डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळं स्त्रियांच्या सौंदर्यातील अडसर ठरतात. यामुळे आपण उदास तर दिसतोच पण डोळ्याची चमक काहीशी कमी झाल्यासारखेही जाणवते. त्यामुळे डोळ्याखाली काळे डाग आले की सर्वच वयोगटातील स्त्रिया अस्वस्थ होतात. कधी झोप कमी झाली म्हणून, कधी वेगवेगळ्या गोष्टींच्या ताणाने तर कधी शारीरिकरित्या तंदुरुस्त नसल्याने ही समस्या उद्भवते. डोळ्यांखालचा भाग नाजूक असल्याने त्यावरील उपचार अतिशय काळजीने करावे लागतात. अशावेळी नेमके काय करावे म्हणजे आपण चांगले दिसू शकू असा प्रश्न या स्त्रियांना पडतो. मग काहीवेळा त्यासाठी जास्तीचा मेकअप केला जातो खरा. पण हा झाला तात्पुरता उपाय. या समस्येपासून कायमची सुटका करायची असल्यास या गोष्टी आवर्जून करुन पाहा

* तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर ते सगळ्यात आधी कमी करा. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शोषले जाते. त्यामुळे डोळ्यांखाली मांसल भाग तयार होतो. त्यामुळे आहारातील मीठाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय ठेवा.

* ठराविक काळाने तुमची झोपण्याची उशी बदला. या उशीवर असणाऱ्या जीवाणूंमुळे डोळ्याचे संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे लाल होणे किंवा थकलेले दिसणे अशा समस्या यामुळे उद्भवू शकतात. बाजारात अॅंटी अॅलर्जिक उशा मिळतात. त्यांचा वापर केल्यास ते निश्चितच फायद्याचे ठरु शकते.

* बाजारात काही क्रीम मिळतात ज्यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कलचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र डोळ्याचा भाग नाजूक असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्याने अशाप्रकारच्या क्रीम्सचा वापर करावा. बाजारात अनेक बनावट उत्पादने असू शकतात जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे योग्य ती शहानिशा करुन मगच अशा क्रीम्सचा वापर करावा.

* धातूचा चमचा काही वेळाकरता फ्रीजमध्ये ठेऊन द्या. तो थंड झाल्यानंतर काढून डोळ्याच्या खालच्या भागावर धरुन ठेवा. त्यातील गारवा कमी होत नाही तोपर्यंत हा चमचा असाच ठेवा. यामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते. यामुळे डोळ्याखालील सूजही कमी होते. डोळे चमकदार दिसण्यास मदत होते.

* डोळ्याखाली काकडीचे काप ठेवल्यासही गार वाटते आणि डोळ्यांना शांतता मिळते. याशिवाय डोळ्याखाली पपईचा गर लावल्यास डोळे ताजेतवाने दिसतात.

आपल्यातील अनेक जण ऑफीसमध्ये कॉम्प्युटरवर किंवा उरलेला वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर असतात. त्यामुळे डोळ्यांना जास्त प्रमाणात ताण येतो. हा ताण घालवायचा असले आणि डोळ्यांचे सौंदर्य जपायचे असल्यास हे उपाय नक्की करुन पाहा.