राज्यबुडवा व बदफैली म्हणून वाळीतच टाकले होते. त्यानंतर राजाराम महाराजांची प्रतिमा त्यांच्याकडून दुबळा व अकार्यक्षम राजा म्हणून रंगविली गेली. महाराणी ताराबाईंना तर एका ‘भ्रांत’ मुलाची स्वार्थी आई म्हणूनच स्थान दिले गेले. ताराबाईंनी पुढे शाहूराजांशी व पेशव्यांशी संघर्ष केला म्हणून तर इतिहासकारांनी तिच्यावर सत्तापिपासू म्हणून शिक्का मारून बहिष्कृत केले. औरंगजेब बादशहाशी सात वर्षे अविरत लष्करी संघर्ष करणारी आणि आपल्या लष्करी व राजनैतिक डावपेचांनी त्यास महाराष्ट्रातच दफनभूमीचा शोध घ्यावयास लावणारी ताराबाई मात्र मराठी इतिहासकारांना भावली नाही!’ आजवरच्या इतिहासलेखनातील ही उणीव लक्षात घेऊनच डॉ. पवार ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ हा ग्रंथ लिहिण्यास उद्युक्त झाले.

हा ग्रंथ लिहीत असताना लेखकाने पूर्वसुरींच्या मर्यादासुद्धा अगदी योग्य शब्दांत दाखवून दिल्या आहेत. लेखकाला गुरुस्थानी असणारे ख्यातनाम इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांचे एक उदाहरण पुरेसे आहे. त्यांच्या ग्रंथाचे नाव ‘श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी लढा’ असे आहे. यावरून बेंद्रे यांचा या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. लेखकाने नुसते त्या ग्रंथाचे नाव देऊन कार्यभाग साधलेला नाही, तर बेंद्रे यांच्या ग्रंथातील एका प्रकरणाचे नाव ‘राजा शाहूच्या आगमनापूर्वीच्या महाराष्ट्रातील हालचाली’ याला पर्याय ‘ताराबाईकालीन महाराष्ट्रातील हालचाली’ असे सुचविले आहे. दोन इतिहासकारांचा या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे आपणास या उदाहरणावरून समजू शकेल.

या ग्रंथाने छ. राजाराम महाराजांच्या मुत्सद्देगिरीवर प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य वाचक ज्या घटनांबद्दल अनभिज्ञ असतो अशा कितीतरी घटना आपल्यासमोर येतात. त्या वाचल्यावर राजाराम महाराज आपणास किती ‘मोठे’ आहेत ते समजते. याची तीन उदाहरणे महत्त्वाची आहेत. ती अशी- १) जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला जुल्फिकार खान आतून मराठय़ांचा पक्षपाती होता. २) औरंगजेबचा पुत्र शहाजादा कामबक्ष आणि मराठे एकत्र येऊन औरंगजेबविरुद्ध बंड करण्याच्या तयारीत होते. ३) हणमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे या सरदारांस दिल्ली जिंकल्यास महाराज अडीच लाख होनांचा सरंजाम देणार होते. वरील तीन उदाहरणांमधून आपणास राजाराम महाराजांची मुत्सद्देगिरी व महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या वतनधोरणाचीही चिकित्सा सविस्तर केलेली आहे.

ग्रंथातील २४ प्रकरणांपैकी ‘स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले पर्व’ या प्रकरणात इ. स. १६८१-८९ या कालखंडाचा आढावा घेतलेला आहे. राजाराम महाराजांची कारकीर्द समजून घेण्यासाठी छ. संभाजी महाराजांची कारकीर्द अभ्यासणे आवश्यक आहे. ‘राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास..’ या प्रकरणात महाराजांना जिंजीला जाण्याचा निर्णय अपरिहार्यपणे का घ्यावा लागला, याची कारणमीमांसा केली आहे. कर्नाटकातील मोगल-मराठा संघर्षांने या ग्रंथातील आणि छत्रपतींच्या जीवनातील मोठा भाग व्यापला आहे. या भागात लेखकाने ‘कर्नाटक म्हणजे कोणता प्रदेश?’ याचा चांगला ऊहापोह केला आहे. उत्तम नकाशा दिला आहे. ग्रंथातील तब्बल १२ प्रकरणे या संघर्षांने व्यापली आहेत. ग्रंथातील पुढचा भाग मुघल- मराठा संघर्ष (महाराष्ट्र), मराठे आणि परकीय सत्ता यांचे संबंध, प्रशासन व्यवस्था, लष्कर, लोकजीवन, स्वातंत्र्ययुद्ध, पत्रव्यवहार, कालपट, मुद्रा, सूची या सगळ्यांनी समृद्ध आहे.

ग्रंथाच्या पलीकडे जाऊन एक विचार करायला हवा, की आपण इतिहासाचा अभ्यास का करतो? इतिहासातील हे दुर्लक्षित नायक का अभ्यासायचे? औरंगजेब भाग्यवान; कारण त्याला सर जदुनाथ सरकार यांच्यासारखा समर्थ इतिहासकार भेटला. मराठय़ांच्या इतिहासाबाबत आपणास फार कमी व्यक्तींबद्दल असे म्हणता येईल. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढील २७ वर्षे सुरू राहिलेल्या अविरत संघर्षांमुळे ऐतिहासिक कागदपत्रे राजधानीच्या किल्ल्यावर सुखरूप राहणे अवघड झाले. व्यक्तिगत पातळीवर महत्त्वाचे कागद सरदारांनी सांभाळले. मुघलांनी केलेल्या जाळपोळीत रायगडावरचा दफ्तरखाना नष्ट झाला. महत्त्वाचे ऐतिहासिक स्रोत कायमचे नष्ट झाले. त्यांचे पुनर्निर्माण करणे अशक्य झाले.

महाराष्ट्रात एकूणच इतिहासलेखनाची आणि जतनाची परंपरा प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास आपणास तो विविध साधनांमधून, विखुरलेल्या कागदपत्रांमधून, साहित्यातून शोधावा लागतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. परकीय भाषांमधील साधने अनुवादित करून घ्यावी लागतात. ती तपासावी लागतात. लिहिणाऱ्यांचे हेतू तपासावे लागतात. या सगळ्यातून आपणास सत्याच्या जवळ जाता येते; सत्य सापडतेच असे नव्हे. ते अन्य पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे लागते.

महाराष्ट्रात मोडी कागदपत्रांच्या रूपाने असे पुरावे आहेत. या मोडी कागदपत्रांना हात लावण्याची, त्यावरील धूळ झटकण्याची गरज आहे. मोडी लिपीचे लिप्यंतर करणारे आणि मोडीचा अभ्यास करणारे यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सामूहिक स्वरूपाचे ऐतिहासिक संशोधन फारसे निर्माण झालेले नाही. आपल्याकडे एकांडय़ा शिलेदारांची मोठी परंपरा आहे. चार-पाच संशोधक एकत्र येऊन एखाद्या विषयाला भिडताहेत असे दृश्य दुर्मीळ आहे. छ. राजाराम महाराजांना रियासतकार सरदेसाई, वा. सी. बेंद्रे, अ. रा. कुलकर्णी, ग. ह. खरे आणि जयसिंगराव पवार इत्यादी इतिहासकारांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काही वेळा न्याय देण्याच्या नादात अन्यायही होतो, याचे सोदाहरण स्पष्टीकरण ग्रंथात आहेच.

  • ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’
  • डॉ. जयसिंगराव पवार
  • महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर,
  • पृष्ठे- ४२४, मूल्य- ६०० रुपये.

गणेश राऊत