अमेरिकेतील एका वित्तीय वेबसाइटने जेव्हा सल्ला दिला की 30 वर्षे वयात तुमची बचत तुमच्या मिळकती एवढी असायला हवी आणि 35 वर्षे वयात बचत मिळकतीपेक्षा दुप्पट असायला हवी, तेव्हा त्या देशातील नवीन पिढीने एकजुटीने या विचाराला हास्यास्पद ठरवले आणि असे करणे शक्यच नाही असे म्हटले. अनेकांच्या बाबतीत तर त्यांचे शैक्षणिक कर्जच वयाच्या ५० वर्षापर्यंत डोक्यावर असते. अमेरिकेतील महागाई आणि मोठाले कर्ज असताना ३५ वर्षे वयापर्यंत दुप्पट बचत करणे महाकठीण ठरू शकते. पण भारतातील तरुण पिढीसमोर अमेरिकेतील लोकांपेक्षा रकमेचा आकडा किंवा शैक्षणिक कर्जाचा आकडा किंवा इतर खर्चांच्या बाबतीत बऱ्याच अंशी कमी आव्हाने असतात. त्यामुळे, भारतातील तरुणांसाठी ३५ वर्षे वयापर्यंत हे लक्ष्य गाठणे शक्य आहे.

हे नक्कीच थोडे कठीण आहे. एक तर, तुम्हाला सुरूवातीपासूनच गुंतवणुकीची सवय करून घ्यावी लागते. त्यानंतर प्रश्न उरतो फक्त सुज्ञपणे निर्णय घेण्याचा आणि शिस्त पाळण्याचा. तुम्हाला दरवर्षी तुमच्या मिळकतीचा १५ टक्के भाग बाजूला काढून ठेवावा लागेल आणि त्याची गुंतवणूक इक्विटी म्युचुअल फंडसारख्या आक्रमक संपत्तीमध्ये करावी लागेल. कारण म्युचुअल फंडांचा दीर्घ मुदतीचा परतावा १० वर्षे किंवा अधिक मुदतीसाठी १० ते १२ टक्के किंवा अधिक असतो. पीपीएफ किंवा मुदत ठेवीसारख्या पारंपरिक संपत्तीमधील गुंतवणूक एवढा परतावा देत नाहीत. म्हणूनच, दुप्पट बचतीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चांगली गुंतवणूक निवडावी लागेल.
पाहूया हे कसे होते

असे गृहीत धरूया की तुमचे वय २२ वर्षे आहे आणि तुमची मिळकत (कितीही असो) १० टक्के वार्षिक या दराने वाढेल. तर तुमच्याकडे ३५ वर्षे वयात मिळकतीच्या दुप्पट बचत करण्यासाठी १३ वर्षांचा कालावधी आहे. तुम्हाला मिळकतीच्या १५ टक्के भागाची गुंतवणूक अशा प्रकारे करावी लागेल जिथे तुम्हाला या कालावधीत सरासरी १२ टक्के वार्षिक परतावा मिळू शकेल. अशावेळी तुमच्यासाठी इक्विटी म्युचुअल फंडच योग्य आहेत. म्युचुअल फंडांमध्ये एसआयपी म्हणजेच नियमबद्ध गुंतवणूक प्लॅन सुरू करून त्याचे लक्ष्य १२ टक्के वार्षिक परतावा असू द्या. वयाच्या २८ व्या वर्षी तुमची बचत तुमच्या मिळकती एवढी होईल आणि साधारण ३३ वर्षे वयात तुमची बचत मिळकतीपेक्षा दुप्पट होईल. जर तुम्ही ३५ वर्षे वयापर्यंत एवढी बचत करू शकलात, तर तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी फार चांगला आधार मिळेल ज्यात तुमच्या गुंतवणुकीवरील चक्रवाढीने मिळणारा परतावा नंतरच्या काळात तुम्ही उभा केलेला निधी आणखी काही पटीने वाढवण्यास मदत करेल.

जी व्यक्ती २२ वर्षे वयात ३ लाख वार्षिक कमवायला सुरूवात करते आणि दर वर्षी १० टक्के पगारवाढ मिळवून ३५ वर्षे वयापर्यंत तिची मिळकत ९.४१ लाख एवढी होते. तसेच या वयात तिची बचत २२.७३ लाख एवढी झालेली असेल, म्हणजेच तिच्या मिळकतीच्या २.४ पट. या गुंतवणूक प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही उशीरा बचत करणे सुरू केलेत, तर एकतर तुम्ही लक्ष्य पूर्ण करू शकणार नाही किंवा तुम्हाला लक्ष्य पूर्ण करण्यासाठी फार अधिक वार्षिक बचत करावी लागेल. समजा तुम्ही २८ वर्षे वयात सुरूवात केलीत. अशा परिस्थितीत तुम्हाला ३५ वर्षे वयात मिळकतीच्या दुप्पट बचत करण्यासाठी मिळकतीचा ३० टक्के भाग गुंतवावा लागेल. तसेच जर तुम्ही ३० वर्षे वयात सुरूवात केलीत, तर  ३५ वर्षे वयात दुप्पट बचत करण्यासाठी ही टक्केवारी ४० टक्के पर्यंत जाईल. त्यामुळे, तुम्ही जेवढ्या लवकर बचत करणे सुरू कराल, तेवढा तुमचा फायदा आहे.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार