झोप ही आपल्यासाठी खूपच आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात शांत झोप मिळणं तसं कठीणच. चांगल्या आरोग्यासाठी किमान आठ तास झोप आवश्यक आहे. पण अनेकदा कामाच्या आणि इतर गोष्टींच्या तणावामुळे शांत झोप लागत नाही. सहाजिक झोप नाही लागली की त्याचा परिणाम कामावर होतो. मग डोकेदुखी, अॅसिडीटी, थकवा जाणवणं असे अनेक त्रास डोकं वर काढतात. तेव्हा झोप आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे शांत झोपेसाठी काही गोष्टी आवर्जून करा. या गोष्टी केल्यात तर नक्कीच तुम्हाला शांत झोप मिळण्यासाठी मदत होईल.

– झोपण्यापूर्वी किमान अर्धातास तरी मोबाईल बाजूला ठेवा किंवा टीव्ही पाहणं, कॉम्प्युटरवर काम करणं टाळा.
– अनेकदा काहींना जेवणानंतर कॉफी पिण्याची किंवा चॉकलेट्स खाण्याची सवय असते. तेव्हा झोपण्यापूर्वी कॉफी पिणं किंवा चॉकलेट्स खाणं टाळा, कारण यात कॅफेन असतं. कॅफेनचा परिणाम झोपेवर होतो.
– रात्री काही जणांना जड खाण्याची सवय असते. पण नेहमी लक्षात ठेवा रात्रीच्यावेळी काहीतरी हलकं फुलकं खा! शक्यतो मांस किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळाच! रात्री पचनक्रियेचा वेग मंदावतो. हे पदार्थ पचायला जड जात असल्यानं त्याचा परिणाम साहजिकच झोपेवर देखील होतो.
– अनेकदा कामाचे तास, प्रवास यामध्ये व्यायाम करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे व्यायाम होत नाही. तेव्हा चांगली झोप हवी असेल तर रोज सकाळी उठून व्यायाम कराच. पण जेवून झाल्यानंतर किमान दहा मिनिटे तरी शतपावली करा.
– झोपण्यापूर्वी तुम्ही छान गाणीही ऐकू शकता. एका संशोधनानुसार रात्री झोपण्यापूर्वी आवडीची गाणी ऐकली की शांत झोप लागते असं समोर आलंय. तेव्हा हा प्रयोगही तुम्ही करून पाहू शकता.
– जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर काही सकारात्मक प्रेरणा देणारी पुस्तकही तुम्ही वाचू शकता.