News Flash

कशी असावी मुलांच्या खोलीची सजावट?

बाळाच्या खोलीतील भिंती शक्यतो गुळगुळीत, विनापोतवाल्या असाव्यात

मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या खोलीच्या गरजा बदलत जात असतात. पण म्हणूनच त्यांच्या खोलीची सजावट करताना दीर्घकाळाचा विचार करणे गरजेचे असते.

पावसाळ्याचे दिवस जवळ आले, दिवाळीला पंधराच दिवस उरले की क्लायंटकडून आमच्यावर काम संपवायचे प्रेशर वाढायला लागते. घरात बाळ येणार असते तेव्हाही हे प्रेशर वाढते, पण या वेळी कामाचा ताण फारसा जाणवत नाही. कारण घरच्यांबरोबर नव्या पाहुण्याच्या स्वागताला आम्हीही उत्सुक असतो. त्या बाळासाठी सोयी करताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते. ‘गाव को जाने का है’ हे ब्रीदवाक्य असलेली आणि दोनाचे चार महिने झाले तरी कूल असलेली कामगार मंडळी गावाला जायचा प्लान पुढे ढकलतात तेव्हा बाळाची खरी महती कळते. तर अशा घरच्या व बाहेरच्या मंडळींनी सज्ज होऊन केलेल्या बाळाच्या खोलीची सजावट असावी तरी कशी?

जास्तीच्या खोल्या असूनसुद्धा आपल्याकडे परदेशातल्यासारखी बाळाला शेजारच्या खोलीत ठेवायची सवय नसते. इथे मूल चांगले चार-पाच वर्षांचे होईपर्यंत आई-बाबांच्या खोलीत सुखाने झोपते. नंतर हळूहळू जागा पुरत नाहीये म्हणून त्याची सोय वेगळ्या ठिकाणी होते. बाळाची वेगळी खोली असो किंवा आई-बाबांच्या खोलीतच त्याची सोय केलेली असो, सजावट ही नेहमीच बाकीच्या घराच्या संकल्पनेला धरून असावी. केवळ एक मूल घरात आले आहे म्हणून भिंतीवर या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या इंद्रधनुष्याचा, रंगीबेरंगी फुलपाखरांचा वॉलपेपर लावायची काहीच गरज नाही. अशाने बाकीच्या घरामध्ये जी सुसंगती साधली गेलेली असते तिला अचानक ब्रेक लागल्यासारखा वाटतो. दुसरे, ज्याच्यासाठी आपण ही सजावट करतो आहोत त्या बाळाला कळायला कमीत कमी दोन वर्षे तरी जातात. तोपर्यंत गडद रंगांनी सजवलेली ती भिंत बघताना आपल्याला किती कंटाळा येईल याचा विचार करा. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे मुलांची असो किंवा आपली, झोपायच्या खोलीची रंगसंगती ही नेहमी शीतल, मनाला शांतता देणाऱ्या रंगात असावी.

सध्या बाजारात बाळांसाठीची तऱ्हेतऱ्हेची सुंदर फर्निचर आपल्याला भुरळ घालतात. इथे परत हे लक्षात घ्यायला पाहिजे की, भुरळ आपल्याला पडते, बाळाला नाही. बहुतेक वेळा कौतुकाने बाळासाठी म्हणून घेतलेली ही कपाटे, कॉट पूर्ण सजावटीला अनुरूप दिसतीलच असे नाही. परत त्यांचा आकार, आकारमान व दिवसागणिक वाढणाऱ्या बाळामुळे लवकरच ही फíनचर्स अडचणीची ठरू शकतात. ना धड ठेवता येतात, ना धड फेकता येतात. अशा वेळी फोिल्डग फíनचरची सोय फार उपयोगी पडते. उदाहरणार्थ, बेबी कॉट ही काही महिन्यांनी बाळाला पुरेनाशी होते. अशा वेळी खूप घरांत मी पाहिले आहे की, त्याचा उपयोग रिकामी खोकी, टॉवेल सुकवायला, रद्दी ठेवायला केला जातो. अशा परिस्थितीत आधीपासूनच भिंतीच्या पॅनिलगमध्ये लपलेली फोिल्डग कॉट केल्यास ते बाळ काही महिन्यांचे नाही तर काही वर्षांचे होईपर्यंत तिथे झोपू शकेल. परत दिवसा कॉट फोल्ड करून ठेवल्यास ती जागा वापरायला मिळेल, तो फायदा वेगळाच. बाळाच्या खोलीत फíनचरची वाढ ही आडवी न करता उभी करावी. यामुळे वावरायला जागा मोकळी मिळते आणि त्याचबरोबर बाळ त्या फíनचरला अडकून पडायची भीतीही राहत नाही.

बाळाच्या खोलीतील भिंती शक्यतो गुळगुळीत, विनापोतवाल्या असाव्यात. आपण आपल्या हौसेपायी प्लायवूड, पीओपी वापरून भिंतीवर त्रिमितीय झाडाचा- पक्ष्यांचा देखावा बाळाच्या कॉटशेजारी तयार करतो. पण आपल्याकडील प्रदूषण लक्षात घेता त्या देखाव्याच्या वर-खाली झालेल्या भागांत किती धूळ जमेल याचा विचार करा. अशा वेळी बाळाला त्रास होऊ नये म्हणून सजावट जेवढी साधी, प्रसन्न करता येईल तेवढी करावी. बाळाच्या कपाटामध्ये एक मोठ्ठा कप्पा/ खण करण्याऐवजी दुपटी, डायपर, झबल्यांसाठी छोटे छोटे खण करावेत. अशाने या छोटय़ा गोष्टी सापडायला सोप्या जातात व पसारा दिसत नाही. काप्रेट्स, सरकणारे जाजम बाळाच्या खोलीत न केलेलेच बरे. नुकत्याच चालू लागलेल्या बाळाचा त्यात अडखळून, सरकून पडण्याचा धोका त्याने कमी होतो. एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे, सजावट ही ‘बाळाभिमुख’ (चाइल्ड फ्रेण्डली) असावी, ‘बालिश’ (चाइल्डिश) नसावी.

बाळाच्या बाबतीत आपण आपल्या मनासारखे वागू शकतो. पण साताठ वर्षांपासून ते टीनेजर्सपर्यंत जेव्हा त्यांच्या आवडीनिवडी ठाम होतात, तेव्हा कोणाचेच काहीही चालत नाही. कार्टून कॅरॅक्टर्स ते फेडरर ते दीपिका पदुकोण अशी त्यांची आवड दर वर्षांगणिक बदलत असते. कधी कधी त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना एकदम सच्च्या पण एकमेकांपासून विसंगत असतात. अशा वेळी एक डिझायनर म्हणून त्यात सुसंगती आणणे हे आमचे कर्तव्य असते. ही खोली म्हणजे त्यांचा आरसा असतो, त्यांच्या हक्काची जागा असते. अशा वेळी वर सांगितल्याप्रमाणे बाकीचे घर व या खोलीची सुसंगती साधायचा प्रयत्नपण करू नये. त्यात परत ती खोली दोन भावंडांत शेअर होणार असेल तर विचारूच नका. नवरा-बायकोप्रमाणे यांच्याही आवडी-निवडी हमखास एकमेकांच्या विरुद्ध असतात. अशा वेळी दोघांनाही खूश करून खोलीचा समतोल बिघडू न देणे यासाठी खरे तर डिझायनरचा सत्कारच केला पाहिजे. अशा प्रसंगी दोन्ही पाटर्य़ाचे थोडे थोडे ऐकून आम्ही मुख्य भर देतो तो झोपायच्या, अभ्यासाच्या व कपाटाच्या जागेच्या आखणीवर. ती व्यवस्थित असणे फार महत्त्वाचे. एक तर वाढते वय, वाढत्या गरजा व सर्वात महत्त्वाचे वाढता अभ्यास. साताठ वर्षांच्या सगळ्या मुलांना बंकबेडचे फार वेड असते. त्यासाठी मुले आकाशपाताळ एक करतात. पण हे वेड तीन-चार वर्षांच्या वर कधी टिकलेले मी पाहिलेले नाही. जागा अगदीच कमी असेल तर एकावर एक रचलेल्या या बेडमुळे सोय होते, हा फायदा सोडल्यास, काही वर्षांनी बंकबेडची अडचणच होऊन बसते. अशा वेळी सोफा कम बेडचा उपाय जास्त सोयीचा जातो. दिवसा आतमध्ये सरकवलेल्या बेडमुळे वावरायला, मित्रांबरोबर खेळायला मोकळी जागा राहते. अशा बेडचा उपयोग कधी मोठय़ांना झोपायलासुद्धा होऊ शकतो. जागा पुरेशी असेल तर दोन सिंगल बेड्स करणे केव्हाही चांगले.

मुलांची वयाप्रमाणे लांबी-रुंदी वाढते, गरजा वाढतात त्यानुसार काही आपण दर वर्षी कपाट बदलू शकत नाही. मुले लहान असताना ‘काय गरज आहे मोठय़ा कपाटाची’ म्हणून जी छोटी कपाटे केली जातात, ती लवकरच अपुरी पडू लागतात. त्यामुळे प्रथमच सजावट करताना भविष्याच्या वाढत्या गरजांचा विचार करून पुरेशी मोठ्ठी कपाटे बनवावीत. लहान वयात खेळणी, पझल्स, लेगो ठेवायला थोडय़ा खोल ड्रॉवर्सची गरज असते. कालांतराने ज्याची जागा जास्तीच्या वह्य़ा-पुस्तके, शाळेच्या प्रोजेक्टच्या सामानाने घेतली जाते. अशी ड्रॉवर्स शक्यतो कपाटाच्या बाहेर असावीत. जेणेकरून सतत ती वापरण्यासाठी दारे उघडावी लागणार नाहीत.

अभ्यासाच्या टेबलाची लांबी ही कधीही एका मुला/ मुलीसाठी असू नये. लहान असताना शेजारी आई किंवा बाबा व मोठ्ठे झाल्यावर कदाचित टय़ूशन टीचरसाठी बाजूला जागा असणे गरजेचे आहे. नाही तर बऱ्याच घरांत दिसून येते की, सगळ्या वह्य़ा-पुस्तकांचा पसारा जेवणाच्या टेबलावर मांडून अभ्यास केला जातो. मागील काही लेखांत सांगितल्याप्रमाणे जेवणाची जागा ही दिवाणखान्याला लागून असलेली, बऱ्यापकी वर्दळीची जागा आहे. अशा वेळी घरातल्या बाकीच्यांवरही टीव्ही न लावण्याची, हळू बोलण्याची, न हसण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे मुलांच्या खोलीतच अभ्यासाला पुरेशी जागा करून ठेवावी. लगतच पुस्तकांचे कपाट, समोर सॉफ्टबोर्ड, बाजूला भरपूर ड्रॉवर्स असलेले टेबलाखालचे कपाट या गोष्टी एका जागी बसून अभ्यास करायला उपयोगी पडतात. आजकाल जसे टेबलाच्या वर-खाली कॉम्प्युटर, िपट्रर, स्कॅनरसाठी भरपूर विजेचे प्लग्ज असणे गरजेचे झाले आहे, तसेच प्लग्ज पलंगाच्या बाजूला मोबाइल चाìजगला व आरशाच्या बाजूला हेअरड्रायरसाठी देणे आवश्यक झाले आहे. परीकथेतील राजकन्येचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो तसा आजकालच्या मुलांचा जीव ‘वाय-फाय’मध्ये अडकलेला असतो. चांगले आई-बाप होण्याच्या कर्तव्यांच्या यादीत याची भर पडली आहे. त्याची सोय न विसरता करावी.
टीनेजर्सना मित्र-मत्रिणी म्हणजे जीव की प्राण. मोठ्ठे लोक कधी आपल्या मित्रांना स्वतच्या बेडरूममध्ये घेऊन जाऊन गप्पा मारत बसत नाहीत. याच गोष्टीत मुलांच्या खोलीचे वेगळेपण असते. शाळा-कॉलेजच्या मुलांना मित्र-मत्रिणींना बोलावून दंगा करायला खूप आवडतो. अशा वेळी थोडी मोकळी जागा, बसायला बीन बॅग्स, पूफीज, झोपाळा, खिडकीलगतचा कट्टा आवर्जून करावा. त्याचप्रमाणे चित्रकला, नृत्य वगरेची आवड असल्यास अनुक्रमे ईजल, मोठय़ा आरशाची सोय करावी. त्यांची पेंटिंग्स मांडायला पॅनिलग, सॉफ्टबोर्डची सोय करावी.

बेडरूमचा उपयोग आपण फक्त झोपेसाठी करतो. म्हणून आपल्याला आपली खोली शांत लागते, पण टीनेजर्ससाठी झोप हे प्राधान्य नसते. त्यामुळे त्यांना त्यांच्या खोलीची सजावट ही उत्साहवर्धक, रंगीत लागते.  लहान-मोठ्ठी कशीही असली तरी ही खोली म्हणजेच ‘विश्व’ असलेल्या या मुलामुलींना आधुनिक दिसणारी व सर्व सोयींनी युक्त अशीच खोली लागते. ना धड मूल, ना धड प्रौढ अशा वळणावर उभ्या असलेल्या या मुलांना एकीकडे मोठ्ठय़ांसारखी अभिरुचिसंपन्न खोलीपण लागते आणि दुसरीकडे रात्री कवटाळायला टेडी बेअरपण लागतो. अशा वेळी त्यांना समजून घेऊन त्यांच्या मानसिक वाढीला पोषक अशी सजावट करून देण्याची जबाबदारी ही पालकांची व आमची असते.

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 10:15 am

Web Title: how to decorate childrens room
Next Stories
1 किती तो ताण!
2 सावधान! हॉटेलमध्ये फिंगर-बाऊलचा वापर करता आहात?
3 चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यमानात सुधारणा
Just Now!
X