नवीन वर्षांचे स्वागत हे आरोग्यदायी असावे, असा संकल्प अनेकांचा असतो. यासाठी अनेक जण डीव्हीडीचा किंवा इंटरनेटचा आधार घेतात. अशा वेळी अतिउत्साहाने आपण चुकीचा व्यायाम करतोय याची आपल्याला जाणीवही नसते. डीव्हीडीद्वारे केलेल्या व्यायामामुळे नकारात्मक ऊर्जा मिळते, ज्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशारा नव्या संशोधनाद्वारे देण्यात आला आहे.
अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठाने यासाठी व्यायामासाठी प्रसिद्ध असलेल्या दहा सीडींचा अभ्यास केला. त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या विविध व्यायामाच्या प्रकारांमधून उच्च लैंगिकतेला प्रोत्साहित करण्याची आणि अवास्तविक शारीरिक प्रतिमा दिसत असल्याचे म्हेटले आहे. या वेळी अभ्यासकांकडून डीव्हीडीतील प्रशिक्षकांकडून व्यायामाची दाखवलेली प्रात्याक्षिके आणि प्रोत्साहित करणाऱ्या भाषाशैलीचा अभ्यास केला गेला. ज्याद्वारे दृश्य-श्राव्य माध्यमातून सीडीचा वापर करणाऱ्यांवर होणारा प्रभाव कशा स्वरूपाचा असू शकतो यांचा अभ्यास करणे हा मुख्य हेतू होता.
या वेळी अभ्यासकांना हे आढळून आले की, या सीडीतील व्यायामाच्या प्रकाराचे सादरीकरण करणाऱ्या महिला मॉडेल या जाणीवपूर्वक आकर्षक शरीरयष्टीच्या आणि रंगाने गोऱ्या असतात. त्यांचा पेहरावदेखील पाहणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याप्रमाणेच सुदृढ शरीरयष्टी बनविण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्याचबरोबर त्यांची भाषाशैलीही समोरील व्यक्तीला प्रोत्साहित करणारी असते. पण निष्कर्षांनुसार प्रोत्साहित करणाऱ्या सात वाक्यामधील एक वाक्य हे नकारात्मक मानले जाते. या सीडींचा आरोग्य आणि तंदरुस्ती यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. त्याद्वारे केल्या जाणाऱ्या व्यायामाचा काहीही उपयोग नसल्याचे ओएसयूचे बार्ड कार्डिनल यांनी सांगितले.
या सीडींमध्ये वापरले जाणारे शब्द सीडीच्या माध्यमातून नव्यानेच व्यायामाकडे आकर्षित झालेले आणि ज्यांना व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे संकुचितपणाचे वाटते त्याच्यांसाठीदेखील खूपच घातक असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.