28 October 2020

News Flash

केसांची अस्ताव्यस्त ‘स्टाइल’

देखणेपणामध्ये नाक, डोळे, चेहरा यांचे महत्त्व जितके असते तितकेच महत्त्व डोक्यावरील केसांचेही असते.

देखणेपणामध्ये नाक, डोळे, चेहरा यांचे महत्त्व जितके असते तितकेच महत्त्व डोक्यावरील केसांचेही असते. त्यामुळेच केशरचना हा महिलावर्गाच्या साजशृंगारातील महत्त्वाचा घटक असतो. आकर्षक बांधणी वा वेणी घालून किंवा त्यावर आकर्षक क्लीप, चाप, फुले माळून केसांचं सौंदर्य अधिक खुलवलं जातं. अर्थात पुरुषांना अशा पद्धतीने केसांचे सौंदर्य वाढवता येत नाही. चापूनचोपून विंचरलेले केस, व्यवस्थित भांग, कल्ल्यांची ठेवण यातून शक्य तितक्या चांगल्या प्रकारे पुरुषांची केशरचना केली जाते. पण अलिकडच्या काळात हे स्वरूप बदलत चाललं आहे. कुठल्याही महाविद्यालयाच्या परिसरात किंवा तरुणमंडळींच्या घोळक्यात नजर टाकली की अस्ताव्यस्त केस मिरवणाऱ्या तरुणांची संख्या जास्त दिसते. पूर्वी विस्कटलेले केस गबाळेपणाचे लक्षण मानले जात होते. मात्र, आता हीच नवीन फॅशन म्हणून रूजू लागली आहे.
फॅशन म्हटल की त्यात रुप सौंदर्य, कपडे घालण्याच्या पद्धती व कपडय़ांचे प्रकार आणि नितनेटके केस असे अनेक प्रकार येतात. त्यात केस हे आताच्या काळात फॅशन मधला प्रमुख घटक बनला आहे. बदलत्या काळानुसार केसांच्या रचनेत हळू हळू बदल होत गेले आहेत. जसे पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव भारतामध्ये होऊन भारतीय त्या संस्कृतीकडे झुकत गेले तसे केसांच्या रचनेत ही त्याचा प्रभाव जाणवण्यास सुरूवात झाली. सध्याच्या काळाचा विचार करता अनेक मुला मुलींनी पाश्चिमात्य आणि भारतीय अशा फ्युजनच्या केस पद्धतीचा सर्वाधिक वापर सुरू केला आहे. आधीच्या काळात भांग पाडलेले व निट बसवलेले केस हे प्रचलित होते परंतु आता जेवढे केस विस्कटलेले तेवढे ते अधिक आकर्षक मानले जाते.
वन साइड हेअर कट..
कॉलेज वयीन मुलांमध्ये सध्याच्या काळात फेमस असलेला केस प्रकार म्हणजे ‘वन साइड हेअर कट’ म्हणजेच ‘डिस्कनेक्ट हेअर कट’. हा कट हॉलीवूड अभिनेते व फुटबॉलचे खेळाडू यांच्यामुळे प्रचलित झाला आहे. या केस पद्धतीमध्ये डोक्यावर केस मोठे ठेवून एका बाजूने ते केस आपण बारीक करू शकतो किवा डोक्यावरील व मागील केस मोठे ठेवून दोन्ही बाजूने केसांना बारीक व मध्यम करू शकतो. या केस पद्धतीचे वैशिष्टय़ म्हणजे यात वाटेल तसे केस कापू शकतो. विराट कोहली, फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी अशा काही खेळाडूंच्या ‘वन साइड हेअर कट’मुळे ही केसपद्धत अधिक लोकप्रिय ठरू लागली आहे.
स्पाइक कट
शाळकरी व कॉलेज वयीन मुलांना आवडणारी ही ‘हेअर स्टाइल’ गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचलित आहे. या केस पद्धतीमध्ये झिग झाग म्हणजेच कमी जास्त केस ठेवून त्यांना ‘स्पाइक्स’चा ‘लूक’ देणे, डोक्यावरील भागावर मोठे स्पाइक्स ठेवून बाजूने बारीक करणे किवा कट लाईन शिवाय केस ठेवणे अशी केसांची ठेवण केली जाते. ‘आउट टर्न’ म्हणजेच केस उलटे फिरवणे हाही यातलाच एक प्रकार. शाहरूख खान, आमीर खान यांचे ‘स्पाइक कट’ मुलांमध्ये प्रसिद्ध आहेत. या केसठेवणीचे वैशिष्टय़ म्हणजे एकदा अशा प्रकारचा कट केल्यानंतर पुढे घरच्या घरीसुद्धा ‘स्पाइक्स’ ठेवता येतात.
थ्रीडी हेअर कट..
सध्याच्या विश्वचषक स्पर्धेच्या काळात प्रचलित असलेला हेअर कट म्हणजे ‘थ्रीडी हेअर कट विथ टॅटू’. या ठेवणीमध्ये मागील बाजूने केस बारीक करून त्यावर आपल्या प्रिय व्यक्तिचे, स्वत:चे किंवा आवडत्या संघाचे नाव कोरले जाते. शिवाय अशा पद्धतीने टॅटूही काढले जातात. या केशरचनेला आणखी उठाव देण्यासाठी रंगांचाही वापर करता येतो. महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा किंवा गाजत असलेला चित्रपट यांच्या मोसमात अशी ‘हेअर स्टाइल’ करण्याकडे तरुणाईचा भर असतो. शिवाय अशा प्रकारच्या केसठेवणीतून सामाजिक संदेश देण्याचे प्रयत्नही अनेकदा होताना दिसतात.
ग्लोबल ग्रेस कट..
हेअर स्टायलीस्ट संतोष राउत यांनी ‘ग्लोबल ग्रेस कट’ ही नवीन केस शैली शोधली आहे. हा हेअर कट लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठी असलेला कट आहे. या कट ला आपण परिस्थिती नुसार बदलणारा हेअर कट असे सुद्धा म्हणू शकतो कारण एकदा विशिष्टय़ पद्धतीने केस कापल्यावर ती व्यक्ती स्वत: स्वत: ची स्टाईल करू शकते.

केसांची काळजी कशी घ्याल?
* उन्हाळ्याचा दिवस असल्याने आता केसांची जास्त काळजी करण गरजेचे आहे. उन्हाळ्यात सकाळी शक्यतो तेल लावू नये, दररोज मुलांनी आपले केस धुवावेत. तसेच जेल किंवा हेअल स्टाइलिंग प्रसाधनांचा वापर कमी करावा.
* केसांची चमक आणि मजबुती कायम ठेवण्यासाटी आवळा आणि सुका मेवा यांचे अधिकाधिक सेवन करावे.
* सिगारेट किंवा धूम्रपानाच्या सवयीवर नियंत्रण असले पाहिजे.
* केसांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी एक ते दीड महिन्यांच्या अंतराने केस कापावेत.
* रसायनयुक्त प्रसाधनांऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर करून केससौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2016 1:49 am

Web Title: celebrities latest hairstyles
Next Stories
1 एचआव्हीचा प्राणघातक संसर्ग रोखणारी लस शोधल्याचा संशोधकांचा दावा
2 आहारावरून उष्मांक सांगणारे अ‍ॅप विकसित
3 डेंग्यूवर लसीच्या चाचण्या यशस्वी
Just Now!
X