‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप Hike StickerChat बंद झालंय. Hike चे सीईओ केविन भारती मित्तल यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच Hike कायमस्वरुपी बंद करणार असल्याची घोषणा केली होती. त्याऐवजी काही नवे प्रोडक्ट बाजारात उतरवण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं होतं. अखेर आता Hike मेसेजिंग अ‍ॅप अधिकृतपणे बंद झालं आहे.

गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमधून हे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे, त्यामुळे युजर्स आता हे अ‍ॅप डाउनलोड करु शकणार नाहीत. तर युजर्सच्या सोयीसाठी अ‍ॅपमधील त्यांचा डेटा डाउनलोडसाठी उपलब्ध असेल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. मित्तल यांनी ट्विटरद्वारे Hike बंद करत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी युजर्सचेही आभार मानले. शिवाय काही समस्या असल्यास 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत युजर्स care@hike.in वर कंपनीशी संपर्क साधू शकतात.

आणखी वाचा- WhatsApp ला झटका, भारतातील टॉप फ्री अ‍ॅप बनलं Signal; काय आहे खासियत?

आणखी वाचा- अचानक युजर्स वाढल्याने ‘डाउन’ झालं Signal App, 24 तासांनंतर सेवा पूर्ववत

Whatsapp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन सुरू असलेल्या गदारोळात बहुतांश युजर्स सध्या Signal आणि Telegram यांसारख्या अ‍ॅप्सकडे वळले आहेत. या अ‍ॅप्समध्ये भारतीय अ‍ॅप हाइकला त्याची जागा निर्माण करणं कठीण होतं. दरम्यान मित्तल असंही म्हणाले की, ‘जोपर्यंत पाश्चिमात्य देशांतील कंपन्यांवर प्रतिबंध लावला जात नाही तोपर्यंत ‘हाइक’ किंवा अन्य भारतीय अ‍ॅप्स टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या अ‍ॅप्ससोबत टक्कर देऊ शकत नाही’.

आणखी वाचा- समजून घ्या : WhatsApp, Telegram आणि Signal पैकी सर्वाधिक सुरक्षित अ‍ॅप कोणतं आणि का?

Hike ला बंद करण्यासोबतच काही नवे प्रोडक्ट्स बाजारात आणणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलंय. यातील Rush आणि Vibe आधीच उपलब्ध झालेत. Rush एक गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे युजर्स कॅरम आणि लूडो खेळू शकतात. तर, Vibe एक कम्यूनिटी प्लॅटफॉर्म आहे.