लठ्ठपणा ही सध्या मोठी समस्या झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावरील कॅलरीज दिवसेंदिवस वाढत आहेत. जंकफूडचे आहारातील वाढते प्रमाण, अपुरी झोप, बैठी जीवनशैली यांमुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. पण कॅलरीज जाळल्या नाहीत तर हे वाढलेले वजन नियंत्रणात येणे अवघड होऊन बसते. मग जीममध्ये जाणे, वेगवेगळे डाएट प्लॅन घणे असे काही कालावधीसाठी केले जाते. पण कालांतराने त्यातही सातत्य राहत नाही. मग कमी झालेले वजन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात होते. अनेक जण व्यायामाला वेळच होत नाही अशी तक्रारही करताना दिसतात. पण काही दैनंदिन कामे केल्यास तसेच विशिष्ट खेळ खेळल्यास त्याचा कॅलरीज जाळण्यासाठी निश्चितच उपयोग होतो. काय आहेत ही कामे पाहूया…

बाथरुम घासा

स्वच्छता करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात हे आपल्याला माहित आहे. बाथरुम आपण दररोज वापरतो ते स्वच्छ असणे आवश्यक असते. हेच बाथरुम सर्व बाजूनी योग्य पद्धतीने घासल्यास १०० कॅलरीज जळतात. मात्र यासाठी बाथरुमची फरशी आणि सिलींग जवळपास अर्धा तास अतिशय काळजीने साफ कऱण्याची आवश्यकता असते.

लहान मुलांसोबत खेळा

लहान मुलांमध्ये खूप ऊर्जा असते, त्यामुळे लहान मुलांसोबत खेळल्यास तुम्हीही एनर्जेटीक होता. तुम्ही दिवसातील बराच काळ लहान मुलांसोबत खेळत असाल तर नकळत तुमच्या शरीरावरील चरबी कमी होते आणि तुम्ही बारीक होण्यास मदत होते. दिड तास सलग लहान मुलांशी खेळल्यास तुमच्या १५० कॅलरीज जळू शकतात.

कार किंवा दुचाकी धुणे

कार किंवा दुचाकी धुण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले जातात. गाडी स्वच्छ होते आणि गाडी धुण्यामध्ये ऊर्जा खर्ची झाल्याने वजन घटण्यास मदत होते.

टेनिस खेळणे

कोणताही खेळ खेळला की आपला व्यायाम होतो. यामध्ये घाम आल्याने कॅलरीज जळतात. टेनिस हा व्यायामासाठी अतिशय उपयुक्त खेळ असून त्यामुळे मोठ्या प्रमाणाच चरबी घटते.

अॅरोबिक्स

अॅरोबिक्स हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. तसेच या डान्समुळे तुम्ही फ्रेश होता. हा डान्स दमवणारा असल्याने केवळ १० ते १५ मिनिटे केला तरीही तुमचा भरपूर व्यायाम होऊन कॅलरीज जळायला मदत होते.