आपण नुसते पदार्थाचे नाव घ्यायचे…तो आपल्यासमोर तयार होऊन येणार…. त्यामुळे तुम्हाला मायक्रोव्हेवचे बटण दाबण्याचीही गरज नाही. अगदी एखाद्या वाक्यात सूचना दिल्यास मायक्रोव्हेव त्या सूचना ऐकून आपल्याला सेवा देणार आहे. ऐकायला हे काहीसे वेगळे वाटत असले तरीही ते खरे आहे. अॅलेक्सा या आपल्या डिव्हाईसच्या माध्यमातून अॅमेझॉनने हे शक्य करुन दाखवले आहे. मागच्या काही काळात तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या. मायक्रोव्हेवला काही सूचना दिल्या तर त्या सूचनांचे पालन करुन तयार पदार्थ तुमच्यासमोर येणार आहे. अॅमेझॉनची इंटेलिजन्ट व्हॉइस असिस्टंट अॅलेक्सा ही सुविधा युजर्सकडून व्हॉइस कमांड आल्यानंतरच प्रतिसाद देते, त्याचा वापर करुन हा ओव्हन तयार करण्यात आला आहे.

कंपनीने नुकतीच आपली ८ नवीन उपकरणे हे तंत्रज्ञान वापरुन लाँच करणार असल्याचे जाहीर केले. त्यात मायक्रोव्हेव, अॅम्प्लिफायर, रिसिव्हर तसेच कारमधील काही उपकरणांचा समावेश आहे. यातील बहुतांश उपकरणे ही अलेक्साशी कनेक्टेड असतील. ही उपकरणे या वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होतील असे कंपनीने सांगितले आहे. मात्र आपली ऑर्डर घेणारा मायक्रोव्हेव ओव्हन हे यातील खास आकर्षण असेल. स्कॅन टू कूक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पॅकींग केलेल्या अन्नपदार्थावरील बारकोड स्मार्टफोनच्या साह्याने वाचला जाईल आणि आपण दिलेल्या सूचनांनुसार ऑर्डर तयार होईल. त्यामुळे तुम्हाला बसल्याजागी तयार अन्नपदार्थ मिळू शकेल. येत्या काळात कंपनी स्मार्ट होम रोबोटही तयार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.