डॉ. अश्विन बोरकर

सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे सारेच जण घरी आहेत. या काळात घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांना घरी राहूनच वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. मात्र सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे अनेकांना शारीरिक समस्या उद्भवू लागल्या आहेत. तसंच मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकदेशील बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी या सारख्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर थोडी शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे.

या कारणामुळे शारीरिक व्याधी उद्भवू शकतात-

१. बसण्याची चुकीची पद्धत –
वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे अनेकांचं काम घरुनच होत आहे. त्यामुळे फिल्डवर जाऊन काम करणं, ऑफिसला जाणं सारं काही बंद झालं आहे. त्याला पर्याय म्हणून सगळे जण घरी राहूनच ही काम करत आहेत. मात्र ही काम करत असताना अनेक वेळा घरीच आहोत त्यामुळे आपण गादीवर बसून किंवा लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करतो. त्यामुळे अनेकांना मानदुखी आणि पाठदुखीची समस्या निर्माण होते.

२. खाण्याच्या पद्धती –
लॉकडाउनमुळे घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेक जण फास्टफूड मिस करत आहेत. त्यामुळे काही जण घरीच वेगवेगळे पदार्थ करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यामध्ये बरेचदा तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. तसंच जेवणाची,नाश्ताची वेळ चुकवली जाते. त्यामुळे डोकेदुखी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात.

हे करणं टाळा –

१. पाठीवर ताण देणे –
कोणतीही जड वस्ती उचलताना काळजीपूर्वक उचला. त्यामुळे पाठीवर ताण येणार नाही याची काळजी घ्या. एखादी जड वस्तू पटकन उचललं तर पाठीत कळ येऊ शकते. परिणामी, पाठदुखीची समस्या निर्माण होते.

२. बराच वेळ एका ठिकाणी बसणे –
शारीरिकदृष्ट्या फिट रहायचे असल्याच सतत हालचाल करणे गरजेचं आहे. त्यामुळे घरातून ऑफिसच काम करताना अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहू नका. तसंच स्वयंपाक घरात काम करत असतानाही वारंवार चालण्याची सवय ठेवा. यासाठी फोनवर बोलतानाही बसून न बोलता फिरून बोलण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून शारीरिक हालचाल होऊ शकेल.

३. कॉम्प्युटरसमोर काम करताना मान वाकवणे –
संगणकावर काम करताना खाली झुकणे हानिकारण ठरू शकते. यामुळे मान, मागच्या बाजूला आणि खांद्याला वेदना होऊ शकते. याकरता संगणकाची स्क्रीन चेहऱ्याच्या समोर दिसेल यासाठी त्याखाली पुस्तके लावून ती वर करा. त्यामुळे आपण संगणकाची स्क्रीन योग्यरित्या पाहू शकता. जेणेकरून काम करताना खाली वाकल्याने मान व मणक्याला त्रास जाणवणार नाही.

४. पलंगावर बसू काम करणे –
काम करताना शक्यतो पलंग किंवा गादीवर बसू नका. त्यामुळे अनेकदा काम करताना सुस्ती येते . त्यामुळे शरीरात आळस भरला की आपण उशांना टेकून काम करण्याचा प्रयत्न करतो. यात बऱ्याचदा आपण अर्धे झोपलेल्या स्थितीत काम करतो. त्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो.

५. जास्त वेळ कोपर आणि मनग वाकणे-
कॉम्प्युटरवर टाइप करताना कि-बोर्डवर दोन्ही बाजूंना मनगट किंवा कोपर वाकवून ठेवल्यास सांधे आणि त्यांच्या मज्जातंतूंना त्रास होऊ शकतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास त्रास वाढतो आणि Carpal Tunnel Syndrome हा आजार होऊ शकतो. यात हाताला मुंग्या येणं ही समस्या उद्भवते. त्यामुळे काम करत असताना संगणकाच्या मोठ्या स्क्रीनसह मोठा कि-बोर्ड असणे आवश्यक आहे.

शारीरिक व्याधी टाळण्यासाठी ‘हे’ करा

१. नियमित शारीरिक व्यायाम करणे गरजेचं आहे. पोट, पाठ आणि पायाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.

२. मन व शरीरावरील ताणतणाव कमी करायचा असल्यास योग अतिशय फायदेशीर आहे.

३. घरातून काम करताना अधून-मधून थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा आणि कही काळ उभे रहा.

४. खांद्याला आणि मानेला आराम मिळेल, अशा व्यायाम प्रकाराचा नेहमी सराव करा

५. योग्य श्वासोच्छवासाच्या तंत्राचा सराव करा.

६. घरी बसून काम करताना कंबर दुखत असल्यास उशीचा वापर करा.

(डॉ. अश्विन बोरकर, सल्लागार न्यूरोसर्जन तज्ज्ञ (मेंदू आणि मणक्यांची शस्त्रक्रिया) वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड)