मोबाईलचं सिम घेण्यासाठी ग्राहकांना आता आधार कार्डऐवजी १६ आकडी व्हर्चुअल आयडीचा वापर करावा लागणार आहे. १ जुलैपासून याची सुरूवात होणार आहे. UIDAI कडूनच ग्राहकांना हा १६ अंकी विशेष नंबर दिला जाईल. याचा फायदा म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना गरज पडेल तेव्हा ग्राहकांची ओळख पटवता येणार आहे, आणि आधार नंबर न दिल्याने टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या खासगी माहितीचा गैरवापर करण्याची चिंताही संपणार आहे.

आधार कार्डबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिम घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नसेल असं सरकारकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. आता दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना नव्या सिमच्या रजिस्ट्रेशनसाठी व्हर्चुअल आयडी(Aadhaar e-KYC service) आणि लिमिटेड केवायसी (limited KYC) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

व्हर्चुअल आयडी(Aadhaar e-KYC service) आणि लिमिटेड केवायसी (limited KYC) दोन्ही आधारचाच भाग आहे. पण याद्वारे नागरिकांचा आधार नंबर समजत नाही आणि केवळ गरजेपुरता लागणरी माहितीच शेअर केली जाते.

सध्याच्या ग्राहकांच्या रि-व्हेरिफेकेशनसाठीही हा नियम लागू असणार आहे, १ जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यास टेलिकॉम कंपन्यांना सांगण्यात आलंय. १ जुलैआधी सिस्टीममध्ये ग्राहकांचे व्हर्चुअल आयडी अपडेट करण्याचा आदेश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आला आहे.