भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील दोन सर्वात मोठ्या कंपन्या असणाऱ्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या विशेष सेलच्या माध्यमातून २६ हजार कोटींची (साडेतीन बिलियन डॉलर्स) उलाढाल केली आहे. विशेष म्हणजे सात दिवस चालणाऱ्या सेलमधील ही केवळ पहिल्या चार दिवसांची आकडेवारी असल्याचे इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्ता म्हटलं आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार या सात दिवसांमध्ये दोन्ही कंपन्या करोनाच्या कालावधीत झालेलं आर्थिक नुकसान भरुन काढत निश्चित ध्येय म्हणजेच या वर्षीच टार्गेट या सात दिवसांमध्येच पूर्ण करतील. सात दिवसांच्या कालावधी या आर्थिक उलाढालीमध्ये आणखीन १.२ बिलियन डॉलर्सची भर पडणार असल्याचा अंदाज फ्रॉस्टर रिसर्च अॅण्ड रेडसीर कन्सल्टन्सिंग या कंपनीने व्यक्त केला आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष असणाऱ्या मनिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त किंमतीच्या आणि नव्याने बाजारात आलेल्या वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आलं. या वर्षी अ‍ॅमेझॉनवर एक हजार १०० नवे प्रोडक्ट लॉन्च करण्यात आले. यामध्ये सॅमसंग, अॅपल, शिओमी, वनप्लस, आसूस, लिनोव्हो, एचपी, एलजी, वर्ल्हपूल आणि बजाज अपलायन्सेससारख्या कंपन्यांचे प्रोडक्ट पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक विकले गेले.

वॉलमार्टची मालकी असणाऱ्या फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साईटवरुन झालेल्या खरेदीपैकी अर्ध्याहून अधिक वस्तू या घरुन काम करण्यासंदर्भातील सेक्शनमधील आहेत. यामध्ये मोठ्या आकाराचे टीव्ही, लॅपटॉप, आयटी क्षेत्राशी संबंधित गोष्टी आणि वर्क फ्रॉम होमशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा या गोष्टींची मागणी १.४ पटींने वाढली आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्येच या दोन्ही कंपन्यांनी सहा दिवसांचा विशेष सेल ठेवला होता. त्यावेेळी दोन्ही कंपन्यांनी मिळून २.७ बिलियन डॉलर म्हणजेच २० हजार कोटींची उलाढाल केली होती. २०१८ च्या तुलनेत हा आकडा ३० टक्क्यांनी अधिक होता. २०१८ मध्ये कंपन्यांनी सेलच्या कालावधीत २.१ बिलियन डॉलरचा व्यवसाय केलेला. दरवर्षी मांडण्यात येणारा हा आकडा अंदाजे मांडला जातो. कारण या दोन्ही कंपन्या या मर्यादित कालावधीमध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या कोणत्या गोष्टी सर्वाधिक विकल्या गेल्या याची सविस्तर माहिती देत नाहीत.

ई-कॉमर्स कंपन्या, अनेक मोठ्या कंपन्यांचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील चार दिवसांच्या कालावधीमध्ये ई कॉमर्स क्षेत्रातील उलाढाल मागील वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी वाढली. एका आठवड्याभरात हा आकडा ३० ते ३६ टक्क्यांपर्यंत जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनेक कंपन्यानी या वेळेस मर्यादित ऑफर्स दिल्या असल्या तरी यंदा वस्तूंचा खप अधिक असल्याचे दिसून येत आहे.

महागडे स्मार्टफोन, फॅशन आणि फर्निचरसारख्या वस्तूंच्या खरेदीवर यंदा सर्वाधिक सूट देण्यात आली आहे. त्या तुलनेत यंदा टीव्ही, घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर मागच्या वर्षीपेक्षा कमी सूट देण्यात आली आहे. पुरवठा कमी असल्याने अधिक सूट देण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

फ्रॉस्टर रिसर्च अॅण्ड रेडसीरच्या अंदाजानुसार ३० दिवसांच्या कालावधीचा विचार केला तर या दोन्ही कंपन्या एकूण ६.५ ते ७ बिलियन (४८ हजार कोटी ते ५१ हजार ८०० कोटींचा) उद्योग करतील. मागील आठवडाभरामध्ये म्हणजेच १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरच्या कालावधीमध्येच सर्वाधिक खरेदी झाल्याचे दिसून येत असल्याचे फॉस्टरचा अहवाल सांगतो.

सॅमसंग, अॅपल, एलजी, शिओमीच्या विक्रीमध्ये ८० ते १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्मार्टफोन आणि कंझ्युमर ड्युरेबल्सच्या खपात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरपासून अगदी दिवाळीसंपेपर्यंत असणाऱ्या या सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांच्या एकणू मिळतीच्या ३० ते ४० टक्के कमाई करतात.

एलजी कंपनीच्या प्रोडक्ट विक्रीमध्ये १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक टू आणि थ्री टायर म्हणजेच छोट्या शहरांमध्येही एलजीच्या ग्राहकांची संख्या वाढली असल्याचे कंपनीचे ऑनलाइन बिझनेसचे प्रमुख असणारे दिपक तनेजा सांगतात. तर कोडॅड आणि थॉम्सनचे टीव्ही बनवणाऱ्या एसपीपीएलचे कार्यकारी अध्यक्ष अवनीत सिंग मारवा यांनाही मागील चार दिवसांमध्ये खप दुप्पटीने वाढल्याचे म्हटले आहे.

यंदाच्या वर्षी कमी सूट देण्यात आली आहे. तसेच जगभरामध्ये टीव्ही पॅनलच्या किंमतीमध्ये ९० ते १०० टक्के वाढ झाल्याने किंमती वाढल्या आहेत असं अवनीत सांगतात. मागील चार दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनवरील स्मार्टफोनच्या मागणीमध्ये  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.५ पटींने वाढ झाली आहे असं तिवारी सांगतात. या कालावधीसाठी सरासरी पैसे खर्च करण्याची क्षमता वाढल्याचे दिसत आहे. अनेकजण ऑनलाइन माध्यमातून फोन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे काऊण्टरपॉइण्टचे सहाय्यक निर्देशक असलेले तरुण पाठक सांगतात.

स्नॅपडीलवरही घरगुती वापराच्या वस्तुंच्या खपात मागील वर्षभरामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने किचनमधील सामान, सजावटीच्या वस्तू आणि एलईडी लाईट्सचा समावेश होतो. सामान्यपणे फॅशनशी संबंधित वस्तूंना या साईटवर मागणी असायची मात्र यंदा चित्र वेगळं दिसत असल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. सध्या लोक घरीच जास्त वेळ घालवत असल्याने घरातील वस्तू आणि फर्निचरवर पैसे खर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे.