मासे आणि ओमेगा-३ या चरबीयुक्त आम्लाचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने कर्करोग, हृदयरोगामुळे होणाऱ्या अवेळी मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी २,४०,७२९ पुरुष आणि १,८०,५८० महिला यांच्या आरोग्याचा १६ वर्षे पाठपुरावा करण्यात आला. यादरम्यान ५४,२३० पुरुष आणि ३०,८८२ महिलांचा मृत्यू झाला.

मत्स्याहार आणि ओमेगा-३ या चरबीयुक्त आम्लाचे सेवन जास्त असल्यास आयुर्मान वाढत असल्याचे जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. जे पुरुष जास्त मत्स्याहार करतात त्यांच्यामध्ये मृत्यूंचे प्रमाण नऊ टक्क्यांनी कमी होते, तर हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होते. त्याचप्रमाणे कर्करोगाने मृत्यू होण्याच्या प्रमाणात सहा टक्क्याने घट होत असून श्वसन रोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांनी कमी होते, असे चीनमधील झेजिआंग विद्यापीठातील संशोधकांना आढळले. तर महिलांमध्ये एकूण मृत्यूदरामध्ये आठ टक्क्यांनी घट होत असून हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दहा तर स्मृतीभ्रंशामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ३८ टक्क्यांनी घट होते. तळून मासे खाल्ल्याने पुरुषांच्या आयुर्मानात कोणताही बदल होत नसून यामुळे महिलांमध्ये हृदयरोग आणि श्वसनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढते.

ओमेगा -३ चरबीयुक्त आम्लांच्या सेवनामुळे हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांमध्ये १५ टक्के तर महिलांमध्ये १८ टक्क्यांनी कमी होते.