|| गिरीश कुलकर्णी

हल्ली सूर्योदय पाहणे होते. बऱ्याचदा धावत्या गाडीच्या खिडकीतून अचानक ‘पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची’ असे बालकवींनी वर्णिलेले आभाळ चमकत सर्वत्र पसरते. नजरेतून मनात झिरपणाऱ्या दृश्यासवे त्यांच्या ओळी आठवतात-

‘कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलाबाची?

पूर्व दिशा मधु मृदुल हासते गालीच्या गाली

हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगलकाली.

वाटतं, उठलं नेमानं लवकर अन् पाहिली नेमे ही आनंदउधळण, तर होता येईल अजूनही मुग्ध साधेपणानं. कुणी पाहावं म्हणून नाहीच तो चितारीत आभाळ, पण पाहणाऱ्या प्रत्येकालाच मिळू शकतो आनंद रंगून जाण्याचा. गाडीसंगे विचारचक्र धावते होत तंद्री लावते. चाकांचे फिरते आरे विशिष्ट गती साधता एकसंध होत विलगता टाकतात तद्वत मी हरवून जातो त्या धावत्या दृश्यात. पहाटेच अमर अन् नितीनसह निघालो होतो मातीपरीक्षणाला. आणिकही दोन गाडय़ा होत्या निघाल्या. सरदवाडीत मिसळ खायला भेटायची बात ठरली होती. प्रशिक्षण घेऊन आल्यापासूनच या दिवसाची ओढ लागली होती. प्रशिक्षणानंतरचा मित्रांमधला उत्साह थोडा ओसरला होता. ‘एक संपलं की दुसरं चालूच आहे या गिऱ्याचं,’ वाटलंही असेल कुणाला. ऐनवेळी काहीजण गळाले. मी खट्ट झालो. तरी येणाऱ्यांत मात्र उत्साह होता. धनिष्ठा कल्याणकर या तशा अपरिचित. आमच्या कुणाशीच थेट ओळख नसलेल्या. पण श्रमदानाला आल्या होत्या. अन् आताही हिरिरीनं पुढे होत्या. मला अचंबा वाटला त्यांच्या उत्साहाचा. मुक्कामी दौरा असतानाही त्या उत्साहात निघाल्या होत्या. प्रशिक्षणाला आलेली निर्मला सोबत असल्यानं ‘दोन महिला अनिवार्य’ या पाणी फाऊंडेशनच्या अटीची पूर्तता होत आहे, असं वाटून हसू आलं. आनंद पंडितच्या गाडीत या दोघींसह अभिषेक कुलकर्णी हा माहिती तंत्रज्ञ, अभियंता पोरगा. हसतमुख अन् गमत्या. तोही असाच परहस्ते जोडला गेलेला. आणि तिसऱ्या गाडीत चेतन, अतुल, धनंजय हे तीन कुलकर्णी अन् आसीफ पठाण हे उद्योजक मित्र. नगरच्या अलीकडे गुगल भाभीनं सांगितलं म्हणून सोलापूर बायपासला घुसला गुलफाम. त्याचा या भाभीवर कोण विश्वास, पण आमच्या सां. बां. विभागाची कार्यक्षमता एवढी अफाट की, एका फटक्यात भाभीची विश्वासार्हता नष्ट करत गुलफाम म्हणाला, ‘‘ये ऐसेच करती कभी कभी. उसको खड्डे गीड्डे नई दिखते.’’

