आयबॉल कंपनीचा प्रीमियो व्ही२.०हा लॅपटॉप विद्यार्थीवर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे. दिसायला आकर्षक, साधारण पुरेशी वैशिष्टय़े असलेला हा लॅपटॉप वजनाने हलका आणि हाताळायलाही सहज असा आहे..

सध्याच्या धावत्या जगात अनेक कामे धावतपळतच उरकावी लागतात. किंबहुना ‘मल्टिटास्किंग’ अर्थात एका वेळी एकापेक्षा अधिक कामे हे सध्याच्या जीवनशैलीचे ब्रीद बनले आहे. या धावत्या जीवनशैलीला सहज बनवण्याचे काम करणारी अनेक साधने तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. त्यातील एक म्हणजे लॅपटॉप. लॅपटॉप ही आजघडीला साऱ्यांचीच गरज बनली आहे. केवळ प्रवासातच नव्हे तर घरातही लॅपटॉपवर काम करणे सोयीचे बनले आहे. डेस्कटॉप संगणकासाठीच्या फर्निचरमुळे घरातील वा कार्यालयातील बऱ्यापैकी जागा अडवली जाते. तसेच त्याच ठिकाणी बसून आपल्याला काम करावे लागते. याउलट लॅपटॉप घेऊन तुम्ही हवे तेथे बसून आपली कामे करू शकता. त्यामुळे अलीकडे प्रथम संगणक खरेदी करणारेही डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉपला पसंती देतात. साहजिकच अशा खरेदीदारांत विद्यार्थीवर्ग मोठय़ा प्रमाणावर असतो. बहुधा हाच दृष्टिकोन डोळय़ांसमोर ठेवून ‘आयबॉल’ने ‘कॉम्पबुक प्रीमियो व्ही२.०’ हा लॅपटॉप भारतीय बाजारात दाखल केला आहे.

‘प्रीमियो’चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ त्याचे देखणेपण आहे. ‘गन मस्टर्ड मेटॅलिक’ रंगांमध्ये रंगलेला प्रीमियो दिसायला अतिशय स्टायलिश वाटतो. १४ इंची असल्यामुळे बॅगेत सहज सामावतो आणि वजनाने हलका असल्याने हातातून वाहून नेतानादेखील अडचण वाटत नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे या स्टायलिश रचनेमुळे विद्यार्थ्यांना तो अधिक पसंतीचा वाटू शकतो. या लॅपटॉपला चमकदार प्लास्टिक आवरण असल्याने ओरखडय़ांपासून किंवा हाताच्या ठशांमुळे लॅपटॉपचे बाह्यावरण खराब होण्याची शक्यता नाही. १४ इंचाचा आकार असल्याने यातील कीबोर्डला ‘न्यूमपॅड’ पुरवण्यात आलेला नाही. लॅपटॉपच्या बाजूंवर स्पीकर पुरवण्यात आलेले आहेत. डाव्या बाजूला यूएसबी ३.०, मिनी एचडीएमआय आणि पॉवर पिनसाठी जागा पुरवण्यात आली आहे.

या लॅपटॉपची स्क्रीन १४ इंचाची असून त्याला १३६६ बाय ७६८ रेझोल्युशनचा एचडी डिस्प्ले पुरवण्यात आला आहे. या स्क्रीनचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्यप्रकाशात वा घरातील उजेडात स्क्रीन सुस्पष्टपणे पाहता येते. अनेकदा स्क्रीनवर प्रतिबिंब उमटत असल्याने प्रत्यक्ष लॅपटॉप वापरताना अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, ‘प्रीमियो’ हाताळताना ती गोष्ट जाणवत नाही. लॅपटॉपचा टचपॅड अतिशय व्यवस्थित असून त्याद्वारे ‘मल्टिटास्किंग’ही करता येते. या लॅपटॉपचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातील ध्वनियंत्रणा अतिशय चांगली आहे. लॅपटॉपचा आणि त्यातील स्पीकरचा आकार लहान असला तरी आवाजाची तीव्रता चांगली आहे. अर्थात आकाराच्या मर्यादेमुळे हा आवाज काही वेळा किरटा वाटतो.

‘आयबॉल’ने प्रीमियोसोबत ‘विंडोज १०’ लोड करून दिले आहे. खरे तर २१९९९ रुपयांच्या किमतीत ‘विंडोज १०’ असलेला लॅपटॉप मिळणे सध्या कठीणच आहे. मात्र, प्रीमियोने ही गोष्ट खरी करून दाखवली आहे. यामध्ये ‘विंडोज १० होम’ आवृत्ती पुरवण्यात आली असली तरी, काही रक्कम भरून तुम्ही ‘विंडोज’ अद्ययावतही करू शकता. ‘प्रीमियो’मध्ये इंटेलचा पेंटियम क्वाडकोअर प्रोसेसर सर्व कामे करतो. मात्र, लॅपटॉपचा एकूण वेग पाहता हा ‘पेंटियम क्वाडकोअर प्रोसेसर’ असेल असे वाटत नाही. एका वेळी अनेक विंडो खुल्या असतानाही लॅपटॉप धिमा झाल्याचे अजिबात जाणवले नाही. सध्या ‘इंटेल आय ३, ५, ७’ या प्रोसेसरची चर्चा असताना हा प्रोसेसर अतिशय सक्षमपणे काम करतो, ही गोष्ट अतिशय समाधानकारक आहे. अर्थात यासाटी लॅपटॉपला चार जीबी रॅमची जोड पुरवण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या आज्ञावली ‘प्रीमियो’ झटपट पार पाडतो. या लॅपटॉपमध्ये ३८ डब्ल्यूएच क्षमतेची लि-पॉलिमर बॅटरी पुरवण्यात आली आहे. ती अर्थातच पुरेशी ठरत नाही. मात्र, लॅपटॉप चार्जिग लवकर होत असल्याने याचा फारसा फटका जाणवत नाही.

आयबॉल प्रीमियो हा भारतात २१ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. सध्या १४ इंच आकाराचे लॅपटॉप याच किंमत श्रेणीत उपलब्ध आहेत. मात्र, दिसायला देखणा, कामात वेगवान असलेला ‘प्रीमियो’ त्या सर्वात निश्चितच उठून दिसतो.

वैशिष्टय़े

  • १४ इंच आकाराचा लॅपटॉप
  • विंडोज १० समाविष्ट; मायक्रोसॉफ्ट अ‍ॅपचाही अंतर्भाव
  • चार जीबी रॅम, ३२ जीबीअंतर्गत स्टोअरेज
  • स्टोअरेज क्षमता १२८ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा.
  • एक टीबीपर्यंतच्या एसएसडी/एचडीडी हार्ड डिस्क जोडण्याची सुविधा.
  • ३८डब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी
  • किंमत : २१,९९९ रुपये