केंद्र सरकारची माहिती

देशातील ३५ टक्क्य़ांहून अधिक म्हणजेच २७.५ कोटी नागरिक तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत आहेत. शहरी भागातील ३० टक्के पुरुष मद्यपान करतात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

केंद्र सरकारने आरोग्य आणि कुटुंब-कल्याण विभागाच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन याबाबत सर्वेक्षण केले. भारतातील ३५ टक्के लोकसंख्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्याचे सिद्ध झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

सद्य:स्थितीला भारतात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या २७.५ कोटी एवढी असून यापैकी १६.३७ कोटी लोक धूम्रपानविरहित तंबाखूचे सेवन करतात. ६.९ कोटी नागरिक धूम्रपानाद्वारे तर ४.२३ कोटी नागरिक दोन्ही प्रकारात तंबाखूचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. ४८ टक्के पुरुष आणि २० टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याचा प्रभाव अधिक असल्याचे दिसून आले आहे.

तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर २००३ कायद्यानुसार अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तंबाखू सेवनावर नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संस्थेकडून (डब्ल्यूएचओ) सुरू प्रचारांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, तंबाखूच्या उत्पादनावरील नियमांना मुद्रित करणे किंवा चित्रपट आणि टीव्हीच्या माध्यमातून प्रसारण, विविध उत्पादने आणि अन्य घटकांवर तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या घातक परिणामांचे चित्रमय स्वरूपात जनजागृतीही केली जात आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्ती कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या रुग्णांलयांमध्ये आणि राज्यातील काही संस्थांमध्ये औषधांच्या माध्यमातून उपचार केंद्रांची उभारणी केली गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)