वस्तुत: ‘समग्र पाताळ सहल’ म्हणून फिरवून आणता यावं एवढाले खड्डे! दिसत नसतील कोणाला? याला रस्ता म्हणतात? कुणी बांधला हा असा रस्ता? एकही पुढारी चुकूनही या वाटेला जात नाही?.. मंगलकाळी राग अनावर होत असतानाच सत्यजितचा फोन आला. प्रसन्नता किणकिणली. म्हटलं, ‘‘नमस्कार, वेळेत होतो, पण चुकून हा बायपास घेतल्याने थोडा उशीर होईल.’’ तो हसला. म्हणाला, ‘‘अरे, मीही रस्त्याची मौज अनुभवतोय इकडे. नांदेडला आहे. संपूर्ण मराठवाडय़ाला खास ओळख मिळावी म्हणून हे असे रस्ते ठेवले असावेत.’’ अडचणी, विपदांबाबतची सत्यजितची मिश्कीलतेची मात्रा स्वत:ला चाटवीत आम्ही गुलफामला ‘‘भाभी का क्या दोष रे? वो क्या श्टेिरग फिराई क्या तेरा?’’ असं चिडवीत ते सप्तपाताळ पार करून एकदाचे रुईछत्तीशीत डावीकडे वळलो. ‘वाहिरा’ गावात जाऊन माती परीक्षण करायचं होतं. ‘ढांग टीक टाक टीक’ स्वागत झाल्यावर छान बोलणं झालं गावकऱ्यांशी. समजावून सांगितलं त्यांना की, माती परीक्षण कसं महत्त्वाचं आहे. संभाजी, प्रवीण, रवी पोमणे या सगळ्या पाणी फाऊंडेशनच्या टीमनं सुसज्ज तयारी केली होती. दोघांची टीम करून आम्ही कामाला लागलो. हाताळण्यास अगदी सुलभ असा ‘परीक्षण संच’ विकसित केल्याबद्दल ‘बीएआरसी’च्या शास्त्रज्ञांचे मनोमन आभार मानत हसत खेळत काम पार पडत होतं. मात्र बहुसंख्य माती नमुन्यांमध्ये सेंद्रिय कर्ब ‘लो’ निघत असल्यानं उन्हाचा चटका जाणवायला लागला होता. सय्यदबाबा नावाच्या अवलियाच्या मंदिरात मध्येच चार दोन नमुने ‘मध्यम’वाले निघाले की झुळूक आल्यागत होई. पण एकंदरीत कल ‘आजारी’ असण्याकडे असल्यानं गांभीर्यानं मातीच्या आरोग्याबद्दल चर्चा झडली. पूर्वी गावाकडं कसं सगळ्या समस्येवरचं उत्तर होतं, शेतकरी कुटुंबाच्या दिनचय्रेतून कसं निसर्गसंगोपन घडे, याबद्दल लहानपणचे अनुभव काहींनी सांगितले. भरल्या वांग्याचा रस्सा अन् भाकरी खाऊन मंडळी परत कामाला लागली. उन्हं कलेस्तोवर सगळे नमुने तपासून हातावेगळे केले.

निघताना ‘हातवळण’ची आठवण झाली. वाहिऱ्यात येताना वळणावर लागणारं हे हातभर गाव. गाव काम करीत नाही, पण तीन प्रशिक्षणार्थी मात्र न हटता लढतायत हे ऐकून आवर्जून हातवळणी वळलो होतो. समीर सय्यद नावाचा बहाद्दर भेटला. शाळेच्या आवारात समीरसह एक महिला ग्रामपंचायत सदस्य अन् आणिक एक जण काम करीत होते. मी जाऊन थोडय़ा पाटय़ा भरल्या. सांकेतिक मदत केली. ‘‘या निवडून आल्या आनि हे काम करतायत म्हनून बाकीचे येईनात,’’ असं समीरनं सांगितलं. मी म्हटलं, ‘‘मी संध्याकाळी येतो. गाव जमा कर. मी हात जोडतो. पाहू काही फरक पडला तर.’’ समीर बरं म्हणाला. घाईने एका पिशवीतून एक शीतपेयाची बाटली पुढे करीत मला म्हणाला, ‘‘बरं वाटलं तुमाला भेटून. घ्या!’’ मी म्हटलं, ‘‘नको गडय़ा, मी काय हे असलं पीत नाही. पण तू सभा तेवढी भरव. बघू प्रयत्न करून.’’ वाहिऱ्यातून निघताना हाच विचार होता. हातवळण आलं तसा समीर गाडीजवळ आला. सभेला कुणी आलं नव्हतं. ‘‘चहा पिता का?’’ त्यानं आग्रह धरला. माझं मन मात्र पुरतं विरजलं होतं. आजूबाजूच्या टपऱ्यांना लगडलेली माणसांची गर्दी होती. मी ‘नको रे’ म्हणत त्याला शुभेच्छा देत डोळे भरून पाहिला. माणसाला इतकं भाबडं होता येतं? इतकी नकारात्मकता आजूबाजूस विळखा घालून असताही विश्वास ठेवता येतो? नगरला मुक्कामी येईस्तोवर समीर सय्यदनं घर केलं डोक्यात. मला ‘बावी’ची आठवण आली.

‘बावी’ नावाच्या गावी अशीच तऱ्हा पाहिली होती. डोंगराच्या ऐल उतारावर बावी अन् पल उतारी ‘कावलदरा’ अशी दोन गावं. बावीत गाडी शिरली तेव्हा माणसांनी रस्ता भरून गेलेला. मी म्हटलं विकासला, ‘‘आहे ना नक्की श्रमदान? सगळी तर इथेच आहेत.’’ विकास सोलापूरचा तालुका समन्वयक. लहानखुरा, चुणचुणीत व प्रेमळ. ‘‘चालू आहे. गावाची लोकसंख्या बऱ्यापकी आहे.’’ मग चालत आम्ही डोंगरउतारावर श्रमदान चालू होतं तिथे पोहोचलो. तर तिथं फक्त स्त्रिया काम करीत होत्या. दीड-दोनशे तरी असतील. आणि लेकरं होती, बरीच. अत्यंत एकाग्र काम चालू होतं. त्यांना मी दंडवत घातला. पुरुष न येण्याचं कारण विचारता एक मावशी हसून म्हणाली. ‘‘आन् मंग दारू कोन पील?’’ ‘‘आमी ठरवलंय पन. आमी पानी अन्नारच गावात.’’ मला वाटलं सरळ गावात घुसावं आणि गाडीच्या टपावर उभं राहून शिव्या घालाव्या. मी रागात तसं म्हणालो सुद्धा. तर गुलफाम पटकन् म्हणाला, ‘‘हाँ! वो भारी होएंगा! गालीच देना मंगता ईनको.’’

नाही केलं तसलं काही. लोकांना प्रेमानं आणि समजावून सांगतच आणायचंय. बळजबरीनं, रागावून, फसवून नाही. होते परवड यात सगळ्या भाबडय़ा जिवांची. मूर्ख ठरवले जातात विश्वास ठेवणारे. पण त्याला ईलाज नाही. ‘‘हा हिन्दी सिनेमा नव्हे गुलफाम. मैं सटकके कुछ बोला तो तू करेक्ट करने के बजाय आग मे रॉकेल डालता क्या?’’ आमचा गुलफाम उत्तम मराठी बोलतो. पण प्रवासाचा शीण वा प्रसंगाचा ताण घालवण्याचा आमचा हा आवडता मार्ग आहे. हिन्दी, उर्दूचे लचके तोडत ताण जिरवायचा. ‘‘पर सबके सब टपरीपे बठेले हैं!’’ चीड यावी असंच दृश्य. पलथडी कावलदऱ्यात मात्र पुरुष सकाळी सहा ते आठ श्रमदान करून सोलापुरी मजुरीला जातात. आल्यावर परत रात्रीही श्रमदान चालतं. लमाण तांडय़ांचं गाव दिवसाचं काम संपताच गोलाकार फेर धरून तालात नाचतं. गाणी म्हणत आनंदून जातं. मीही फिरलो त्या गोलात लमाण होत, लहान होत.

नगरला ‘बीजेएस’ अर्थात ‘भारतीय जैन संघटने’ची मंडळी भेटली. मांजरसुंब्यात महाश्रमदान होतं दुसऱ्या दिवशी सकाळी. त्याचं नियोजन करायला आली होती. हे फारच प्रेमळ आहेत ‘बीजेएस’वाले लोक. शांतीभाऊंच्या भोवती राहण्याचा परिणाम बहुधा!

सकाळी मांजरसुंब्यात ‘अबब!’ म्हणावं एवढी गर्दी. गाडय़ाच गाडय़ा. माणसंच माणसं. कलेक्टर उमदा अन् तरुण गडी. जाणीवपूर्वक मराठी बोलण्याचा यत्न करणारा. बोलण्यापेक्षा करण्याकडे कल असलेला हा अधिकारी मला आवडला. माणसांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सकाळपासून या हजारो हातांनी माळ सजविला होता. अवाढव्य काम काही तासांत घडवलं होतं. मला वाटलं, यातली काही हजार त्या बावीत अन् हातवळण्यात जादूनं पाठवता यायला हवीत. मग तेही शिवार नटेल. पण माणसाला अवगत नाहीत असल्या जादू. सगळ्या गावी एकच आभाळ असूनही रंगलेपन मात्र वेगवेगळं. पण काही म्हणा, हा जनताजनार्दन पाहून सुरुवात प्रसन्न झाली दिवसाला.

मग आलं खडकत. आष्टी तालुका. मराठवाडा!

लगेच कळतो तो. माणसाच्या तोऱ्यात अन् कोरडय़ा वाऱ्यात! जरा ओल म्हणून नाही. दृष्टीभर पसरलेल्या माळी उलीसाकही हिरवा उमाळा नाही. सत्यानं हल्लीच सांगितलं होतं की ब्रिटिश गॅझेट्समध्ये ‘The sunrays don’t touch the land असा उल्लेख आहे म्हणे मराठवाडय़ाबद्दल. म्हणजे इतकी झाडं मोडून घडवलीय आम्ही ही कोरडी मूस कष्टानं! तिथं रुजवायचं हे बियाणं. श्रमदानाचं, विश्वासाचं, भाबडेपणाचं. संतोष शिनगारे म्हणतो, ‘‘आवो, पशे घेतल्याशिवाय पायी मोडला काटा काढीत न्हाईत हीतं’’ खडकत त्याचं मूर्तिमंत उदाहरण. चार हजारांचं गाव. तिथं काम करणारी माणसं मात्र साठ. कारण काय तर म्हणे राजकारण. वर्षांनुर्वष माती खाऊनही राजाघरी राबणारी ही अज्ञ टाळकी. विजय भोसले आणि त्यांच्या पत्नीनं पुढाकार घेतलेला. विजयरावच्या आयुष्याची विलक्षण चित्तरकथा. शेतकरी आई-बापाला मदत म्हणून जांभळं विकणारं दहावीतलं पोरगं झाडावरून पडलं अन् आयुष्यभरासाठी जायबंदी झालं. आपल्यामुळं आई-बाप रडू नयेत म्हणून जिद्दीनं मानेखालचं गलितगात्र शरीर दुर्दम्य इच्छाशक्तीनं जिवंत करण्याचं दिव्य साकारलेला हा दिव्यांगी माणूस. त्याची धाडसी बायको. ‘‘हे काम महत्त्वाचं आहे. अवघड आहे अनि मुख्य म्हंजे कुनी दुसरं करनार न्हाय म्हनून मी करायला घेतलं. मला शिक्षन न्हाय पन ह्य कामाचं महत्त्व मला कळतंय. लोकांला कितीबी सांगितलं तरी न्हाय येत कुनी.’’ कोण आहेत हे राजे, ज्यांची दहशत धडधाकट माणसांची मनं पंगू करून टाकते आहे? राजकारण म्हणजे असं काय गौडबंगाल आहे, की ज्याचा चोरटा उल्लेख करावा लागतो? रस्ते, पाणी, रोजगार यांसारख्या प्राथमिक गरजांपासून वंचित ठेवीत पोसलेली जनता! तीच जर शहाणी होईल तर यायचीच चुकून लोकशाही. मग करा बुद्धिभेद. मी कळकळीनं सांगू पाहिलं, ‘‘आहो, निसर्ग आणू. पाणी आणू गावात. हे आपलंच तर काम आहे. करू सगळे एकत्र येऊन. नाही मिळत कुणालाही पशे तरी गावोगावी करताहेत लोक. पश्यापलीकडला आनंद आहे या कामात. फार नाही तासभर करा.’’ बोललो कळकळीनं. डोळ्यात पाणीच काय ते यायचं बाकी होतं. वाटलं, फाडलंच एखाद्यानं काळीज सत्य सांगायला तरी पाणी पाजायची नाहीत ही. आणि नसताच आला कुणी सत्यजित वा आमीर तर अजूनही राबलोच असतो या अज्ञानाघरी. नव्हे, राबतोच आहोत. पण मग या दिव्यांग माणसाचं काय? त्याला आधार देण्याचं अनवट व्रत डोळसपणानं स्वीकारलेल्या त्या बाईचं काय? तीही या मातीचीच घडण. मग इतका फरक? चार हजारांतले साठ लागतातच की हाती. जाताहेत की जोडले. मग ठेवावीच लागेल आशा. मात्र एक खरं की गावोगावच्या राजांनी इतका प्रत्ययकारी अंधार पसरवलाय की आजारी पडलीय ही माती. तातडीनं उपचारांची गरज आहे तिला. पूर्व उजळण्याची निकड आहे त्याकरिता. लागलो कामाला. सगळे माती नमुने शिस्तीनं अचूक तपासले. एव्हाना मंडळी सरावली होती. त्यांनी झपाटय़ानं संपवलं काम. विजयराव आणि त्यांच्या टीमची पाठ थोपटीत गाडय़ा हकारल्या पुढं. ‘‘सर, त्येवढं कारंजी अनि आनंदवाडीला जाऊन याच. अनि शिराळला एक सहावीतली पोरगीय. एकटीच काम करतीय. तितं तेवढं जाच.’’ संतोषनं चार वेळा फोन करून टुमणं लावलं होतं. शहरी मित्रांत ‘आता झालं ना?’ या अर्थीचे नि:श्वास सुटत असतानाच आम्ही कारंजी गाठली. मोठं देखणं गाव अन् शिवार. जरा आडबाजूला. साडेचारशे वस्तीचं. घरापुढची स्वच्छ अंगणं अन् मधोमध उभी तुळशी वृंदावनं. श्रमदानातनं उभारलेल्या भल्या थोरल्या मंडपात सगळी जमली. कुलुपबंद म्हणजे सगळ्या घरातली सगळी माणसं एकत्र येऊन श्रमदान करणारं गाव. शंभर मार्काचं काम केव्हाच संपलं. आता महाराष्ट्रात उदाहरण ठरण्यासाठी जास्तीचं काम करण्याची धडपड करीत असलेलं गाव- कारंजी! मी म्हटलं, ‘‘तुमच्या कष्टाला, एकोप्याला वंदन करायला आलोय. पण एवढय़ावर थांबायला नको. आपल्या गावातून माणसं जाऊ द्या आजूबाजूच्या झोपलेल्या गावी. त्या खडकतला तर जाच गडय़ाहो! काही नाही. जायचं अन् गपचूप काम करून यायचं. बघू तरी जाग येती का?’’ गावानं एकमुखानं होकार दिला. म्हटलं, ‘‘माझ्या आजोळचं पाणी सरलं, सुटीत यायला मला आजोळ तयार करताय काय? पाणी आलं की आलोच बघा जेवायला.’’ हसली सगळी. त्या प्रत्येक चेहऱ्याचा फोटो उतरला काळजात. ‘‘जी गावं काम करतात तिथं सेल्फीला झुंबड उडत नाही बघ.’’ अतल्या कानात कुजबुजला. खरंच होतं. ती कामं करणाऱ्या गावाला माणसांचं अप्रूप आहे. ती ऐकतात मन लावून. त्यांची असते श्रद्धा चांगुलपणावर.

मग रात्रीच्या अंधारात भाभीसकट सगळ्यांची वाट चुकवील अशा वाटेचा तासभर प्रवास करून एकदाचं शिराळ येतं. गाव ओलांडून शेतातल्या एका घराच्या आवारात ती सहावीतली पोरगी उभी असते स्वागताला. किमया विनोद आजबे! मोठे चमकदार डोळे, चेहऱ्यावर ओसंडती निरागसता. म्हटलं, ‘‘तूच का गं ती? बघ बाई खास तुला भेटायला वाट वाकडी करून आलोय.’’ पसरलेल्या स्वच्छ जाजमावर सगळे बसलो तिच्याभोवती कोंडाळं करून. आई, वडील, मोठी बहीण आणि गुडघ्याएवढा धाकटा भाऊ असं किमयाचं कुटुंबही भवतीनं. ‘‘ हं, सांग बरं तुझी गोष्टं.’’ म्हणताच ती बाहुली बोलू लागली-

‘‘‘तुफान आलंया’ कार्यक्रम बघून मी मागच्या वर्षीच शेतात एकटीनं चारी खणली होती. मग या वर्षी आई-वडील प्रशिक्षणाला जाणार म्हटल्यावर मीपण हट्ट केला आनि गेले. परत आल्यावर एक नाटिका लिहिली. मत्रिणींना घ्यून ती बसवली. आणि ग्रामसभेत सादर केली. शिक्षकांना सांगून आम्ही मत्रिणींनी सहा हजार रोपांची रोपवाटिका तयार केली. आनि श्रमदानाला सुरुवात केली. पन गावकरी कुनी येईनात. मग आमी घरोघरी जाऊन लोकांना बोलावलं तं म्हनायचे, ‘ताई तू फुडं हो आमी आलोच.’ अनि यायचे नाईत न काई नाई. कुनी म्हनायचे सकाळचं जमत नाई तर कुनी म्हनायचे संध्याकाळचं जमत नाई. म्हनून मग दोन टाईम श्रमदान ठेवलं तरीपन कोनपन आलं न्हाई. आमीच सात-आठ जन करतो रोज श्रमदान. पन कोनी आलं न्हाई तरी मी करनारे. माजी आजी कदी वावरात जात न्हाई तरी ती पन आली माज्यासाटी. आता माजे खाऊचे ५०० रुपये जमलेत. त्याचं मी मशीनला डिजल आन्नारे.’’ बाहुलीच्या बोलण्याला खळ नव्हता, ‘‘आता तर गावातल्या बायका वराड्त्यात अंगावर. ‘काय सारकं येती गं, जा तिकडं. कामंयत आमाला,’ असं म्हनतात अन् शीर्यल बगत बसतात.’’ कडवट वास्तव हसून मांडत होती. आम्ही सगळेच दिग्मूढ ऐकत होतो. आ वासून पाहात होतो हा निरागस वेडेपणा. निरांजनातल्या ज्योतीगत शांत डोळ्याची थोरली बहीण, आई-वडील, चुलत बहीण सगळेच ऐकत होते. डोळ्यांत पोरीबद्दलचं कौतुक ओसंडून जाताना दिसत होतं. आम्ही सगळेच भावूक झालो होतो. या पोरीला मोबाइल, टीव्ही यांसारखी शहरी प्रलोभनं उपलब्ध असूनही विचलित करत नाहीत. कामातले कष्ट, आभाळीचं ऊन, भवतालचा अज्ञान अंधार काही काही म्हणून भिववीत नाही. कोण आहे ही पोरगी? याच मातीत जन्मली असेल तर कसं म्हणू या मातीला आजारी? नकोत फुलायला मळे मस्तवाल शहाणपणाचे अन् सुखोपभोगाचे, माळरानीची ही एकली फुलराणी पुरे आहे की त्या ‘पूर्वसमुद्री रम्य सुवर्णछटा’ पसरवायला. मग केलीच पाहिजे मशागत या मातीची. तरंच ती निपजेल बावीतल्या माऊल्या, खडकतचा विजयभाऊ, हातवळण्याचा समीर सय्यद अन् ही नावं सार्थ करणारी चिमुकली असे सारे किमयागार!

टिपूर चांदण्यात आनंदवाडीची वाट धरली. तिथं माणसं रात्रीचा दिवस करीत होती. निघालो मग तिकडं. पाहायचीच होती तीही एक किमया..

girishkulkarni1@gmail.com