रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून स्पर्धक कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जिओ दिवसागणिक बाजारात आपले नवीन प्लॅन्स आणत ग्राहकांना खुश करत आहे. तर दुसरीकडे या प्लॅन्सला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. या स्पर्धक कंपन्या आपल्या ग्राहकांना स्वस्तातील प्लॅन देऊन सुखद धक्के देत आहेत. नुकतेच बीएसएनएल या सरकारी भागीदारी असलेल्या कंपनीने आपले काही आकर्षक प्लॅन बाजारात दाखल केले आहेत. हे प्लॅन सामान्यांना परवडतील असे आहेत. कंपनीने ९ रुपये आणि २९ रुपये असे दोन प्लॅन आणले आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्ताने हे प्लॅन जाहीर करत असल्याने याचे नाव फ्रिडम ऑफर-छोटा पॅक असे ठेवण्यात आले आहे.

हे प्लॅन दिल्ली आणि मुंबई सोडून संपूर्ण भारतात १० ऑगस्टपासून लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० मेसेज आणि २ जीबी डेटा मिळू शकेल. यामध्ये इंटरनेटचा स्पिड ८० kbps असेल. या पॅकची व्हॅलिडीटी १ दिवसाची असल्याने ग्राहकांना हा प्रीपेड प्लॅन अतिशय फायदेशीर असाच आहे असे म्हणावे लागेल. तर २९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १ जीबी ८० mbps चा डेटा आणि ३०० मेसेज मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी ७ दिवसांची आहे. हे दोन्ही प्लॅन २५ ऑगस्टपर्यंत लागू आहेत.

नुकताच कंपनीने आपला २७ रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. त्यात १ जीबीचा २जी आणि ३जी डेटा मिळत आहे. यामध्येही २९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच इतर सुविधा मिळत होत्या. याशिवाय कंपनीने आपल्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये सुधारणा करुन रोज १०० मेसेज पाठविण्याची मुभा दिली आहे. आधी या प्लॅनमध्ये महिन्याला १०० मेसेज करता येत होते. याबरोबरच कंपनीने आपला ४९१, १८६ आणि १७१ रुपयांचे आकर्षक प्लॅन जाहीर केले आहेत.