डॉ. तुषार राणे

कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांकरिता लॉकडाउन घोषिक केला आहे. करोना या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 असं नाव दिलं आहे. करोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे Sars Cov-2. शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो.हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये करोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन करोना विषाणू इतर पेशींवर हल्ला करतात. करोना या विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. सार्स प्रकारातील करोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो.

करोना विषाणूने भारतात शिरकाव केल्यानंतर त्याची झपाट्याने होणारी लागण पाहता भविष्यातील धोके टाळण्यासाठी, प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सध्या देशात लॉकडाउन घोषित केला आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक नागरिक घरीच आहे. मात्र या काळात घरी राहून असे काही उपक्रम करा जे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही तंदुरुस्त ठेवतील. चला तर मग पाहुयात या काळात घरी बसून नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या.

१. दिनचर्या आखा आणि त्यानुसार कामाला लागा –
नियोजित वेळापत्रकांनुसार ठरलेली काम करण्याला प्राधान्य द्या. आपल्या खाण्याच्या सवयी आणि झोपेची वेळांचे पालन करा. घरी व्यायाम करणे मात्र विसरू नका. कारण, हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

२. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या –
करोना विषाणूच्या संक्रमणाबाबत काळजी करू नका, तसेच या आजाराला घाबरून जाऊ नका. या आजाराला घाबरण्यापेक्षा सर्व संरक्षणात्मक उपायांचे अवलंब करा. मन शांत राखण्याचा प्रयत्न करा. ध्यान किंवा योगाचा आधार घेऊन मानसिक आरोग्य जपा. मानसिकरित्या खचून जाऊ नका तसेच त्याकरिता व्यसनांच्या आहारी जाणे टाळा.

३. सतत त्याच विषयावर माहिती गोळा करत बसू नका –
आपण बातम्या कधी पहाल याबद्दल वेळापत्रक सेट करा. या बातम्यात स्वत: ला पूर्णपणे गुंतवून घेऊ नका कारण हा आपल्यासाठी चिंतेचा विषय असू शकते. विश्वासार्ह स्त्रोतांची नक्कीच मदत घ्या. मात्र, अफवांकडे दुर्लक्ष करा. आपल्या स्वसंरक्षणावर भर द्या. अनियंत्रित सोशल मीडिया फीडस पाहणे टाळा. आपल्या कुटुंबियांना करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करा आणि त्यांना संरक्षणाच्या विविध उपायांबद्दल माहिती द्या. त्यांना सोशल मीडियापेक्षा विश्वसनीय स्त्रोतांकडून माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहित करा.

४. रोगप्रतिकार शक्ती बळकट करा-
घरी राहत असताना संतुलित आहारावर भर द्या. आरोग्याला घातक असलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे आणि सुकामेवा ताजी फळ आणि भाज्या विशेषतः व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असणा-या पदार्थांचे सेवन करा. सर्दी किंवा खोकला असणा-या व्यक्तींपासून दूर रहा. गरज असल्यास सोशल डिस्टंसिंग पाळत व्यवहार करा.

५. हात धुवा –
स्वयंपाक करण्यापूर्वी, खाण्यापूर्वी तसेच वॉशरूमचा वापर करण्यापूर्वी हात नक्कीच धुवा. खोकताना, शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा.

६.सोशल डिस्टंसिंग-
सोशल डिस्टंसिंगचे पालक करा. घराबाहेर पडू नका आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेत त्यांच्या समवेत आनंदाचे क्षण व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. दरवाजाची कडी, डोअर बेल, रिमोट कंट्रोल आणि लॅपटॉप, मोबाईल फोन सारख्या वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागावर स्वच्छ करा. आपल्याकडे घरात वृद्ध किंवा लहान मुल असल्यास हे विशेषतः महत्वाचे आहे. साफसफाई करताना आपण आपली नेहमीची घरगुती उत्पादने, जसे की डिटर्जंट्स आणि ब्लीच वापरली पाहिजेत, कारण पृष्ठभागावरील विषाणूपासून मुक्त होण्यास ही फार प्रभावी असेल. तसेच आपले घर आणि वॉशरूम वेळोवेळी स्वच्छ करा.

(लेखक डॉ. तुषार राणे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई येथील आहेत.)